गुरुवार, ३१ मार्च, २०११

नवानवासा..

नवलाईचा ऋतू रंगिला
फ़ुलून यावा नवानवासा
मनातल्या या उधाण रानी
रंग भरावा नवनवासा

उन्हांत हळदी फ़ुले नहाती
सुवर्ण लेणे अंगावरती
वसंत माझा पसरुन बाहू
मनी फ़ुलावा नवानवासा

क्षणांत घुमवी नवे तराणे
तरू वेलींचे निळे उखाणे
दरवळ न्यावा दहा दिशांना
आणि खुलावा नवानवासा

हिरवट ओल्या जरा कोवळ्या
गवतावरती नक्षी ओली
वार्‍यासोबत मोती ओला
जरा झुलावा नवानवासा

वसंत लाघव रूप हरीचे
अवघी अवनी राधा होते
वनावनातुन सृजनाचा रे
घुमेल पावा नवानवासा

-प्राजु

3 प्रतिसाद:

shree म्हणाले...

chhan aahe

Ganesh Bhute म्हणाले...

नवलाईचा ऋतू रंगिला
फ़ुलून यावा नवानवासा
मनातल्या या उधाण रानी
रंग भरावा नवनवासा
--- खूप सुंदर भावना !


उन्हांत हळदी फ़ुले नहाती
सुवर्ण लेणे अंगावरती
वसंत माझा पसरुन बाहू
मनी फ़ुलावा नवानवासा
--- सुंदर !

क्षणांत घुमवी नवे तराणे
तरू वेलींचे निळे उखाणे
दरवळ न्यावा दहा दिशांना
आणि खुलावा नवानवासा
--- व्वा ! छानच !

हिरवट ओल्या जरा कोवळ्या
गवतावरती नक्षी ओली
वार्‍यासोबत मोती ओला
जरा झुलावा नवानवासा
-- अतिशय सुंदर , सुरेख !

वसंत लाघव रूप हरीचे
अवघी अवनी राधा होते
वनावनातुन सृजनाचा रे
घुमेल पावा नवानवासा
--- अप्रतिम, अतिशय सुंदर कल्पना

सगळ्या ओळी सुंदर आहेत...खूप गोड कविता ! खूप खूप आवडली....

Ganesh Bhute म्हणाले...

नवलाईचा ऋतू रंगिला
फ़ुलून यावा नवानवासा
मनातल्या या उधाण रानी
रंग भरावा नवनवासा

मनाची उमलताना असणारी अवस्था ... एक हवीहवीशी वाटणारी ओढ... स्वप्नील, तरल भावना ... अहाहा ! कित्ती सुंदर शब्दात


उन्हांत हळदी फ़ुले नहाती
सुवर्ण लेणे अंगावरती
वसंत माझा पसरुन बाहू
मनी फ़ुलावा नवानवासा

वसंतातले रंग मनात फुलावे... भावना बहरून याव्या... स्वप्ने मोहरावी... एका प्रियकराच्या/ प्रेयसीच्या / अनामिक सुखाच्या चाहुलीने.... व्वा खूपच सुंदरक्षणांत घुमवी नवे तराणे
तरू वेलींचे निळे उखाणे
दरवळ न्यावा दहा दिशांना
आणि खुलावा नवानवासा

मन निसर्गावर खुलून यावं... उन्हात असूनही चांदण्यात असल्याचा भास व्हावा... निसर्गाचे संगीत ऐकू यावे... त्या सुखाने अस्तित्व सुगंधित व्हावे... अप्रतिम !हिरवट ओल्या जरा कोवळ्या
गवतावरती नक्षी ओली
वार्‍यासोबत मोती ओला
जरा झुलावा नवानवासा

हिरव्या गवतावर झुलणारी दवबिंदुंची नक्षी... कित्ती सुंदर? व्वा !वसंत लाघव रूप हरीचे
अवघी अवनी राधा होते
वनावनातुन सृजनाचा रे
घुमेल पावा नवानवासा

वसंत ऋतू म्हणजे कृष्ण आणी धरती म्हणजे राधा... कित्ती गोड कल्पना त्याहून सुंदर वनवानातून घुमणा-या सृजनाचा पावा ही कल्पना अतिशय सुंदर ... अप्रतिम !

ह्या कवितेचा पुन्हा आनंद घेताना अगदी अशी हळवी अनुभूती जगता आली त्याबद्दल प्राजू तुझे आभार मानायला हवेत मी....

Page copy protected against web site content infringement by Copyscape