शुक्रवार, १४ जानेवारी, २०११

वनराणी.. १

आज पहिल्या प्रहरीच जाग आली. आज माझा विवाह आहे. पण मनांत कुठेतरी काहीतरी चुकतेय असंच वाटतं आहे. का? समजत नाहिये. भोरा खूप आनंदी आहे आज. किती दिवसापासून चाललं होतं आमच्या दोघांच्या घरच्यांचं. शेवटी ठरवलंच सगळ्यांनी. मला विचारलं. बेठकीत 'हो' म्हणून गेले. पण आज.. ?? आज असं वाटतंय की माझा जन्म हा विवाह करून भोरा चा संसार करण्यासाठी नाहिये. पाडित राहून, बांबूच्या वस्तू विणायच्या, जनावरं सांभाळयची, डोंगरात, अरण्यात जाऊन कंद जमवायची.. आणि भोरा ला सुखी करायचं?? मी का करू? भोरा मला आवडतो.. पण मला संसार नाहीये करायचा. संसार नाहीये करायचा की भोराशी संसार नाहीये करायचा?? नाही.... मला विवाहच नाहीये करायचा. या सगळ्या भौतिक गोष्टीत मन रमत नाहीये माझं. कोणत्यातरी दिव्य शक्तीकडे मन ओढलं जातंय... काय आह हे??

अरे! हे काय उजाडायला लागलंय बाहेर? हम्म! सगळ्यांची लगबग सुरू झाली वाटतं. जुंबाआम्माच्या घरातून आवाज येताहेत. चंपा उठून येईल आत्ता माझ्यापाशी आणि घेऊन जाईल मला स्नान घालायला. मग सगळेच विधी सुरू होतील. मला विवाह नाहीये करायचा... काय करू? मा' शी बोलू? मा'ला पटणार नाही. बा' तर जीवच घेतील माझा. मला जायलाच हवं पण!! त्या दिव्य शक्तीकडे मला जायलाच हवं.
हे काय.. बाहेर कोकरांचा, शेरड्यांचा आवाज...! इतका?? इतक्या सगळ्या शेळ्या, मेंढ्या?? कशासाठी?? मा' उठली वाटतं...
"उठलीस का बयो? आज लग्न आहे गं तुझं. आमचं नशिब चांगलं. भोराचे मा-बा खूप चांगले आहेत. उद्यापासून तेच तुझं घर , बयो!" मा' च्या डोळ्यांत पाणी आलं. पण मला का नाही वाईट वाटत आहे? मला रडावंसं वाटतच नाहिये. हा विवाहच नकोय.
'मा, मा... मला विवाह नाही करायचा. गाठ नाही बांधायची भोराशी." एका दमात बोलून गेले मी!! हे बळ कुठून आलं माझ्यात? पण मा' तापलेल्या खापराचा चटका बसावा तशी मागे सरकली.
"काय बोलती आहेस, मुली??" मा'च्या डोळ्यात कोकरासारखी भिती भरली होती.
"अगं ,पाड्यावरचे लोक काय म्हणतील?तुझ्या बा' ला तोंड दाखवायला जागा उरणार नाही. तुला दुसर्‍या कोणाशी गाठ बांधायचि आहे का? मग हे बैठकीत का नाही बोललीस??" मा' मला समजावत होती.
"नाही मा' . मला कुणाशीच गाठ नाही बांधायची." इतकं बोलून मी पर्णकुटीच्या बाहेर आलेय निघून. आत मध्ये मा' , बा' ला जागं करून सगळं सांगेल आता. बाकी लोकं उठायच्या आत मी माझ्या वाटेकडे प्रस्थान करावं.

