सोमवार, ८ मार्च, २०१०

इमर्जन्सी - २

तो लेकाला खांद्यावर सावरत माझ्याकडे हसत हसत बघत.. "चल आत जाऊया" असं म्हणाला. जाऊदे ...त्याला काय कळणार ! आम्ही आतमध्ये गेलो.


आतमध्ये गेल्या गेल्या पडद्या-पड्द्यानी बंद केलेल्या एका रूममध्ये मला नेलं. त्या गुलाबी रंगाच्या झगा घातलेल्या नर्सने पट्टेरि पट्टेरी (मुंबईचा जावई सिनेमामध्ये शरद तळवळकर ज्या प्रकारच्या अर्ध्या पँटीत हिंडत असतो तसल्या )कापडाचा गाऊन म्हणून काहीतरी घालायला दिलं. "प्लिज टेक ऑफ योर क्लोथ्स अण्ड वेअर दिस गाऊन" अशी विनंती वजा आज्ञा करून ती चालती झाली. तो सो कॉल्ड गाऊन मी उघडला. त्याला फक्त बाराबंदीसारखे बंद होते बांधायला, ते ही फक्त दोनच.. दोनबंदीच होती ती. झालं.. !! मी जमेल तिकडून झाकत झाकत ती दोन बंदी घातली. ती घातल्यानंतर, शक्य तितकं 'मी कम्फर्टेबल आहे..' असं दाखवत मी त्या व्हील वाल्या बेड वर जाऊन बसले. नवरा शेजारच्या खुर्चित अर्धवट झोपलेल्या लेकाला सावरत्-सांभाळत बसायचा प्रयत्न करत होता. मी एकदा कसंनुसं त्याच्याकडे बघून हसून घेतलं. इतक्यात आणखी एक नर्स आली मात्र यावेळी तिचा झगा निळा होता. तिने पुन्हा एकदा बीपी बघितलं. (दोन्-अडीच तास वेटिंगमध्ये बसून बसून वाढलं असेल की काय अशी शंका आली असावी) हातातल्या पॅडला लावलेल्या पेपरवर जास्तीतजास्त गचाळ अक्षरात काहीतरी लिहून , पुन्हा एकदा माझं नाव, माझ्या नवर्‍याचं नाव, विचारलं. माझ्या नावाचं पार कडबोळं करून तो निळा झगा निघून गेला. मग आणखी पाच मिनिटं गेली.. आणि मग पुन्हा एक निळा झगा घातलेला नर्स आला. त्याने सोबत आणलेल्या ट्रे मधून बरंच काय काय काढलं, आणि मग माझ्या छातीवर, पोटावर आणि कमरेवर स्टीलची प्रेस बटणं असलेली स्टिकर्स चिकटवली आणि त्या प्रत्येक बटणावर एकेक वायर लावून माझ्या मागे असलेल्या मॉनिटरला त्या सगळ्या वायरी जोडल्या. उजव्या हाताच्या पहिल्या बोटावर एक स्टीकर लावून त्यातून एक वायर कुठेतरी जोडली. आणि जोरात बीऽऽऽऽप असा आवाज करून तो मॉनिटर चालू झाल्यावर माझ्याकडे एकदा निर्विकारपणे हसून तो निघून गेला. नवरा वरती चालू झालेल्या मॉनिटरकडे बघत होता. पण त्याच्या चेहर्‍यावर काही भितीदायक भाव दिसले नाहीत्..(त्याला बहुतेक काही कळत नव्हतं त्या ढीगभर वेड्यावाकड्या हलणार्‍या रेषांमध्ये.). इतक्यात डॉक्टर आले. त्यांचा झगा मात्र शुभ्र पांढरा होता. त्यांनी, त्या मशिनमधून इ सी जी ची प्रिंट काढली आणि.. "योर हार्ट इज गुड, आय डोन्ट सी एनी प्रोब्लेम हीअर.." असं म्हणत ती प्रिंट माझ्या नवर्‍याच्या हातात दिली. काय??? हार्ट इज गुड??? असं कसं होइल? मला तर अजूनही दुखत होतं. डॉक्टरना तरी काही कळतंय की नाही याची शंका यायला लागली. मग डॉक्टर म्हणाले,"आपण ब्लड टेस्ट आणि एक्स्-रे काढून बघू. " डॉक्टर निघून गेले. एकूण हा प्रकार आणखी किमान २-३ तासांचा होणार असं दिसत होतं. मी नवर्‍याला , लेकाला माझ्या मैत्रीणीच्या घरी घेऊन जायला सांगितलं. तिथे त्या अडगळीतल्या खुर्चित कितीवेळ तो बसून राहणार त्याला घेऊन!! नवरा लेकाला घेऊन गेला. आता त्या पडद्या-पडद्याच्या खोलीत मी, तो मध्येच बिपबिपणारा मॉनिटर आणि अंगावर लावलेल्या छपन्न वायरी इतकेच उरलो.

