कविते, हे तर तुझेच देणे..!
रात्र काळी, चंद्र भाळी
तरूण चांदणी नवी नव्हाळी
नशा आगळी, सूर पाघळी
सळसळणार्या रानोमाळी
पिसे जीवाला, वेड मनाला
झुळझुळ वारा, गंध ओला
कोण काजवा, उगा हासला
तिट लावतो अंधाराला
नक्षत्रांच्या सहस्र माळा
धरेच्या गळा, साज आगळा
पहाट वेळा, धुक्याची कळा
रंग केशरी, या आभाळा
गारठलेली, धरा ल्यायली
शुभ्र धुक्याच्या, गर्द शाली
सूर्यकणांची मैफ़ल सजली
क्षितिजावरच्या, भव्य महाली
पहाट लेणे, रूप देखणे,
किलबिल गाणे, नवे उखाणे
शब्द रंगणे, मनी गुंफ़णे
कविते, हे तर तुझेच देणे..!
- प्राजु
0 प्रतिसाद:
टिप्पणी पोस्ट करा