बुधवार, २४ फेब्रुवारी, २०१०

रेंगाळते ही सांज अशी..

नकळत सरूनी जाई दिस हा
रेंगाळते ही सांज अशी
कातर होई चंद्र कोर ती
रातदिनाच्या उंबर्‍याशी..

जलधारांचा सूर कापरा
आर्त गाणे मज दाराशी
हळव्या गारा वितळून जाती
गीत नभाचे घेत उराशी..

लहरत जाती तरंग ऐसे
सलगी करती भासांशी
खोल साद ही मिसळून जाते
उसन्या माझ्या श्वासांशी..

गूढ जाणिवा अस्तित्वाच्या
घोंघावणार्‍या वार्‍याशी
निखाराही उब मागे
थिजून गेल्या पार्‍याशी..

बघता बघता दाटून येते
रात्र माझ्या आकाशी
थबकून राहते पहाट आणिक
क्षितिजावरच्या तार्‍याशी..
- प्राजु

Page copy protected against web site content infringement by Copyscape