माझा अभिमान .. मराठी मी!!
२७ फेब्रुवारी , मराठी दिनाच्या सर्वांना शुभेच्छा!
मराठीचा दिनू, आमृताचा घनू
वर्षवतो जणू, घननीळ..
'कविवर्य' जन्म- शताब्दीचे वर्ष
मराठीस हर्ष, सांगू काय!
माझी गो ती माय, वर्णू तिला काय
दुधावरची साय, मऊशार!
ज्ञानोबाची वाणी, 'तुका'ची कहाणी
बहिणाबाई ची गाणी, ओठावर!
'नाम्या'चे किर्तन, 'जनी'चा कैवार,
'चोखा'चा जोहार, अभंगात
तलवारीची धार, शिवबाचा प्रहार,
राणी लक्ष्मी नार, तळपती
भटांची लेखणी, पेटवी मशाली
म्हणे उष:काली, यलगार!
वाल्मिकी गदिमा, बाबूजींची गाणी
गीत रामायणी, अवतरे
किती कवतुक, कवी नि लेखक
गाती हे गायक, मराठीचे
मनांत मराठी, तनांत मराठी
नसांत मराठी, भिनलेली..
सह्याद्री आंदण, भाबडे कोकण
सागराचे गान, माडांतून..
आईची ही वाणी, उपमांची खणी
शब्दांची ती लेणी, किती वर्णू!!
भाषेचा आधार, शब्दांनाही जाण
माझा अभिमान, मराठी मी!!
- प्राजु
1 प्रतिसाद:
- अतिशय सुंदर ! खूप खूप आवडली ...
टिप्पणी पोस्ट करा