पाऊस-कविता
प्रशांतनं पाऊस-कवितांच्या खेळाची सुरुवात केली, आणि क्रांतीला खो देऊन कल्पनाशक्तीला मस्त वाव दिला. या खेळाचे त्यानं सांगितलेले नियम वर दिले आहेत. क्रांतीने मला खो दिलय..आता मी माझी साखळी जोडते आणि पुढचा डाव जागु, निखिल कुलकर्णी, मीनल, संदीप कुलकर्णी यांच्या हाती सोपवते..
पावसावरील कडव्यांची साखळी का करू नये?
तेव्हा, ब्लॉगबंधु-भगिनींनो, "पाऊस-कविता" पुढे चालवण्यासाठी काही सोपे नियम -
१. शक्यतो छंदबद्ध कडवे तयार करू. अगदीच नाही जमलं तर मुक्तछंद चालेल. पण प्रयत्न करायला काय हरकत आहे? कविता गुंफ़ायची असल्यामुळे आधीचा कडव्याशी थोडासा तरी संबंध असावा.
२. छंदाचं नाव माहिती असल्यास ते कळवावे. त्याबद्दल माहिती दिली तर छानच. अर्थात नाही दिली तरी चालेल.
३. किमान एक व जास्तीत जास्त चार ब्लॉगबांधवांना खो देता येईल. संबंधित ब्लॉगलेखकास प्रतिसाद देऊन तसे कळवावे.
४. खो मिळाल्यावर ज्याच्या/जिच्याकडून खो मिळाला आहे त्या ब्लॉगलेखकाच्या पोस्टाचा दुवा आपल्या पोस्टात द्यावा व शक्य असल्यास आधीची कडवीही उतरवावीत. तसेच आपण खो स्वीकारल्यावर त्या पोस्टाचा दुवा खो देणाऱ्या पोस्टाच्या प्रतिसादात कळवावा, जेणेकरून आधीच्या लोकांनाही नोंद ठेवता येईल.
५. हे नियम सर्वांच्या सोयीसाठी डकवावे.
६. बस्स. आणखी काही नियम नाही. :-) आता फक्त पाऊस-कविता....
मग करायची सुरुवात?
माझं कडवं - (भुजंगप्रयात छंद)
न क्रोधी असा पावसा रे सख्या रे
तुझी वाट पाहे सखी मी तुझी रे
झणी येउनी वर्ष रे थेंब थेंब
तुझा स्पर्श अंगा करो चिंब चिंब
माझा खो -चक्रपाणि, क्रांती, आशाताई, अ सेन मन यांना
याला क्रांतीचं उत्तर असं..
छंद तोच, भुजंगप्रयात
खुळ्या पावसाला किती आवरू रे?
सरी श्रावणाच्या कशा पांघरू रे?
निळे सावळे मेघ येती छळाया,
सख्या, दूर तू, मी कशी सावरू रे?
माझा खो प्राजु, राघव, गोळे काका, जयवी यांना ..
याला माझं उत्तर असं..वृत्तबद्ध..
तुझा खेळ देवा, कशी मी सरावू
नभाच्या सवे मी कशी सांग धावू..
सरींनो, ढगांनो, जरा घ्या विसावा
भिजूनी पहाटे नका वेड लावू
आणि हे एक असंच..
पागोळ्यातून झरले मोती
पाचूंवरती विखरून गेले..
जलधारांच्या सूर-संगमी
अभ्र सारे विरून गेले..
पहाट ओली , निसर्ग ओला
गर्द धुक्याच्या कुशीमध्ये..
कटी मेखला सतरंगांची
नटली थटली धरा इथे..
माझा खो जागु, निखिल कुलकर्णी, मीनल, संदीप कुलकर्णी यांना ..
1 प्रतिसाद:
तुझा खो मिळाला प्राजु !
तू केलेलं कडवंही आवडलं.
शक्य तितक्या लवकर मी हा खो पुढे पाठवता येतोय का ते बघतो :)
टिप्पणी पोस्ट करा