मंगळवार, १६ मार्च, २०१०

संतू!!

"आत्त्या.. मी काय कराय णाई..! भांडी आपोआप खाली पडल्यात.." हे असलं बोलणं म्हणजे नक्कीच संतू. कराय णाई, बगाय णाई, दिसाय णाई.. अशी क्रियापदांची धिरडी हा संतूच करू जाणे..

संतू!! खरं नाव चंद्रकांत ढवणे(ढवने). याची मोठी बहीण माझ्या मामाकडे कामाला होती. मामाकडेच लहानपणापासून राहिलेली तिथेच वाढलेली. आमचं बिर्‍हाड जेव्हा इचलकरंजीहून कोल्हापूरला हललं तेव्हा माझ्या आईच्या मागे लागून हीने याला आमच्यासोबत कोल्हापूरला पाठवून दिला. "तुमच्या घरी कामाल राहुदे.. तिथे काहीतरी शिकेल आणि र्‍हाईल.." असं म्हणून तिने त्याला आमच्यासोबत पाठवून दिलं. हा संतू म्हणजे माझ्या मामाच्या घरी कामाला असणार्‍या सुशिलाचा भाऊ.. इतकीच काय ती त्याची ओळख होती आम्हाला.

कोल्हापूरला हा आला आणि आजी-आजोबांपासून तेव्हाचे आमचे घरमालक आण्णा शिरगांवकर यांच्यापर्यंत सगळ्यांचाच तो "नारायण "झाला. आण्णा खाली रहात असत आणि आम्ही वरच्या मजल्यावर. कोल्हापूरातली पहिली ३-४ वर्षं आम्ही या आण्णांचे भाडेकरू होतो. बंगल्याच्या आवारातल्या पेरूच्या, आंब्याच्या झाडावर चढून पेरू आणि आंबे उरवण्यापासून भाकरी करण्यापर्यंतची सगळीच कामे हा करू लागला. अतिशय हुशार डोक्याचा. माझ्या आजोबांनी त्याला 'संतू ' या नावावरून संतराम्-संतरामबापू.. अशी नावे दिली. माझ्या आजोबांशी याची चांगलीच जोडगोळी जमली होती. आजोबांना फिरायला नेण्यापासून त्यांच्याशी वाद घालण्यापर्यंत हा संतू सगळी कामे करायचा.

वयानं माझ्यापेक्षा एखादं वर्ष लहान असेल नसेल. तो आमच्या घरी आला तेव्हा मी नववीमध्ये होते. घरी भांडी घासायला येणार्‍या मावशीबाईं, आणि हा.. दोघांची जुगलबंदी एकदा सुरू झाली की आमची छान करमणूक व्हायची. नात्यातल्या कोणाची तरी सायकल याला मिळाली आणि बाहेरची कामेही हा करू लागला. वाचायचा अखंड नाद . आई माझी लेखिका असल्याने तिच्या जवळ असलेली नसलेली सगळी पुस्तके वाचून काढली त्याने. लहान होता... नाही म्हंटले तरी एक थर्मास, एक ट्यूब लाईट, यांची मोडतोड झाली होतीच. तेव्हापासून घरामध्ये काहीही पडल्या झडल्याचा आवाज आला की, आई.."संतूऽऽऽऽ!! काय पडलं?? काय फुटलं??" असं विचारयची. एकदा तरी, बाबांच्या जुन्या येझ्दी मोटरसायकल चा हॉर्न काढून ठेवलेला याल कुठतरी माळ्यावर मिळाला. याने लगेच तो खाली काढून, त्याच्या वायर्स सॉकेट मध्ये घालून पाहिल्या. झालं!! त्या जुन्या बंगल्याचं जुनं वायरिंग.. एका झटक्यात शॉर्ट सर्किट झालं. आणि आमच्या टिव्हीतून धूर आला. त्या दिवशी बाबा खूप चिडले होते. मात्र तो पर्यंत या संतूने सर्वांना इतका जीव लावला होता की, त्याला परत त्याच्या बहिणीकडे पाठवावे असे वाटले नाही कोणालाही. असंच एकदा, मी काहीतरी माझ्या कपाटामधून काढायला गेले आणि माझी पुस्तके, कंपास बॉक्स असं काय काय खाली पडलं.. कोणी काही विचारायच्या आधीच संतू माझ्या आईला म्हणाला,"आत्त्या, मी बाथरूम जवळ आहे.. मी काही नाही पाडलं." तेव्हा त्याच्या मिश्किल स्वभावाचं कौतुक वाटलं होतं.

