बोलून घेऊ थोडे..
निघण्याची बघ वेळ जाहली, बोलून घेऊ थोडे
रस्ते फ़ाकण्या आधी, मित्रा! बसून घेऊ थोडे
पुन्हा एकदा तळ्यावरी त्या, मनांस धाडून देऊ
उरल्या सुरल्या क्षणांवरी त्या हळूच फ़ुंकर घालू
निघण्याआधी पुन्हा एकदा, होऊन जाऊ वेडे
निघण्याची बघ वेळ जाहली, बोलून घेऊ थोडे
विरून जाती संध्याछाया, रात सावळी होई
धुंदपणा तो सरून जाता, सरही ओसरून जाई
सुकून नात्यामध्ये आपुल्या, जाण्याआधी तडे
निघण्याची बघ वेळ जाहली, बोलून घेऊ थोडे
हसलो, फ़सलो, खेळ खेळलो, जगलो सुद्धा काही
मनामध्ये मग दडून राहण्या, जोगे नुरले काही
जाता जाता मनात उरले, बोलून जाऊ थोडे
निघण्याची बघ वेळ जाहली, बोलून घेऊ थोडे
मनातले त्या सारे कप्पे, झाडून घे रे तूही
जाळे-जळमट जुन्या सयींचे, नको उराया काही
पाठ फ़िरवूनी जाण्याआधी, हसून घेऊ थोडे..
निघण्याची बघ वेळ जाहली, बोलून घेऊ थोडे
- प्राजु
0 प्रतिसाद:
टिप्पणी पोस्ट करा