अपुलीच आपल्याला छळतात माणसे ही
वेठीस नेहमी का धरतात माणसे ही??
अपुलीच आपल्याला छळतात माणसे ही
शेंदूर फ़ासलेल्या दगडास ताट भरले
गरिबास घास देता, अडतात माणसे ही
भेटून नास्तिकाला, तक्रार सांगतो 'तो'
"हा जीव ही नकोसा.. करतात माणसे ही!"
तडकून काच जाते नात्यांमधील जेव्हा
तुकड्यात बिंब बघण्या, उरतात माणसे ही
करशील तू अपेक्षा त्यांच्याच पूर्ण जोवर
पूजा तुझीच येथे, करतात माणसे ही!
माझ्याच कातडीच्या घालूनिया वहाणा
'पायांस बोचती!' मज म्हणतात माणसे ही..
पाहू नकोस 'प्राजू', मागे अता जराही
मार्गावरी यशाच्या नडतात माणसे ही!!
- प्राजु
2 प्रतिसाद:
-- सुरेख
शेंदूर फ़ासलेल्या दगडास ताट भरले
गरिबास घास देता, अडतात माणसे ही
खूप छान ! किती खोल गर्भितार्थ आणि वास्तव ह्या ओळीत प्रतित होते आहे ... सुंदर
atishay vastavavadi ... aavadali
टिप्पणी पोस्ट करा