सारे तुझेच होते..
सारे तुझेच होते, शब्दांत बांधलेले
भासे उगा कुणाला, मी दु:ख कोंडलेले!!
गावे हजार तुजला, शोधीत हिंडलो मी
लोकांस वाटले की, मज वेड लागलेले
सोडून सावलीही मजला निघून गेली
आधी तिच्याचसाठी मी ऊन्ह सोसलेले..!
देहास मोल नाही, जाळून राख होते
शिवण्यास पिंड येथे, हे काक पोसलेले
मी कोरडाच वाटे, सार्या जगांस आता
अश्रू कधीच माझे, डोळ्यांत गोठलेले
म्हणतात शांत काही, काही अबोल म्हणती
त्यांना न जाणवे की, मी भाष्य टाळलेले
अंधार त्या स्मशानी, होता भिऊन गेला
माझे शरीर त्याच्या, सोबतिस जाळलेले
-प्राजु
4 प्रतिसाद:
प्राजक्ता,गझल छान लिहिली आहेस तू :-)
माझ्या ब्लॉगचा
पत्ता:http://prashantredkarsobat.blogspot.com
kya bat
सोडून सावलीही मजला निघून गेली
आधी तिच्याचसाठी मी ऊन्ह सोसलेले..!
मनाला स्पर्शून, नि:शब्द करून गेल्या ह्या ओळी ...
म्हणतात शांत काही, काही अबोल म्हणती
त्यांना न जाणवे की, मी भाष्य टाळलेले
अप्रतिम ! खूप खूप सुंदर ...
म्हणतात शांत काही, काही अबोल म्हणती
त्यांना न जाणवे की, मी भाष्य टाळलेले
he farach bhavale ...
टिप्पणी पोस्ट करा