बाहेर ही इतकी सगळी कोकरं, मेंढ्या..! काल सायंकाळी नव्हती. हो! बरोबर. काल.. बा' सांगत होते झारू ला रात्री पर्यंत सगळी आणून बांध खोपटात म्हणून. पण इतकी सगळी?? कशासाठी? ... चंपा उठली वाटतं? इकडेच येतेय.
"उठली का राणी.. चला निंबोर्‍याचा आणि चंदनाचा पाला आणलाय काल मी रानातून. छान न्हाऊ घालते तुला."
"चंपा, इतकी कोकरं, मेंढ्या का आणल्या आहेत?" माझ्यकडे कौतुकाने बघत चंपा म्हणाली मला," गो बाई.. तुझ्या विवाहाला सगळ्या पाडीला भोजन आहे उद्या. मग इतकी कोकरं लागणार नाहीत का?" चंपा हे सांगून हसतेय का?
"नाही नाही... इतकी हत्या.. एकदम.. अशी.. नाही नाही.." चंपा माझ्याकडे बघत असतानाच.. मी पाडीच्या मध्यात आलेय.. 'बा, भोरा, भाल, खंडू, सारा.., लास्या... मला भोरा सोबत गाठ नाही बांधायची.. ऐकून घ्या सगळे मला गाठ नाही बांधायची. मला संसार नाही करायचा. मला पाडीत रहायचं नाहीये.. मी निघालेय. भोरा मला क्षमा कर." .. मी काय बोलतेय. आज हे सगळं बोलण्याची ताकद कुठून आली माझ्यात? मनाने इतकी उचल कशी घेतली. कोणती ही अज्ञात शक्ती आहे जी माझ्याकडून हे करवून घेतेय? या सगळ्या लोकांचे चेहरे.. आज माझ्या विवाहाची मेजवानी मिळणार म्हणून हे आनंदाने उठले असतील.. आणि आता? पण नाही.. मी निर्णय घेतलाय. मला जायलाच हवंय.
बा' कुठे आहे.. मा'..?? दिसले दोघे.. कुटीच्या बाहेर उभे आहेत.. माझा चालेला खेळ पाहताहेत.. "बा.. निघतेय मी. येते मी. मला क्षमा करा बा'. मा' मला क्षमा कर. मला जायला हवं." चंपाला एकदा कवेत घेउन तिला निरोप दिला आणि आता मी निघाले. भोराकडे बघयचेहि टाळले मी. मागे मा' बा' .. सगळ्यांना काय काय उत्तरे देत असतील कोण जाणे. कोणाला काही बोलण्याची, विचारण्याची संधी न देता मी पाड्याच्या बाहेर पडलेय.

पण मी आता जाऊ कुठे? चालत रहावं.. माहिती नाही नियतीच्या मनात काय आहे? कसले खेळ खेळतेय माझ्याशी? पण आज खूप हलकं वाटतं आहे. कित्येक दिवस मनांत चालेलं द्वंद्व आज संपलय. आज एखाद्या फ़ुलपाखरासारखं वाटतंय. कसलीच चिंता नाहीये आज. मी अशी एकटी कुठे निघालेय..... अरण्यात हिंस्त्र पशू आहेत.. दानव आहेत. पण मला कोणाचेच भय नाहीये. ही मनाची स्थिती पूर्वी कधीही अनुभवलेली नव्हती.

चालता चालता दिवस कलून आला. पूर्णा नदी !!!.. "हे सरीते.. इथे तुझ्या तीरावर मी माझी कुटी बांधेन.. मला आश्रय दे." आज त्या डोंगरातल्या गुहेत रात्र काढावी. आणि उद्या कुटी बांधावी.

****************

अरे ..! उजाडायला सुरूवात होईल. ऋषी मुनी आराधनेसाठी पंपा सरोवरच्या तीरावर जायला सुरुवात होईल. त्या आधीच मला त्यांची पायवट स्वच्छ करायला हवी. मी अशी क्षुद्र.. माझी सावली जरी पडली त्यांच्या अंगावर तर... मला मोक्ष नाही मिळणार. मलाही या ऋषींप्रमाणे मोक्षप्राप्तीसाठी आराधना करायची आहे. पण ते कसं जमावं मला!! म्हणून फ़क्त या तपस्वींसाठी पायवाट मी स्वच्छ करून ठेवते. प्रभूंच्या चरणी तितकीच सेवा!!
अरण्यात येऊन मास होऊन गेला असेल आता. पण मी सुखी आहे. माझं मन शांत आहे. हाताला घट्टे पडले आहेत.. काट्याकुट्यांमुळे ओरखडे आले आहेत. पण पायवाट स्वच्छ करायला मी जर झाडू वापरला तर त्याचा आवाज होईल.. आणि.. मुनींना समजेल.. की ती.. पायवाट नीटनेटकी करणारी मी आहे.. आणि मग.. ते क्रुद्ध होतील.. आणि मग हे मला बंद करावे लागेल. मग.. प्रभूंच्या चरणी मी काय अर्पण करू? छे.. छे!! ऋषीगणांना कळता कामा नये हे..!

****************
आज.. काहीतरी विपरीत घडलं. मला उशिर झाला की मातंग ऋषी लवकर आले ध्यान धारणेसाठी?? .. आज झाडलोट करून कुटीमध्ये आले.. तर पाठोपाठ हे ऋषी!!! प्रसन्न चेहरा.. धारदार नाक.. आश्वासक डोळे, जटा पाठीवर सोडलेल्या... विलक्षण तेजस्वी रूप!! माझी कुटी उजळून निघाली. एका भिल्लिणीच्या घरी असा योगी!!! हा योगायोग होता की नशिबाचा भाग?

क्रमशः

1 प्रतिसाद:

मंदार जोशी म्हणाले...

गोष्ट खूपच आवडली.
>>"नाही नाही... इतकी हत्या.. एकदम.. अशी.. नाही नाही.."

कल्पना उत्तम आहे :)

आणि तू तर चक्क सेलेब्रिटी आहेस. ऑटोग्राफ प्लीज?! :)

Page copy protected against web site content infringement by Copyscape