बुधवार, २८ एप्रिल, २०१०

ऐक माझ्या फ़ुला..

ऐक माझ्या फ़ुला, तू जरा, तू जरा
गंधल्या अंतरी, दे मला, आसरा

कोवळे रूपडे , नाजुका कोमला
गौर हा वर्ण गं, साजिरा गोजिरा

आसमानीच गं तू परी लाजरी
सावरी, बावरी .. तू कुणी अप्सरा

गोड वाणी तुझी गं मरंदापरी
तू असे मंजुळा की असे शर्करा!

मी अबोली म्हणू, कि म्हणू सायली
तू निशीगंध की तू असे मोगरा!!

ही निळाई तुझ्या लोचनी दाटली
धुंदला रंग हा, लाजवी सागरा

पल्लवाचे तुझ्या मेघ, गाती जणू
छेडती दादरा त्या खुल्या अंबरा

साद तू घातली, चैत्र हुंकारला
ऐक माझ्या फ़ुला, ऐक ना तू जरा

- प्राजु

गालगा, गालगा, गालगा, गालगा

2 प्रतिसाद:

kaivalya म्हणाले...

kahrach khup chaan chaan kavita aahet tumchya...

kaialya

Mrs. Asha Joglekar म्हणाले...

प्राजू, छान आहेत ग तुझ्या कविता (गजला)

Page copy protected against web site content infringement by Copyscape