गुरुवार, ७ एप्रिल, २०११

आता नशा देतो न तैशी जाम पहिल्यासारखा

आता नशा देतो न तैशी जाम पहिल्यासारखा
कोठे मनाला वाटतो आराम पहिल्यासारखा??

'दुखणेच हे आयुष्य माझे' ठाव आहे ते मला
करतो न मीही रोजला व्यायाम पहिल्यासारखा!

फ़ुलती न त्या रुसल्या कळ्या झालेय काही ठाव ना
धसमूसळा वारा न तो बेफ़ाम पहिल्यासारखा!!!

गेली तशी आली न परतुन पाखरे खोप्यातली
ना ठेवतो ऋतुराजही मुक्काम पहिल्यासारखा??

मी विस्मरण म्हणतो तसे पण जाणतो सारेच की
मेंदूच ना देई अताशा काम पहिल्यासारखा

वाटे न मजला भरभरूनी मी जगावे या जगी
दुनियेत या नाहीच आता राम पहिल्यासारखा

जाताच तू नुरले मला कारण पुन्हा झुंजायला
नाहीच मी मग राहिलो गं ठाम पहिल्यासारखा

'प्राजू' पुन्हा फ़ुलशील का आता तशी तू सांगना
नुरला तुझा तो हासरा गुलफ़ाम पहिल्यासारखा
- प्राजु

वृत्त - मंदाकिनी
गागालगा गागालगा गागालगा गागालगा

1 प्रतिसाद:

Ganesh Bhute म्हणाले...

फ़ुलती न त्या रुसल्या कळ्या झालेय काही ठाव ना
धसमूसळा वारा न तो बेफ़ाम पहिल्यासारखा!!!


जाताच तू नुरले मला कारण पुन्हा झुंजायला
नाहीच मी मग राहिलो गं ठाम पहिल्यासारखा


'प्राजू' पुन्हा फ़ुलशील का आता तशी तू सांगना
नुरला तुझा तो हासरा गुलफ़ाम पहिल्यासारखा

हे शेर खूप खूप आवडले... बहोत खूब...

Page copy protected against web site content infringement by Copyscape