शनिवार, ७ फेब्रुवारी, २००९

वादळ (अंतिम)

( काही वर्षापूर्वी, सांगलीला आमच्या सोसायटीच्या गणेशोत्सवातील कार्यक्रमात सादर करण्याकरिता एक एकांकिका मी लिहिली होती. ती कथा रूपाने इथे लिहित आहे.मुंबईमध्ये १९९३ साली बॉम्ब स्फ़ोट झाले आणि त्यानंतर उसळलेल्या हिंदुमुस्लिम दंगली..याची पार्श्वभूमी कथेला आहे.)

(वैभवने थर्मासमधली कॉफी ओतून मगात घेतली आणि त्याच्या नेहमीच्या खुर्चित बसून पुस्तक वाचू लागला. कितिवेळ गेला कोणास ठाऊक...अचानक..दारावर थाड थाड आवाज आला...."दरवाजा खोलो... प्लिज दरवाजा खोलो.... वो मुझे मार देंगे..ओपन द डोर आय से...." थाड थाड.. थाड्ड्ड्ड...वैभव घाबरला... चरकला... आणि... घाबरत घाबरत.. पुढे झाला..दरवाजा उघडावा की नको... कोण असेल.... आपण एकटेच आहोत. जवळ शस्त्र नाही.. काय करावे..पण मनाचा हिय्या करून दरवाजा त्याने उघडला...)

