गुरुवार, २५ मार्च, २०१०

सोनसाजिरी पौणिमा..

पुनवेवरती राग धरूनी, आवस धुसफ़ुसली
काळोखाला घेत साथीला, चंद्रकळा लपविली..

भरात आला खेळ मोडला, अवनी थरथरली
अवकाशाला रिक्त पाहूनी, मूकपणे रडली

उदास झाल्या अवनीसाठी, 'प्रथमा' मग धावली
चंद्रकोर ती नाजूक रेखीव, आकाशी सजली

रोज नव्याने पुन्हा पुन्हा ती, कोर नटू लागली
संध्याराणी तिच्या दर्शने, गोड हसू लागली

नव्या यौवनी चंदाराणी, मोहरूनिया गेली
तिला रिझविण्या सागरलाटही, उचंबळू लागली

लाटांनी मग शुभ्र फ़ुलांची रांगोळी रेखिली
क्षितिजावरती सोनसाजिरी, पौणिमा झळकली

- प्राजु

Page copy protected against web site content infringement by Copyscape