मंगळवार, १८ ऑगस्ट, २००९

सहज चाळले..

सहज चाळले आठवणींना जाता जाता
क्षणांत सार्‍या भरून आल्या बघता बघता

किती राहिले अवती भवती तुझ्या तरीही
आतुर मन हे तुझ्याच एका नजरे करता

"स्वप्नं नको मज!" ..म्हणून रात्री मी जागवल्या
भास तुझे ना कधीच आले मला टाळता

जनांत नाही डोळा कधीही आणले पाणी
मनांस झाल्या कितीक जखमा उठता बसता

स्पर्श तुझा तो जपून होता असा ठेवला
वादळ उठले उरांत माझ्या तो आठवता

डोळ्यांमध्ये दाटुन आली किती आसवे
दिले टाळूनी मीही त्यांना हसता हसता

अधुन मधुन मी आठवणींच्या गावी जाते
मन हे वेडे रुसून बसते मागे फिरता

किती पसारा करून जाती आठवणी या
धांदल माझी अशीच होते तो आवरता

- प्राजु

Page copy protected against web site content infringement by Copyscape