बुधवार, ३ नोव्हेंबर, २०१०

टॉनिक..

'आयुष्य' या शब्दाचा अर्थ जर वर वर विचार केला तर जन्मापासून मृत्यूपर्यंत जो काही काळ असतो त्याला आयुष्य म्हणतात असाच असेल. पण हा जो काही काळ असतो तो आपण कसा घालवतो याला कदचीत 'जीवन जगणे' असे म्हणत असावेत. मी कधीही या दोन्ही गोष्टींचे अर्थ लावण्याचा अथवा समजून घेण्याचा प्रयत्न नाही केला.. किंवा इथून पुढे करेन असेही नाही . मात्र गेल्या काही दिवसांत जे काही बदल मला जवळून पहायला मिळाले त्यातून कदाचीत थोडंफार यालाच 'जीवन' म्हणत असावेत असं वाटू लागलं.

आयुष्यात थोडासा जरी 'बदल' झाला तरी तो बाकी इतर किती 'बदल' घडवू शकतो याचं उदाहरणच पाहण्यात आलंय. आपापल्या नोकर्‍या, उद्योग, रूटीन सोडून नवर्‍याच्या पाठोपाठ भारतातून इकडे परदेशी आलेल्या स्त्रीया, ज्या नोकरी करू शकत नाहीत परदेशी, त्या किती एकलकोंड्या होऊ शकतात हे पाहिलंय मी.. त्यातूनच काही स्त्रीया काही उद्योग लावून घेतात मागे जसे इडली-डोश्याचे पीठ विकणे, वेगवेगळे आर्ट क्लासेस घेणे.

पण सर्व सामान्य स्त्रीया ज्यांना विशेष पर्याय नसतात त्यांचं आयुष्य एखादी किटि पार्टी, मुलांचे स्विमिंग, ज्युकिडो, सॉक्कर क्लासेस, एखादी प्ले डेट या चाकोरीच्या बाहेर जात नाही, हे आता जाणवलं. सणवार अगदी भारतीय आणि परदेशातले सुद्धा येत असतात, जात असतात... भारतामध्ये दिवसभर मागे असणारे उद्योग, डोक्याला असणारी नानाप्रकारची व्यवधानं यामध्ये अगदी जखडून गेलेला दिवस इथे परदेशात नोकरी नसेल तर त्या बाईसाठी केवळ घरकाम करण्यापुरताच असतो . मुले, त्यांचे क्लासेस, स्वयंपाक पाणी आणि इतर साफसफाई इतकंच तिचं अस्तित्व उरतं. हे सर्व करायला संपूर्ण दिवस पुरतो पण मग कधी कंटाळा आला म्हणून एखादं काम बाजूला ठेवलं तर दुसरे दिवशी कामात वाढ होण्या पलिकडे दुसरं काहीच पदरात नाही पडत.. मग हळूहळू मरगळ चढू लागते.. मनावर आणि एकूणच जीवनावर. या सगळ्यात कधी आजूबाजूच्या मैत्रीणीशी गप्पा झाल्या तर त्यातूनही इतर काहीच निष्पन्न होत नसतं. कारण ती ही तशीच मरगळ घेऊन जगत असते. मग घरच्यांविषयी कूरबुरी, सासू-सासरे यांच्या तक्रारी, गप्पांमध्ये जी गैरहजर असेल त्या स्त्री विषयी अथ पासून इति पर्यंत काग्याळ्या.. किंवा अगदीच काही नसेल तर नवर्‍याबद्दल किंवा मुलांबद्दल तक्रार. यांतून दुसरं-तिसरं काहीच होत नाही, तक्रार मात्र असते आणि ती ही अखंड!! कशी जाणार ही मरगळ??

दिवाळीच्या दरम्यान एखाद्या कार्यक्रमाची चर्चा सुरू होते. आणि त्यात दिवाळी निमित्त एखादा कार्यक्रम आयोजित केलेला असतो आणि त्यात सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेल असते. या कार्यक्रमात एखादा ग्रुप डान्स करण्याची टूम निघते. सुरूवात होते ती ...'नाही गं जमत.. घरचं सगळं बघायचं... मुलांचे क्लासेस.. दोन्ही वेळचा स्वयंपाक, लॉन्ड्री... मुलांच्या शाळा.. हे सगळं करे पर्यंत नाकी नऊ येतात..नाही बाई जमणार..!!! ' त्यानंतर मग हळू हळू... 'कसं दिसेल बाई आता डान्स करणं.. !! केवळ शाळेत केला होता डान्स.. आता इतक्या वर्षानी करायचा म्हणजे.. कसं वाटेल..आता पूर्वीसारखा 'शेप' ही नाही राहिला.. !' अशा शंकातून हळू हळू ..' हरकत नाही.. आत्ता नाही करायचा तर मग कधी.. आणि काय माहिती पुढच्या वर्षी या आपल्या ग्रुप पैकी कोण कुठे असेल.. करून तरी बघू. थोडे दिवस प्रॅक्टिस करू.. अगदीच नाही जमलं तर नाही करायचं.. त्यात काय!'.. असं करत करत शेवटी तयारी सुरू होते. कोणी तरी पुढाकार घेतं. गाणी ऐकून, बघून त्यातलं एक फायनल होतं आणि मग किती जणी आहेत त्यावर डान्सच्या स्टेप्स बसवणं सुरू होतं..

