कोजागर्ती कोजागर्ती
लखलखणारी नक्षत्रे अन
किनार धूसर क्षितिजावरती
रंगरंगते नभात काळ्या
कोजागर्ती कोजागर्ती
सडा शिंपला कणाकणांनी
आणिक चकमक झरझरती
जशी नेसली चंद्रकळा ती
रात देखणी कोजागर्ती..
होई अलगद सळसळ कोठे
उगा पाखरे भिरभिरती..
रूप देखणे निळावंतीचे
वेड लावते, कोजागर्ती..
जागजागूनी चांद भाळतो
रातराणीच्या गंधावरती..
झुलती सागर लहरी वेड्या
चांद पाहूनी, कोजागर्ती..
मन माझे गं फ़ुलून येते
आणि पैजणे रूणझुणती
टिपून घेई शशीबिंबाला
नयनी माझ्या, कोजागर्ती
- प्राजु
पूर्वप्रकाशित : बीएमएम वृत्त नोव्हेंबर २०१०.
0 प्रतिसाद:
टिप्पणी पोस्ट करा