बुधवार, १९ जानेवारी, २०११

नार देखणी, जणू मोरनी..

नार देखणी, जणू मोरनी, थिरके हिरव्या रानी
नजर कट्यारी, टंच उभारी, मुसमुसलेली ज्वानी
अहो राजसा, जवळी बसा, ऐकून घ्या मागणी
माझी... ऐकून घ्या मागणी..

मान वळविते, जरा झटकते, डौल हंसापरी
असा शिणगार, नव रत्नहार, गोर्‍या कांतीवरी
विशाल भाळी, आणा बिंदली, लखलख चंद्रावाणी
माझी... ऐकून घ्या मागणी..

गर्भ रेशमी, रंग कांचनी, शालू हा भरजरी
मखमल चोळी, निळी जांभळी, नक्षी काठावरी
कमर साजिरी, बंद चंदेरी, घाला मज आणुनी
माझी... ऐकून घ्या मागणी..

धुंद गारवा, मनी काजवा, लुकलुक करतो भारी
विडा केशरी, रंगतो परी, मैफ़िल सजते न्यारी
बसा पळभरी, देह कस्तुरी, लुटेल दुजा कुणी
माझी... ऐकून घ्या मागणी..

- प्राजु

Page copy protected against web site content infringement by Copyscape