तुलाच येणे जमले नाही..
वाट पाहिली तुझी किती मी, तुलाच येणे जमले नाही..
ओळखीचा रे सूरही होता, तुलाच गाणे जमले नाही..
तरूवेली त्या नटल्या होत्या, थेंब टपोरे बरसत होते
भरून घेण्या ओंजळ अवघी, तुलाच भिजणे जमले नाही..
गोंजारणार्या दहा दिशा अन, खुणावणारे क्षितिज होते
उंच भरारी गगनी घेण्या, पंख पसरणे जमले नाही..
टिपूर होती चांदरातही, रातराणीची साथही होती
स्पर्श होते आसुसलेले, तुला जागणे जमले नाही..
रंग होते ऋतूराजाचे , लाडिक आर्जव प्रेमही होते
हसता हसता बहरून येण्या, तुलाच फ़ुलणे जमले नाही..
घोंघावणारा वारा होता, लोभस सोन किनारा होता
अवखळ हळवी फ़ेनफ़ुले ती, तुला माळणे जमले नाही..
- प्राजु
1 प्रतिसाद:
तरूवेली त्या नटल्या होत्या, थेंब टपोरे बरसत होते
भरून घेण्या ओंजळ अवघी, तुलाच भिजणे जमले नाही..
आवडली कविता...
टिप्पणी पोस्ट करा