माझी दहावी झाल्यावर आई-बाबांनी त्याला बाहेरून दहावीला बसवले. माझी पुस्तके, वह्या घेऊन हा अभ्यास करू लागला. एकेठिकाणी त्याला क्लासही लावला. क्लासमध्ये शिकून , घरी अभ्यास करणे सुरू झाले. दरम्यान आम्ही आमचा बंगला बांधला.. तिथे रहायला गेलो. माझे बाबा तेव्हा, नवमहाराष्ट्र स्पिनिंग मिल्स, साजणी, इचलकरंजी .. इथे मिल्सच्या क्वार्टर मध्ये रहात होते. आमची शिक्षणं आणि आईची नोकरी कोल्हापूरात असल्याने आम्ही इथेच होतो. संतू, बाबांच्या सोबत तिथे क्वार्टरवरती रहायला गेला. एम डी साहेबांचा केअर टेकर.. अशी त्याची पोस्ट होती. ;) स्वयंपाक करण्यापासून, घर स्वच्छ ठेवण्यापर्यंत तो करत असे. बाबांच्यासोबत कोल्हापूरलाही येत असे.

एकदा असंच काहीतरी आईने सांगितलेलं काम घेऊन हा बाहेर गेला होता. कोणती तरी बिल्डिंग शोधत होता. त्याने तिथल्याच एका रिक्षा वाल्याला विचारलं.. "काय हो भाऊ, अमुक अमुक बिल्डींग कुटं हाय?" रिक्षावाल्याने शांतपणे त्याच्याकडे पाहिलं , आणि मग 'काय मुर्ख माणूस आहे' अशा आविर्भावत त्याने रिक्षाचा आरसा १८० अंशात फिरवला आणि त्यात बोट करून म्हणला त्याला.."ही बघ हितं हाय ती बिल्डींग.." ही बिल्डिंग हा उभा होता त्याच्या मागेच होती. :) याला नेहमीच माणसं अशी विचित्रच भेटत. कुठे गेला आहे आणि सांगितलेलं काम सरळपणाने करून आलाय.. असं कधीच नाही झालं. सतत गमतीदार किस्से घडत याच्यासोबत.

आपापलं शिकायचं पोहायला म्हणून टायरट्यूब घेऊन आला आणि कोल्हापूरच्या राजाराम तलावावर पोहायला जाऊ लागला. तो तलाव माळरानावर आहे. बांधीव नाहीये. तिथे हा नियमित जात असे आणि आज किती पोहोलो, काय काय केलं, किती म्हशी आल्या होत्या, .. याचं रसभरीत वर्णन करून सांगत असे. मात्र एकेदिवशी हा पोहून आला आणि सोफ्याच्या कडेला बसून राहिला नुसताच. एकदम शांत, भेदरलेल्या अवस्थेत..काहीही बोलायला तयार नाही. एक्-दोन वेळा विचारलं तर काहीच सांगेना काय झालंय ते. आईने थोडं रागावून विचारल्यावर मात्र जे काही त्यानं सांगितलं.. ते ऐकून मात्र हसून हसून लोळायची वेळ आली. तर त्याने सांगितलेला किस्सा त्याच्याच शब्दांत..

