घागर घेऊन निघाली गौळण..
घागर घेऊन, निघाली गौळण.. नजर चोरून, घुंघट ओढून
घुमते मुरली, थिरके पैंजण.. दिसतो त्या तिरी, सावळा साजण
वाट ही अधीर, पावले वेगात.. गुंतला जीव हा, मयूर पंखात
झुळझूळ वार्यास, शुक्राच्या तार्यास, घेऊन सोबत निघाली गौळण..
घुमते मुरली, थिरके पैंजण.. दिसतो त्या तिरी, सावळा साजण
भिजर्या धारांत, निजल्या रानांत, श्रीहरी मनांत, भिनला तनांत
मोहक निळाई, वेढते जीवांस, बेबंद श्वासांस, घालते गुंफ़ण
घुमते मुरली, थिरके पैंजण.. दिसतो त्या तिरी, सावळा साजण
दिसला मुरारी, साठवी दिठीत, विसावे क्षणिक, तयाच्या मिठीत
भिजली तहान, नुरे तीज भान, चरणी तयाच्या, झाली ती अर्पण
घुमते मुरली, थिरके पैंजण.. दिसतो त्या तिरी, सावळा साजण
-प्राजु
0 प्रतिसाद:
टिप्पणी पोस्ट करा