स्वप्नातल्या क्षणांची..
स्वप्नातल्या क्षणांची नुरली ददात आहे
जाई जुई अबोली आल्या भरात आहे
आला वसंत वेडा, उधळीत दिव्य रत्ने
हा आम्र सोनियाचा, गातो सुरांत आहे
थेंबांस वेड भारी, अरशात पाहण्याचे
निथळूनिया जळी तो, बघ चिंब न्हात आहे
वेलीस चांदण्या या, निखळूनिया बिलगल्या
मज अंगणी बहरली, ही चांदरात आहे
पाहूनिया नभाचा, हा सोहळा अनोखा
हुंकारला ऋतूही, माझ्या मनांत आहे
मेंदीपरी सुगंधी, या कोवळ्या क्षणांना
हृदयात रेखिले अन, जपले उरांत आहे..
जडली नशा अशी की, मन नाचते बिलोरी
त्याचा न ठाव कोठे, दाही दिशात आहे
- प्राजु
1 प्रतिसाद:
वेलीस चांदण्या या, निखळूनिया बिलगल्या
मज अंगणी बहरली, ही चांदरात आहे ...... अप्रतिम कल्पना.. खुप आवडली !
टिप्पणी पोस्ट करा