गुरुवार, ७ एप्रिल, २०११

...प्रेम कर !

आयुष्याच्या हरेक क्षणांवर .. प्रेम कर
अस्तित्वाच्या घनघोर रणावर .. प्रेम कर

नात्यांमध्ये गुरफ़टणार्‍या
ओलाव्याने मोहरणार्‍या
मनाच्या या उधाणपणावर.. प्रेम कर

कळ्या उमलती तू हसतना
स्पर्श छेडती कोमल ताना
देहाच्या प्रत्येक सणावर.. प्रेम कर

नको विचारू गतकालाला
करेन वश मी त्या दैवाला
माझ्यामधल्या याच गुणावर.. प्रेम कर

घाव झेलले जगण्यासाठी
राखेमधुनी उठण्यासाठी
हृदयावरच्या त्याच व्रणावर.. प्रेम कर

नुरतील तेथे काही व्यथा
एक आगळी शांत अवस्था
मुक्ती देणार्‍या सरणावर.. प्रेम कर

अंत नसतो सृजनाला त्या
विलयाच्याही बस्स रेघोट्या
सृष्टीच्या या कणाकणावर .. प्रेम कर

- प्राजु

3 प्रतिसाद:

BinaryBandya™ म्हणाले...

आवडली कविता ..

Ganesh Bhute म्हणाले...

अतिशय सुंदर ! खूप आवडली कविता ... जगण्यासाठी किती सुंदर संदेश दिलां आहात तुम्ही ह्या कवितेतून... व्वा !

Vishwesh म्हणाले...

praaju, kavitevar asech prem kar ...
sundar !

Page copy protected against web site content infringement by Copyscape