रविवार, ७ मार्च, २०१०

इमर्जन्सी! -१

इमर्जन्सी..


दि. मार्च १, २०१०. सकाळपासून चहाशिवाय चालत नाही या सबबी खाली टमरेल भरून चहा, आणि सोबत बरंच सटरफ़टर खाऊन झालं होतं. वेळ जात नव्हता म्हणून की काय अधे मध्ये (खाण्यातून ) वेळ मिळेल तेव्हा, इमेल चेक करणे, त्यांना उत्तरे देणे, आणि घरातलं काम हे ही करत होते. आदल्या दिवशी होळीरे होळी पुरणाची पोळी असा शंख करत पुरणाच्या पोळ्या हादडल्या होत्याच. पुरणाची पोळी दुसरे दिवशी सुंदर लागते, त्यामुळे ती खायला हवीच, अशी मनाची समजूत घालून भरपेट नाष्टा केल्यावर , दुपारचं जेवणंही तितकंच व्यवस्थित केलं होतं. एकूण काय "पोटाला विश्रांतीची गरज नसते" असा समज करून घेऊन पोटाची व्यवस्थित काळजी घेतली जात होती.
आणि अचानक दुपारनंतर लक्षात आलं, की आपल्याला छातीमध्ये दुखते आहे. छातीमध्ये थोडंसं डाव्याबाजूला सतत दुखते आहे. कशामुळे असेल असा अंदाज बांधायचा प्रयत्न केला.. तर समोर फ़क्त माझ्या पुरणपोळ्याच आल्या. :( गॅसेस!! हम्म!. संध्याकाळपर्यंत हे दुखणं जरा जास्तीच दुणावलं. (कशाला खाव्यात इतक्या पुरणपोळ्या!!) असो. हे जेव्हा असह्य झालं तेव्हा मात्र मी, आमच्या इथल्या हार्टफ़र्ड मेडिकल सेंटरला फोन केला आणि अपॉइंट्मेंट मागितली. पण ७ वाजून गेले असल्याने अपॉइंटमेंट ची वेळ निघून गेली होती. त्या अटेंडंटने काय होतंय असं विचारल्यावर , "आय हॅव अ चेस्ट पेन" असं दाबात उत्तर दिलं मी. घाबरून तिने नर्सला निरोप दिला. आणी थोड्याच वेळात नर्सचा फ़ोन आला. तिने काही लक्षणे फ़ोन वर विचारली. "छातीत डाव्या बाजूला दुखते आहे, ते कोणीतरी छातीवर बसून राहिल्यासारखे दुखते आहे का?" मी,"हो." ती," पाठीमध्येही दुखते आहे का? " मी, "हो". ती," श्वास घ्यायला त्रास होतो आहे का? मी, "नाही." ती,"दीज आर द सिम्पट्म्स ऑफ़ अर्ली हार्ट अ‍ॅटॅक. आणि तू ३० प्लस आहेस ना?" मी (जरा रागातच) "हो." मनातंतल्या मनांत "तुला काय करायचंय माझ्या वयाशी??" ती," तू एकदा तुझा इ सी जी करून घे. आजच्या आज इमर्जन्सी ला जाऊन सगळे चेकप करून घे." झालं!! माझं धाबं दणाणलं. मला हार्ट अ‍ॅटॅक!! माझ्या मुलाचं काय होईल?? माझ्या नवर्‍याचं काय होईल??

आता इ सी जी करायला इमर्जन्सी मध्ये जायचं म्हणजे काय होइल काही सांगता नाही येत. म्हणून अतिशय जड अंत:करणाने मुलाला, नवर्‍याला जेवायला वाढलं. मनात म्हंटलं,"खाउन घ्या आज भरपूर, उद्यापासून माझ्याहातचं खायला मिळेल कि नाही माहिती नाही." डोळे भरून आले माझे. नवरा म्हणाला "तू ही जेवून घे." पुन्हा मनांत म्हंटलं,"हो रे.. आता पुन्हा तुम्हा दोघांबरोबर जेवायला मिळेल की नाही माहिती नाही." आणि डोळे टिपत जेवायला बसले. माझ्या डोळ्यांत पाणी बघून नवरा म्हणाला ,"खूप दुखते आहे का? थांबेल , तू जेवून घे." त्याला बिचार्‍याला काय माहिती माझ्या डोळ्यांत पाणी कशामुळे आले ते!!

