टाळती मजला अताशा हाय! माझी माणसे
टाळती मजला अताशा हाय! माझी माणसे
हासती का पाहुनी मज रोजला हे आरसे??
मैफ़िलीना मी सजवले प्राण माझे ओतुनी
पण तरीही का कुणीही फ़िरकले ना फ़ारसे??
सांगुनी माझी व्यथा मी काय येथे मिळवले?
फ़क्त त्यांनी हुंदक्यांचे माझिया केले हसे
सांज होता दूर जाती सावल्या पायातल्या
टाळण्या मज तेवणारा दीपही का विझतसे??
'भीड आता बाळगावी तू कशाला, वेदने??
मी 'सखी' हे नाव तुजला देत केले बारसे!!
पेटवूनीया चितेला सर्व आता पांगले
सोबतीला राख आणी राहिले बस्स कोळसे!!
एकले आयुष्य गेले, ना कुणी आले कधी
मन रमवण्या शेवटाला, मरण आले छानसे!!
- प्राजु
2 प्रतिसाद:
'भीड आता बाळगावी तू कशाला, वेदने??
मी 'सखी' हे नाव तुजला देत केले बारसे!!
अप्रतिम
पेटवूनीया चितेला सर्व आता पांगले
सोबतीला राख आणी राहिले बस्स कोळसे!!
-ह्या ओळी आवडल्या
टिप्पणी पोस्ट करा