सोमवार, ८ मार्च, २०१०

जन्मा येण्या कारण तू !

जन्मा येण्या कारण तू, प्रितीचं अभिसारण तू
सारे जीवन फ़ुलवणारी, सुखाची पाखरण तू..

वसंताचं आगमन तू, कंच हिरवा श्रावण तू
सावळ्या नभी फ़ुललेलं, शरदाचं चांदण तू..

सळसळणारं यौवन तू, निळंजांभळं गगन तू
क्षितिजावरती पसरणारं, लोभस सूर्यकिरण तू..

लावण्याची उधळण तू, नात्यांमधली गुंफ़ण तू
अनेक धागे बांधणारं, एक अतूट बंधन तू..

दु:खाला लिंपण तू, मायेचं शिंपण तू
गंधभरल्या फ़ुलाफ़ुलांचं, सुंदर मोहक अंगण तू..

शुभशकुनांचं तोरण तू, मांगल्याचं औक्षण तू
झिजतानाही दरवळाणारं, देव्हार्‍यातलं चंदन तू..

भाळावरचं गोंदण तू, नवरत्नांचं कोंदण तू
विसवण्या या जगताला गे, मिळालेलं आंदण तू..

- प्राजु

सर्वांना महिलादिनाची हार्दिक शुभेच्छा!!

Page copy protected against web site content infringement by Copyscape