जेवणं आटोपली आणि आम्ही एमर्जन्सीला जायला निघालो. मुलाला मैत्रीणीकडे ठेवूया असा विचार आला मनांत, पण नको!! राहुदे, तो माझ्या नजरेसमोर असलेला बरा. काय माहिती मी आलेच नाही हॉस्पिटलमधून घरी तर!!... मी माझ्या पर्स मध्ये मला लागणार्‍या वस्तू घेतल्या. इन्शुरन्सच कार्ड घेतलं. पाण्याची बाटली घेतली (शेवटच्या वेळी उपयोगी पडेल कदाचित!! जाता जाता हॉस्पिटलचं पाणी नको तोंडात पडायला). शेवटी कपडे भरायला लागले तेव्हा मात्र नवर्‍याचे पेशंस संपले. त्याचा चेहरा बघून मी कपडे भरायचा विचार रद्द केला. इमर्जन्सी ला गेलो. तिथे गेल्या गेल्या मला जाणवलं आपला डावा हातही दुखतो आहे... म्हणजे हे नक्कीच हार्ट अ‍ॅटॅकचे लक्षण आहे. तिथे प्रायमरी चेकप मध्ये माझं बीपी पाहिलं गेलं आणि नाव नोंदवून घेऊन आम्हाला वेटिंग रूम मध्ये बसवलं. वाटलं, साधारण अर्ध्या तासात आत घेऊन जातील. घड्याळात पाहिलं ८.३० वाजले होते रात्रीचे. आमच्या सारखेच तातडीची सेवा हवे असलेले खूप लोक त्या वेटिंग रूम मध्ये होते.

समोर टिव्हीवर एकापाठोपाठ एक विनोदी मालिका सुरू होत्या. एक बाई व्हिलचेअर बसून पोट धरून कण्ह्त होती. हम्म.. अपचन झालं असणार हिला. एक सधारण २४-२५ वर्षाची मुलगी तिच्या तान्ह्या मुलीला घेऊन आली होती. तिच्यासोबत साधारण एक ४५ वर्षाची बाई होती , तिची आई असावी. नक्की कोणासाठी आले असावेत? मी विचार करत होते.. कारण त्या तिघिंपैकी कोणीही आजारी दिसत नव्हतं. आणि मग बघता बघता ४-५ बायका आलटून पालटून त्या तिघिंना तिथे येऊन भेटून गेल्या.. नक्की काय चालं होतं कहीच कळलं नाही. पण प्रत्येकीच्या अतिप्रचंड घेरामुळे जागा व्यापली गेली तिथली आणि अचानक फ़ारच गर्दि झाल्यासारखे वाटू लागले. असेच आजूबाजूचे निरिक्षण करण्यात तास भर निघून गेला. आता छातीतले दुखणे वाढू लागले आहे असे जाणवले. पाठितही ठणका वाढला. मी रिसेप्शन ला जाऊन विचारले ती म्हणाली "तुझ्या आधी अजून ३ नंबर आहेत.. मग तुला आत बोलावतील." अरेच्च्या!! मला इथे हार्ट अ‍ॅटॅक होऊ घातलाय आणि ही मला माझ्या आधी ३ नंबर आहेत असे सांगते आहे!! रागच आला. पण काहीही न बोलता पुन्हा जागेवर येऊन बसले. दरम्यान नवर्‍याच्या मांडिवर लेक झोपी गेला. पुन्हा आजूबाजूचे परिक्षण निरिक्षण करण्यात दिड तास निघून गेला. मनांत आलं, "आता इथे बसल्या बसल्या मला हार्ट अ‍ॅटॅक येईल मग कळेल या इथल्या रिसेप्शनवालीला.." शेवटी रात्री १२ वाजता मला आत बोलावले. आणि अतिशय जड आंत:करणाने आजूबाजूच्या लोकांकडे मी पाहून घेतलं. लेकाच्या डोक्यावरून मायेने हत फ़िरवला.. त्याला जवळ घेतलं आणि नवर्‍याकडे असहाय्य पण दु:खी मनाने पाहिलं. तो लेकाला खांद्यावर सावरत माझ्याकडे हसत हसत बघत.. "चल आत जाऊया" असं म्हणाला. जाऊदे ...त्याला काय कळणार ! आम्ही आतमध्ये गेलो.

क्रमश:

(वरील 'छातीत दुखणे आणि इमर्जन्सीला जाणे' ही घटना जरी सत्य असली तरी बाकी माझा कल्पना विस्तार आहे. )

1 प्रतिसाद:

अमित बापट म्हणाले...

अमेरिकेत इमर्जन्सीत जाणे हा एक भयंकर अनुभव आहे. दोन वर्षापूर्वी मला असाच काहीसा अनुभव आला. रात्री भयंकर पोटात दुखायला लागलं. मग सकाळी सकाळी उठून डॉक्टरकडे धाव घेलती, तर त्याने अजूनच घाबरवलं. गॉल स्टोनची लक्षणं आहे, तेव्हा आत्ताच्या आत्ता तडक इमर्जन्सीमध्ये जा असं सांगितलं. मग काय आमची वरात तिकडे. बऱ्याच टेस्ट आणि ७-८ तास झाल्यावर मग सांगितलं की गॅस्ट्रायटीस आहे (म्हणजे जठराला जरा सूज येते इन्फेक्शनमुळे). कर्मं माझं..

Page copy protected against web site content infringement by Copyscape