इतक्यात पडदा हलल्यासारखा झाला आणि पुन्हा एक निळा झगा आत आला. यावेळी झग्याचा घेर बराच मोठा होता. तिने ब्लड सँपल घ्यायला आले असल्याचं सांगून ट्रे मधल्या ४-५ टेस्ट ट्यूब्स दाखवल्या. एका पॅकेटमधून सुई काढली . माझ्या दंडाला घट्ट एक रबर बांधून माझी शीर शोधायचा प्रयत्न करू लागली. अंगावर एकूनच टोचाटोची करायला मला आवडत नाही . लहानपणी कधीतरी कान टोचले असतील तेव्हढेच, त्यापुढे मी कधीही काहीही टोचून घ्यायच्या भानगडीत पडले नाही. त्यामुळे मी तिच्या भल्या मोठ्या पण गोर्‍या मुखड्याकडे आणि तिच्या हातातल्या त्या सुईकडे पद्धतशीर पणे न पाहण्याचे ठरवले आणि दुसरीकडेच पाहू लागले. तिला माझी शीर लवकर सापडली असावी कारण तीने हात हातात घेतल्यानंतरच्या पाचव्या सेकंदाला "आईऽऽऽगं!" अशी जोरदार किंचाळी माझ्या तोंडून बाहेर पडली, डोळ्यांत पाणी आलं, आणि मनामध्ये त्या झग्याच्या पुढच्या आणि मागच्या बर्‍याच पिढ्यांचा उद्धार करून झाला. ती अजून काहीतरी खेळ करत असतानाच एक अतिशय गंभिर चेहर्‍याचा, गडद निळ्या रंगाचा झगा आत आला. या बाईसाहेब बर्‍याच अनुभवी असाव्यात. कारण या आत आल्यावर माझ्या शेजारी बसलेला आधीचा निळा झगा एकदम आदबशीरपणे या गडद निळ्या झग्याशी बोलू लागला. गडदनिळ्या चष्मेवाल्या झग्याने एका प्लास्टिकच्या कप मधे स्ट्रॉ घालून काहितरी प्यायला दिले. देण्या आधी ,"इट टेस्ट्स विअर्ड, बट यू हॅव टू ड्रिंक इट , हनी!!" असा मधाळ इशारा देऊन तीने ती स्ट्रॉ माझ्या तोंडात कोंबली. एकीकडे तो घेराचा झगा माझं रक्त शोषतच होता. ते कसलंस औषध प्याल्यावर .. माझ्या घशापासून आंतड्यापर्यंत सगळा भाग बधिर झाल्यासारखे वाटू लागले. आणि एकदम उलटीची भावना झाली.. त्या नादात मी त्या निळ्या झग्याच्या हातात असलेला हात हलवला आणि तो झगा एकदम चिडला. "आय नीड टू ड्रॉ फ्रॉम द अदर हँड, आय कॅनॉट टेक दिस सँपल.." शक्य तितका चेहरा शांत ठेवायचा प्रयत्न करत ती म्हणाली. इतक्यात चष्मेवाल्या झग्याने "आय वील डू दॅट.. डोन्ट वरी." असं सांगितलं. तो निळा झगा दात्-ओठ खात निघून गेला. मग पुन्हा एकदा दुसर्‍या हाताची शीर शोधून पुन्हा एकदा "आईऽऽऽऽगं!", पुन्हा एकदा डोळ्यांत पाणी आणि पुन्हा एकदा पुढच्या आणि मागच्या बर्‍याच पिढ्यांचा उद्धार असं होत पुन्हा एकदा माझं रक्त त्या ४-५ टेस्ट ट्यूब्स मध्ये घेतलं. मग त्याच सुईमध्ये सलाईन लावून, त्या सलाईन मधून कसलंस इंजेक्शन देऊन तो चष्मेवाला झगा निघून गेला. एका ट्रॉलीवर संगणक घेऊन येऊन पुन्हा एकदा माझं नाव, पुन्हा एकदा नवर्‍याचं नाव, पुन्हा एकदा इन्शुरन्स कार्ड, पुन्हा एकदा माझ्या नावाचं कडबोळं करून तो झगा निघून गेला. सलाईन संपलं तसं, सुई तशीच ठेऊन फक्त सलाईनचा स्टॅण्ड काढून टाकण्यात आला.

