शब्द सांज गारवा..
शब्द बंध, शब्द गंध, शब्द सांज गारवा
शब्द गान, शब्द साज, शब्द सूर मारवा
शब्द स्वप्न, शब्द प्रेम, शब्द ध्येय लागले
शब्द मेघ, शब्द वीज, शब्द घुमू लागले
शब्द ओठी, शब्द पाठी, शब्द माळ गुंफ़ली
शब्द भव्य, शब्द काव्य, शब्द ओढ लागली
शब्द रंग, अन तरंग, जळावरी पहुडले
शब्द मूक, एक रूप, आईन्यात पाहिले
शब्द श्वास आणि ध्यास, या मनास लागले
शब्द भास, अन आभास, रात रात जागले
शब्द रात्र, धुंद गात्र, लाज लाज लाजले
शब्द अस्त्र, शब्द शस्त्र, घाव उरी लागले
शब्द एक क्षण उगाच, थांबला अधांतरी
शब्द हाक, शब्द साद, घालती हृदयांतरी
शब्द सय आणि भय, शब्द श्वास कोंडला
शब्द वेड, शब्द भान, शब्द ओठी थांबला..
- प्राजु
1 प्रतिसाद:
मस्त जमलीये कविता.
भर टाकण्याचा मोह अनावर झाला
शब्द भाव अन् प्रभाव रसिकमनी साठला
शब्द ब्रह्म नाद "ॐ" स्पंदनांत दाटला
टिप्पणी पोस्ट करा