ठरेन या जगात मी महान एकदा तरी..
मुठीत घेउ दे मला तुफ़ान एकदा तरी
ठरेन या जगात मी महान एकदा तरी
नकोस मैफ़िलीमधून बोलवू मला अता
भरून तृप्त होउ देत कान एकदा तरी
प्रवाह सोडुनी, 'अशी-तशीच' वागले जरा
अतातरी म्हणाल धैर्यवान एकदा तरी???
उगाच प्रश्न या मना, सतावितो पुन्हा पुन्हा
मिळेल वागणूक का समान एकदा तरी??
धरेस घाल साकडे, 'फ़ुलून डोलु दे पिके'
सुखेच क्लांत होउदे किसान एकदा तरी
कितिक सुंदर्या अशाच मिरविती इथे तिथे
दिसेन का तशीच मीहि छान एकदा तरी?? :)
हजारदा रचून 'काव्य', पत्र धाडले तुला
लिहून 'शब्द' धाड तू किमान एकदा तरी !!!
'हवेच' जे कमावले, अता न आस कोणती
मिळेल का तुझ्या मनांत स्थान एकदा तरी?
- प्राजु
1 प्रतिसाद:
हजारदा रचून 'काव्य', पत्र धाडले तुला
लिहून 'शब्द' धाड तू किमान एकदा तरी !!!
'हवेच' जे कमावले, अता न आस कोणती
मिळेल का तुझ्या मनांत स्थान एकदा तरी?
व्वा ! खासच !
टिप्पणी पोस्ट करा