शनिवार, ५ मार्च, २०११

गहिवर घालू नकोस राधे..

गहिवर घालू नकोस राधे, कृष्ण चालला दूर
पापणकाठी अडव पाणी, येईल आता पूर..

यमुनेकाठी विझून जाते सांज अशी आवेळी
आक्रोश तुझा घुमून राही पैलतीरी राऊळी
सावर आता अंधाराचा पेटून जाईल ऊर..
गहिवर घालू नकोस राधे, कृष्ण चालला दूर

सार्‍या खाणाखुणा घालती, तुला उखाणे निळे
नसनसांतून पावा घुमतो, हरीस त्या ना कळे
सुरेल काया तुझीच राधे, होईल गं बेसूर
गहिवर घालू नकोस राधे, कृष्ण चालला दूर

विश्वचि अवघे तुझे मोडले, रंग न उरला काही
विश्वाचा तो "मोहन" वेडे, तुझाच केवळ नाही!!
आवर आता थांबव सारे मनातले काहूर..
गहिवर घालू नकोस राधे, कृष्ण चालला दूर

- प्राजु

Page copy protected against web site content infringement by Copyscape