सकाळी मुले, नवरा आपपल्या उद्योगांना बाहेर पडले की, एकीच्या घरी जमून संपूर्ण गाण्यावर हळूहळू कोरिओग्राफी होऊ लागते... स्टेप्स बसू लागतात. पहिले ३-४ दिवस हात्-पाय खूप दुखतात..... पण आता नाविन्याची ओढ लागलेली असते. बोलताना गप्पांमधले संदर्भ, विषय कधी बदलले गेले समजतही नाही. एकप्रकारची वेगळीच लकाकी चेहर्‍यावर येऊ लागते, घरातली कामे सुद्धा एकदम पटापट होऊ लागतात. अगदी मुलांचे क्लासेस, त्यांचे शाळेतले प्रोग्रॅम्स, घरी येणारे पाहुणे... त्यांची सरबराई.. हे सगळे करताना एक प्रकारचा आत्मविश्वास जाणवू लागतो.. एकमेकीबद्दल होणार्‍या कागाळ्यांचं रूपांतर आता डान्स साठी लागणार्‍या सामानाची चर्चा करण्यात होऊ लागतं. कितीही घरी काम असलं तरी प्रॅक्टिस ची वेळ पाळली जाऊ लागते.

आपण काहीतरी नविन करतो आहोत, काहीतरी वेगळं.. जे कधी काळी शाळेत केलं होतं.. जे कधी काळी शिक्षकांनी ,मित्रमैत्रीणींनी, आई-बाबांनी नावाजलं होतं.. नेहमीच्या रूटीनपेक्षा वेगळं... चार लोकं आपल्याकडे बघतील.. आपल्यासाठी टाळ्या वाजवतील, आपलं कौतुक करतील... आणि मग आपल्या मुलांनाही आपला अभिमान वाटेल.. आपणही काहीतरी करू शकतो हे समजेल सगळ्यांना.. हा विचार नवचैतन्य देऊन जातो. आणि एकेदिवशी अचानक आरश्यासमोर उभे असताना जाणवतं.. आपण बदललो आहोत.. डोळ्यात वेगळीच चमक आलीये.. चेहर्‍यावर वेगळाच निखार आलाय, आत्मविश्वास वाढलाय... काहीतरी वेगळंच वाटतंय!
पूर्वी स्वतःला बेढब वाटणारं स्वतःच शरीर अचानक बांधेसूद वाटू लागतं.. जीवन बदलंलय का?.. हा प्रश्न पडू लागतो.. कारण घरात एकलकोंडेपणामुळे होणारी चिडचिड कमी झालेली असते.

यालाच 'बदल' असं म्हणतात. मरगळलेल्या दिवसांना थोडीशी नवलाई मिळालेली असते.. मग तो डान्स असो.. किंवा आणखी कोणतीही ग्रुप अ‍ॅक्टीविटी असो.. पण त्या एका कार्यक्रमाने १-२ महिने का होईना आयुष्य टवटवीत केलेलं असतं. अधूनमधून 'आता हा कार्यक्रम होऊन जाईल.. मग पुढे काय?? पुढे तेच रटाळ रूटीन??' असे विचार मनात डोकावून जातात. आणि मग लक्षात येऊ लागतं आयुष्य असंच ठेवायचं असेल तर हे असं काहीतरी टॉनिक अधूनमधून घेणं आवश्यक आहे.

आयुष्यात थोडासा बदल सुद्धा कितीप्रकारचे बदल घडवून आणतो हेच पहायला मिळालं या सगळ्यामधून. आणि नकळत देवाकडे मागून गेले .."या सगळ्या जणी आत्ता जशा आहेत तशाच राहुदेत.. अगदी हसतखेळत...!"

(खूप काही वेगळं नाहीये हे... पण मी जे पाहिलं माझ्या आजूबाजूला , ते बघून जे वाटलं ते तुम्हासोबत शेअर करावं वाटलं... म्हणून हा लेखनाचा खटाटोप.)

- प्राजु

1 प्रतिसाद:

Pallavi म्हणाले...

Its very simple about day day to day life & true. I also live out of India and me & all other my friends living here feels the same. We always try to find & organize occasions.

Page copy protected against web site content infringement by Copyscape