स्वप्न नयनी पाखराचे..
स्वप्न नयनी पाखराचे अन मनी काहूर आहे
आंधळी ही वाट आणि- गाव माझा दूर आहे..
भावनांना जोड आहे शब्द आणि लेखणीची
गीत तरिही का जुळेना,... की हरवला सूर आहे?
मेघ आले दाटूनी अन मोर नाचू लागले, पण
पावसाची धार नाही?.. श्रावणा हुरहूर आहे..
घाव घाली दैव आणि मी जरी जगते तरी,
का अताशा जीवनाचा चेहरा भेसूर आहे?
नित सुखाच्या मृगजळाशी, बांधलेले स्वप्न माझे
बिंब त्याचे पाहवाया, वेदना मंजूर आहे
अंतरी या गाज थोडी अन निळाई सागराची
वादळाचे भय जरासे, लाट थोडी क्रूर आहे
रात्र घेते रोज हाती, चांदण्यांच्या या मशाली
का फ़ुलेना रातराणी, लोपला का नूर आहे?
- प्राजु
3 प्रतिसाद:
सुंदर गझल..!!
का कोण जाणे पण तुमची गज़ल माझ्याशी रक्ताचे नाते सांगते आहे असे वाटले.
सुंदर गझल....
सुंदर गझल....
टिप्पणी पोस्ट करा