यानंतर मी जरा निवांत होत होते इतक्यात, एक चिमणीसारखा इवलुस्सा चष्मेवाला चेहरा, पडदा बाजूला सारून आत बघू लागला. माझं लक्ष जाताच, तोंड भरून हसून्.."हाऽऽऽय! यू आर प्रजॅक्टा??" असं विचारण्यात आलं मला. (प्रजॅक्टा..!! कप्पाळ माझं!!) झोपाळलेल्या मी, मानेनेच 'हो' म्हंटले.. तसा पडदा बाजूला सारून चिमणी आत आली. आणखी एक झगा ..पांढराच, फक्त फुलाफुलाचा!!! "आय एम हिअर टू टेक यू टू द एक्स्-रे रूम. " असं म्हणत म्हणत बेड्चा माझ्या मागचा भाग थोडासा वरती घेत बेडच्या दोन्ही बाजूंचं रेलिंग वरती सरकवत , मला दोन्ही हात आतमध्येच ठेवण्याची सूचना देत चिमणीने तो बेड ढकलायला सुरूवात केली. चिमणी बरीच स्ट्राँग होती, माझ्यासकट बेड ढकलू शकत होती. ;) एक्स्-रे रूम मध्ये गेल्यावर माझ्या पायावर चिमणीने मोजे चढवले. मोजे चढवता चढवता.."ओऽऽह गॉड! यू हॅव अ व्हेरी टायनी फीट.. वॉट्स योर साईज?" अशी हलकट कॉमेंटही पास केली. जरा रागच आला मला. मग अशी उभी रहा, तशी उभी रहा.. असं करत चिमणीने एक्स्-रे चं काम पूर्ण केलं आणि पुन्हा तो बेड, ते साईड रेलिंग, पुन्हा माझ्यासकट ढकलगाडी...! माझ्या त्या पडद्या पडद्याच्या रूम मध्ये मला आणून ठेवलं. चिमणीने मगाशी काढलेल्या त्या सगळ्या वायरी पुन्हा सगळीकडे जोडल्या, मॉनिटर चालू झाला आणि चिमणी गोऽऽड हसून निघून गेली.