- तिथं पोहयला गेलो तर एक जाडच्या जाड माणूस आधीच आत पाण्यात डुंबत होता. आणि माझ्याबरोबर आणखी एक मुलगा होता आज. त्यानं मला विचारलं," तुला येतंय का रं पवायला." मी म्हणालो.."नाही , अजून टायरट्यूब घेऊनच पोहोतोय." मग तो म्हणाला,"अरे ही ट्यूब घ्यून किती दिस पोवनार?? त्यो रेडा बघ कसा.. मस्त डुंबतोय" असं तो त्या जाड माणसाकडे बोट दाखवत म्हणाला. मी बघितलं तर तो माणूस आमच्याच कडं येताना दिसला. तो जवळ आला.. आणि त्याने त्या मुलाला दोन्ही हातांनी उचलला आणि पाण्याच्या बरोबर मध्यात जाऊन फेकून दिला. तो मुलगा..ओय ओय ओयोय... करत लांब पाण्यात जाऊन पडला.. आणि तिकडच्या बाजूच्या काठापर्यंत पोहत जाऊन तिथून पळून गेला. मग तो जाड माणूस माझ्याकडे पुन्हा वळला.. मी आपला लग्गेच्च्च ती टायरट्यूब घालून बसलो.. तो जवळ यायला लागला तसं मला लई भिती वाटायला लागली. तो माणूस जवळ आला आणि गणपत पाटलांसारख्या आवाजात म्हणाला.."पावनं.. लोक काय बी बोलुद्यात आपण शिकायचं सोडाचं न्हाय. कल्ळं का?" मी आपली मान डोलावली आणि कपडे घालून परत आलो... मला त्यानं फेकलं असतं तर.. मला तर पोहायला बी येत नव्हतं.. म्हणून ट्यूब घालून बसलो व्हतो...
झालं !! हे त्यानं सांगितलं आणि.. आम्ही जे हसत सुटलो ते सुटलोच.

एकदा आमच्या लॅब्रॅडॉल कुत्रीला फिरवायला म्हणून घेऊन गेला. तीने फिरता फिरता एका बंगल्याच्या समोर केलेल्या सिमेंट्च्या उतारावर छोटा कार्यक्रम आटोपून घेतला. बंगल्याचा मालक आवारातच होता कुठेतरी. तो आला.. आणि त्याने चिडून संतूला विचारलं, "काय रे ए.. समजत नाही का तुला? काय हे केलंय इथं?" .. याला काय बोलावं कळेना.. पण एकदम म्हणून गेला.."काका, मला कळून काय उपयोग.. हिला कळायला नको का?".. मालक बिचारा काय बोलणार. निर्विकारपणे तिथून निघून गेला.

संतू.. !! बाबांनी त्याला नोकरीला लावला. नोकरी करता करता नाईट कॉलेजला जाऊ लागला होता. आता आमच्या घरी रहाणे त्याला रूचेना. बाहेर भाड्याने खोली घेऊन राहू लागला. अधून मधून भेटायला येत होता. रक्षाबंधन आणि भाऊबीजेला न चुकता यायचा. मला नेहमीच काहीतरी भेट देऊन जायचा. माझ्या लग्न झाल्यावर पुण्यालाही आला होता १-२ वेळा. माझ्या पिल्लूच्या जन्मानंतर मी आईकडे जितके दिवस होते तितके दिवस न चुकता मला आणि पिल्लूला भेटायला येत होता.
मागच्या भारत भेटीत आईकडे गेले तेव्हा समजलं की, त्याला दोन वर्षापूवी पंजाबात कुठेतरी नोकरी लागली होती आणि तो तिकडे गेला होता. मात्र नंतर तो कधीच आला नाही कोल्हापूरला. त्यानंतर कधी भेटलाही नाही.
संतू .. पुन्हा कधी भेटेल, कुठे भेटेल.. काहीच नाही माहिती. पण जिथे असेल तिथे सुखी असावा ..
अजूनही आशा आहे.. कधी तरी आईकडे गेले असता.. त्याचं "मी बघाय णाय ताई..." हे क्रियापदाचं धिरडं नक्की बघायला मिळेल.

- प्राजु

1 प्रतिसाद:

Girish म्हणाले...

Chann lihila ahey... aawadlaa... :) Pan Santu ghari kadhi janaar asa prashna pan ahey... :(

Page copy protected against web site content infringement by Copyscape