बुधवार, १४ एप्रिल, २०१०

अहम्

कोण भुकेला व्याकुळ झाला, कधी कुणाचे अडले होते?
माझ्या हाती हे आयुष्य, मला हवेसे घडले होते..

कशास पाहू अंधारात मी, कोण मुक्याने रडले होते..!!
आकांक्षांचे वारू माझ्या, कधीच नभाला भिडले होते..

वळणावरती मला पाहूनी, हात कुणी वेंगाडले होते
नजरेमधल्या गुर्मीतून मी, पितरांसही हासडले होते

प्रेम मित्र माया ममता, यांच्याविना का अडले होते??
शब्द हे सारे पुस्तकातले, पुस्तकातच सडले होते

"अहम" विना मी जगू कसा..!! त्यातच सारे नडले होते..
परोपकार मी करू कसा? , हातच हे अवघडले होते ..

मीच आणि मीच फ़क्त, हेच सत्य सापडले होते
हेच मनाला पटवुन देण्या, जीवन मी पाखडले होते..

"अहम" साठी केले इतुके!!, प्राक्तन का तरी चिडले होते?
घडले घडले म्हणता म्हणता, सर्वच अता बिघडले होते..

Page copy protected against web site content infringement by Copyscape