बुधवार, २६ ऑगस्ट, २००९

मन काहूर..

काहूरले मन सांजवेळ होता होता
हूरहूर लागे जीवा रात गूढ होता
क्षितिजास पहुडली कंटाळली वीज
डोळ्यातून परतूनी गेली आज नीज

तळपता रवी थकलेला संध्याकाळी
जळताना दिन सारा साचली काजळी
रेखले या काजळास अवनीच्या डोळा
सोनसळी आसमंत झाला गं सावळा

सावळ्या नभाची चढे चांदव्याला धुंदी
दूर दाट सावलीने थरारली फ़ांदी
इवल्याशा घरट्यात इवलासा श्वास
चोचीतल्या दाण्यालाही कोटराचा ध्यास

दूरदूर डोंगराचे शिखरही नीजे
काळ्या कागदास नक्षी चांदण्याची सजे
काळोखाचा आवाजही किर्रर्र दाटे असा
रात्रीवर उमटतो खोल खोल ठसा

नटलेली निशा पण मन हे काहूर
उदासच वाटे आज पावरीचा सूर
खोल अंतरात जसा अडकला स्पंद
गळा दाटलेला तरी फ़ुटेना का बांध??

- प्राजु

Page copy protected against web site content infringement by Copyscape