गोळ्यांची आमटी/सांबार..
नाही.. नाही.. रस्ता नाही चुकला. अहो मी ही स्वयंपाक करतेच की घरी..! असो..
डिस्क्लेमर : ही ऑथेंटीक पा कृ नाही. अशीच सांगोवांगी आणि थोडीफार जयश्री देशपांडे यांच्या कृपेने जे काही घरात होतं ते वापरून केलेली आहे. प्राजु श्टाईल म्हणा हवं तर!! ऑथेंटीक पाकृ साठी सुगरणींची आणि बल्लवाचार्यांची मदत घ्यावी. काही चुकले-माखल्यास मी जबाबदार नाही. ऑल द बेस्ट!
"
चेरी टोमॅटोने डोकोरेशन करण्याचा केविलवाणा प्रयत्न.. :)
चला करा सुरूवात ...
वाढणी : साधारण पणे ३ लोकांसाठी .
सामग्री :
१. हरभरा डाळ - १.५ वाटी
२. मोठे कांदे - २ (१.५ +० .५)
३. तीळ - २ टीस्पून
४. टोमॅटो - १ मध्यम आकाराचा (ऑप्शनल. मला आवडतो म्हणून मी घालते)
५. लाल सुक्या मिरच्या - ऐपतीप्रमाणे. मी २ घेतल्या.
६. कढीपत्ता - मूठभर
७. कोथिंबीर - मूठ्भर (माझ्याकडे अजिबात नव्हती ;))
८. तमाल पत्र - ३-४
९. गरम मसाला /सांबार मसाला/गोडा मसाला - या पैकी कोणताही मसाला २-३ टीस्पून. काय करायचे आहे त्यावर मसाला वापरावा. सांबार करायचे असल्यास सांबार मसाला, विंग्रजी कर्री करायची झाल्यास गरम मसाला, आणि टिप्पीकल ब्राह्मणी आमटी करायची झाल्यास गोडा मसाला वापरावा.
१०. गूळ - आवडीप्रमाणे. (मी अजिबात नाही घेतला.) :)
११. आमसूल : ३-४
१२. आलं, ३-४ हिरव्या मिरच्या, लसूण २-३ पाकळ्या
१३. मीठ
१४. तळणीसाठी तेल.
कृती :
१. हरभरा डाळ ५-६ तास भिजत घालावी. नंतर त्यातले पाणी पूर्णपणे काढून टाकून ती जाडसर (वाटल्या डाळीसाठी असते तशी) वाटून घ्यावी. वाटताना त्यात आलं, हिरव्या मिरच्या, मीठ घालून घ्यावे.
२. आता कढईमध्ये तेल तापत ठेवून, या वाटलेल्या डाळीच्या मिश्रणात अगदी थोडा बारीक चिरलेला कांदा घालावा, थोडी हळद आणि २-३ कढीपत्त्याची पाने चिरून घालावीत. असल्यास कोथिंबीर सुद्धा घालावी.
३. तेल तापले की, या वाटणाचे हाताने गोळे करून तेलात सोडावेत. ते गोळे तेलात हसू लागले(म्हणजे डाळीचे कण अगदिच सुट्टे सुट्टे होऊ लागले) तर सगळ्या कढईभर वाटलेली डाळ पसरेल. असे झाल्यास त्याला बांधून ठेवण्यासाठी चमचा भर बेसन घालवे आणि मग त्या मिश्रणाचे छोटे छोटे गोळे तळून घ्यावेत. (१-२ खायलाही हरकत नाही).
सांबार्/आमटी साठी -
१. साधारण दिड कांदा मोठा चिरून तो तेलावर अगदी छान गुलाबी ट्रान्स्परंट होईपर्यंत परतावा. त्यातच लाल मिरच्या, आलं, लसूण परतून घ्यावे.
२. कांदा बाजूला काढून जे काही शिल्लक तेल असेल त्यावर तीळ परतून घ्यावेत.
३. आता हा लाल मिरच्या, कांदा, तीळ, आलं लसूण मिक्सरमध्ये अगदी पेस्ट करून घ्यावे.
४. कढईमध्ये डावभर तेल तापत घालून त्यात मोहरी, जिरे, हिंग, हळद, कढीपत्ता, तमाल पत्र, उरलेला बारीक चिरलेला कांदा, हवा असल्यास मोठा चिरून टोमॅटो घालावा आणि थोडे परतून घ्यावे. यामध्ये आता मिक्सरमध्ये केलेली कांद्याची पेस्ट घालून आणखी थोडावेळ परतून घ्यावे. त्यात वरील पैकी कोणताही मसाला घालावा आणि आणखी २-३ मिनिटे परतून घ्यावे. आता यात ठीकसे पाणी (दाट्-पातळ आवडीप्रमाणे) घालून त्यात मीठ, गूळ, आमसूले घालवीत.
आमटीला उकळी आली की हे तळलेले गोळे त्यात सोडावेत आणि ४-५ मिनिटे झाकण ठेवून मस्त उकळू द्यावे.
५. गॅस बंद करून वरून कोथिंबीर घालावी आणि पोळी, भात, भाकरी, पुरी .. अगदी स्वाद/दीप च्या परठ्यांसोबतही खावे.
टिप :
१. ज्यांना हरभरा डाळ मानवत नाही त्यांनी मूग डाळ आणि उडीद डाळ घ्यायला हरकत नाही. मिरच्यांचे प्रमाण कमी जास्त करता येते. याला पंजाबी भाजी करायची असल्यास ग्रेव्हीमध्ये कांद्यासोबत काजूही घालवेत.. गोडसर कोफ्ताकरी तयार होईल. गोळे जास्ती झाल्यास नुसते खाल्ले तरी छान लागतात, अथवा दुसर्या दिवशी कढी करावी आणि त्यात घालून कढी गोळे नावाचा प्रकार करावा.
२. काही ठीकाणी हे गोळे न तळता उकळणार्या आमटीमध्ये तसेच घालतात आणि ते त्यातच शिजतात (म्हणे!!). पण स्वयंपाक करताना मी कधी रिस्क घेत नाही ;)
शुभेच्छा!!
- प्राजु
0 प्रतिसाद:
टिप्पणी पोस्ट करा