मेहेंदीचे ते पानही ओले..
पागोळ्यातून झरले मोती
पाचूंवरती विखरून गेले..
जलधारांच्या सूर-संगमी
अभ्र सारे विरून गेले..
पहाट ओली , निसर्ग ओला
गर्द धुक्याच्या कुशीमध्ये..
कटी मेखला सतरंगांची
नटली थटली धरा इथे..
मेहेंदीचे ते पानही ओले
मनांस ओल्या लावी पिसे..
रंगरंगले तळव्यावरती
नाव कुणाचे उगा हसे..
थेंब टपोरे केसांमधले
गाली अलगद ओघळलेले
फ़ुलून येई गोड गुलाबी
गीत माझिया ओठावरले..
- प्राजु
0 प्रतिसाद:
टिप्पणी पोस्ट करा