जादूभरी हवा मी..
आकाश सांधणारा, क्षितिजावरी दुवा मी
बेबंद बरसणारा मनमेघ तो नवा मी
उन्मुक्त लहरणारा, मधुगंध वेचणारा
नाजूक अन सुगंधी, मनमोहि ताटवा मी..
स्वर्णात नाहलेल्या, कात-र सांजवेळी
हुरहूर लावणारा, तो सूर मारवा मी
पसरून पंख थोडे, झेपावुनी नभाशी
हितगूज सांगणारा, तो स्वैरसा थवा मी
नटवून शर्वरीचे, पाऊल तारकांनी
अन रात जागणारा, तो धुंद चांदवा मी
अंधार पांघरूनी, लपुनी उगाच राही
क्षण एक पेटणारा, भिरभीर काजवा मी
माझाच रंग सारा, माझाच गंध सारा
निळसर कधी गुलाबी, जादूभरी हवा मी..
- प्राजु
3 प्रतिसाद:
जादुभरी हवा मी...
व्वा! व्वा! छानच गजल वाचावयास मिळाली. आपल्या कविता सुंदर आहेत. फोलोअर झाल्यामुळे केव्हाही वाचता येतात.
मस्त गजल प्राचू फारच छान .
माझाच रंग सारा, माझाच गंध सारा
निळसर कधी गुलाबी, जादूभरी हवा मी..
अहाहा..!! व्वा व्वा...!!!
फ़ारच सुंदर, आल्हाददायी गझल.
http://marathigazal.wordpress.com/
टिप्पणी पोस्ट करा