आता मात्र मला सॉल्लिड झोप यायला लागली. एव्हाना २ वाजत आले होते. नवरा आला होता लेकाला माझ्या मैत्रीणीकडे ठेवून. त्या सांद्रीतल्या खुर्चित बसल्या बसल्या डुलक्या काढू लागला. आता हे ब्लड रिपोर्ट येणार, एक्स्-रे रिपोर्ट येणार आणि मग मला माइल्ड हार्ट अ‍ॅटॅक येणार होता असं निदान होणार.. अशी स्वप्नं रंगवत मी अर्धवट झोपी गेले. मध्येच कधीतरी हॉस्पिट्ल मधून कसले कसले आवाज होत होते. शेवटी ३ वाजले आणि माझे पेशन्स संपले. नवरा जाऊन त्या चष्मेवाल्या झग्याला भेटून आला. झग्याने रिपोर्ट तयार होतो आहे असे सांगितले. आणि मग बरोबर २० मिनिटांनी येऊन, माझ्या हातावरची ती सलाइन ची सुई काढून तिथे कापूस आणि पट्टी लावून, तिने रिपोर्ट्स नवर्‍याकडे दिले आणि "यू आर ऑल सेट.." असं सांगितलं. रिपोर्टमध्ये नक्की कशामुळे दुखलं छातीत याचं निदान न झाल्याचं लिहिलं होतं. मात्र पुन्हा दुखायला लागल्यावर ताबडतोब येण्याची सूचना होती. म्हणतात ना, न्हाव्याच्या हातात एकदा डोकं दिलं की, तो पूर्ण भादरूनच सोडतो.. त्यातला प्रकार. घरी आलो आणि झोपी गेलो.

मार्च २, २०१०. सकाळपासून बरी होते. दुखत होतंच छातीत. पण पुन्हा इमर्जन्सी ला जायचं धाडस नाही झालं. तो दिवस आणि पुढ्चा ३ तारखेचा दिवस तसाच काढला. मात्र ४ तारखेला खूप दुखायला लागलं. वाटलं, आता मात्र नक्कीच हार्ट अ‍ॅटॅक येणार. नवरा ऑफिसमध्ये होता. पुन्हा एकदा हार्ट्फर्ड मेडिकल सेंटर ला फोन लावून , हार्ट स्पेशालिस्टची अपॉइंट्मेंट घेतली. डॉ. आयज्ली नाव होतं त्यांचं. हे मात्र वयस्कर होते. कुठेही काहीही टोचाटोची न करता, केवळ हाताने तपासून त्यांनी निदान केलं, "दोन्ही बरगड्या जिथे जुळतात त्या ठिकाणी इन्फेक्शन होऊन सूज आली आहे.." उपाय?? साधाच, थोडी हाय पॉवरची पेन किलर!

सगळे सोपस्कार पूर्ण करून ती पेन किलर विकत घेऊन घरी आले. डोक्यावरचं खूप मोठं ओझं कमी झाल्यासारखं वाटत होतं. इमानदारीत त्या गोळ्या घ्यायला सुरूवात केली. मात्र..!!! त्या इतक्या हेवी डोस गोळ्यांनी पोटात ढचमळायला सुरूवात झालीये. आता याचं काय करू??

- प्राजु

(पुन्हा एकदा.. वरील छातीत दुखणे आणि इमर्जन्सीला जाणे या घटना सत्य आहेत, मात्र विनोद निर्मितीसाठी थोडाफार कल्पना विस्तार केला आहे.)

2 प्रतिसाद:

Shreya म्हणाले...

बाई गं ...खरंच इथे इमर्जन्सीत जाणं हा भारी अनुभव आहे. गेल्या वर्षी पोलन अ‍ॅलर्जीने माझा नवरा हैराण झाला आणि त्याला श्वास घेणे अवघड झाले तेव्हा हा अनुभव आला. मस्त मांडलयस तू!

abhijit म्हणाले...

khup surekh padhhatine tu mandles tyamule vachatana khup enjoy karayla milale. jo tula janavlela tras hota to tu etkya mishkil padhatine hasatkhelat mandla ahes! hats of you!!

Page copy protected against web site content infringement by Copyscape