पौर्णिमेचा ताज
सांजवेळी रंगलेला, चांदवर्खी साज होता
अन नभाच्या मस्तकावर, पौर्णिमेचा ताज होता..
दूर कोठे शीळ घाली, मंद वारा गंधलेला
आणि ओठी छेडलेला, धुंद सूर खमाज होता..
दाट होत्या सावल्या अन, देह होता तापलेला
डोळियांचा नूर खास, रंगलेला आज होता..
शेज होती मोगर्याची, पापण्यांना लाज आली
हाय! लाजाळूपरी गं लाजण्याचा बाज होता..
गर्द होती ती मिठी अन श्वास होते गुंफ़लेले
कंप होते मल्मली पण, 'लाजणे' रीवाज होता!!
स्पर्श होते रेशमाचे, साक्ष होती तारकांची
आज त्यांच्या मीलनाचा आगळा अंदाज होता
शल्य वाटे त्या नभाला, चांदव्याच्या हरतर्हांचे
चंद्र माझा, कुशित माझ्या, आणि मजला नाज होता..
- प्राजु
पूर्वप्रकाशित : बृहन्महाराष्ट्र मराठी मंडळ (बी एम एम) डिसेंबर २०१० वृत्त.
1 प्रतिसाद:
अप्रतिम! खुप खुप सुंदर !
टिप्पणी पोस्ट करा