-----------------------------------------------------------

आणि.. तो जागच्या जागी खिळून गेला. समोर कपाळावर घामाचे थेंब, डोळ्यात मदतीची आस हात छातीशी घट्ट बांधलेले... निळसर भुरे भेदरलेले डोळे.. घामाचे थेंब जमलेलं धारदार नाक ... फिकी हिरवट रंगाची ओढणी डोक्यावरून स्कार्फसारखी घेतलेली, फिकट पिवळ्या रंगाच्या उंची कपड्यात, एक असहाय्य तरूणी .... ! क्षणभर तो भांबावला. दार उघताच ती फक्त आत आली आणि भेदरलेल्या नजरेन तिने खोलीत सगळीकडे एकवार नजर टाकली आणि पटकन स्वतः दार लावून घेऊन दाराल टेकून डोळे मिटून उभी राहीली. काही कळायच्या आत इतक्या गोष्टी घडल्या... वैभवची अवस्था बिकट झाली. काय करावं सुचेना त्याला. काही बोलावं तर ती इतकी घाबरलेली होती.. की, अशा वेळी नेमकं काय बोलायचं असतं तेही त्याला आठवेना. तो नुसताच भांबावल्यासारखा उभा राहिला.तिचा श्वास थोडा संयमित झाल्यावर तीने डोळे उघडले.. आणि त्याच्याकडे पाहिलं. कसं नुसं हसला तो.. करणार तरी काय होता अशा परिस्थितीत?"मुझे थोडी देर यहा छुपने दो.... ये लोग मुझे मार डालेंगे... प्लिज. आय बेग यू".. अतिशय केविलवाणी होत ती म्हणाली. आणि त्याच्या समोर एकदम गुडघ्यावर बसली...त्याला तिची दया आली."अहो... तुम.. तुम्ही... असं.. इथे वरती बसा ना सोफ्यावर. म्..म... मी पाणि घेऊन येतो." असं म्हणत तो स्वयंपाक घरात आला. काहीतरी गंभीर प्रकार आहे हे त्याच्या लक्षात येत होतं. पण आपण कसं वागायचं अशा वेळी हे उमगत नव्हतं. खरंतर विचार करायला वेळ द्यावा स्वतः ला, म्हणून तो पाणी आणण्यासाठी आत आला. पाण्याचा ग्लास घेऊन जात असताना मात्र.. तो स्थिर झाला होता. आता जे असेल त्याला तोंड देण्याचा निर्धार जणू त्याच्या मनाने केला होता. आणि आत्मविश्वासात्मक पावले टाकत तो बाहेर आला.
ती आताही अस्वस्थच होती. मात्र बहुधा तिची भिती कमी झाली असावी. सोफ्याच्या एका बाजूला अंग चोरून ती बसली होती.. आणि नजर मात्र खालच्या कारपेट वर स्थिरावली होती. कारपेट कडे जरी ती बघत असली तरी लक्ष मात्र कुठेतरी दुसरीकडेच होतं हे तिच्या चेहर्‍यावरून समजत होतं.
तिच्या जवळ गेल्यावर त्याने घसा खाकरला...." हे... प्..पाणी घ्या. थोडं बरं वाटेल." त्याच्या हातून तिने पाण्याचा ग्लास घेतला. ग्लास घेताना तिच्या हाताकडे त्याचं लक्ष गेलं. लख्ख गोरा हात, लांब सडक निमुळती बोटं, नखावर मरून रंगाचं नेलपॉलिश... हातावर फिकी झालेली मेहेंदी आणि सोन्याच्या २ जाड बांगड्या. खानदानी असं तिचं सौंदर्य आणि पेहराव होता. ग्लास हातात घेऊन ती घटाघटा त्यातलं पाणी प्याली. तिला थोडं बरं वाटलं असावं. तिच्या नजरेतली भिती मावळली होती आणि आता त्यात दु:खाने जोर धरलाय.. असं त्याला वाटून गेलं. थोडा वेळ ती तशीच बसून होती..."आणखी हवंय का पाणी..." त्याने तिला विचारलं तशी ती भानावर आली."अं... नही.. नको." ग्लास त्याच्याकडे देत म्हणाली. "मला माफ करा. मी अशी एकदम.. आले... पण माझा नाईलाज झाला. ते लोक माझ्या मागे लागले होते... धावत धावत मी या तुमच्या बिल्डींग मध्ये शिरले.. ग्राऊंड फ्लोअरलाच तुमचं घर.. त्यामुळे तुमचंच दार वाजवलं गेलं माझ्याकडून. तुम्हाला त्रास द्यावा लागला " ती ओशाळून म्हणाली.
"नाही.. नाही.. अहो.. त्रास काय..? पण हरकत नसेल तर.. .............तुम्ही कोण, कुठल्या आणि कोण तुमच्या मागे लागले आहे? इथे अशा आलात?" नकळत त्याने तिच्यावर प्रश्नांचा भडीमार केला. त्याच्याही ते लक्षात आलं. पण आता तो विचारून बसला होता.
त्याच्या नजरेला नजर देऊन ती म्हणाली..."मै...? कौन? कहाँ से आयी?? आप जानते है, मुंबई में क्या हो रहा है? हिंदू- मुस्लिम एकदुसरे के जान के दुश्मन बन चुके है। दंगे उसळले आहेत. आधी वाटलं होतं.. इथे या भागांत काही नाहीये दंगा. पण आता इथेही चालू झाला आहे. "
त्याला कळत नव्हतं ही अशी असंबद्ध का बडबड करते आहे? मुंबईत जे चालू आहे ते तर सगळ्यांनाच माहिती आहे. मग ही अशी का ?... त्याच्या चेहर्‍यावरचे प्रश्नचिन्ह वाचून ती म्हणाली... "मेरा नाम जकिया है।"...................................................... त्याच्या चेहर्‍यावर बदलत जाणारे भाव ती टिपत होती. त्याला हळू हळू तिच्या सगळ्या बोलण्याचा उलगडा झाला. "काय विचार करता आहात?" .. तीने एकदम विचारलं. कितीही संयमी म्हंटलं तरी.. त्याच्या नजरेत एकप्रकारची कटूता आली. संयम ढळू नये म्हणून तो म्हणाला.." तुम्ही कॉफी घेणार?".. असं म्हणत त्याने आणखी एक मग आणला त्यात थर्मास मधली कॉफी ओतली आणि तिला दिली. ती खूपच सावध झाली होती आता. स्थिरावली होती. कॉफी घेत असताना त्याचे तिच्या कपड्यांकडे लक्ष गेले. उंची असला तरी.. मातीने माखलेला, काही ठिकाणी खोंबारला गेलेला तिचा ड्रेस.. ती कोणत्या दिव्यातून आलेली आहे हे सांगायला पुरेसा होता. हातांवर, ओरखडे होते...."तुम्ही दंगलित फसला होतात का? " त्याच्या प्रश्नाने एक्दम ती चमकली. उदास झाली.. आणि बांध फुटल्यासारखी रडू लागली. त्याला काय करावं सुचेना. थोडा वेळाने शांत होत म्हणाली.. " यू नो.. माझा निकाह आहे... म्हणजे होता पुढच्या हफ्त्यामध्ये.. हमिद.. माय बुड बी.. ते दुबई मध्ये असतात. शॉपिंग करायला मी , आम्मी आणि सकीना.. माझी बहीण.. आम्ही आलो होतो. एका दुकानात होतो तिथेच कळलं कर्फ्यु पुकारला आहे ते. लवकर घरी जायचं म्हणून तिथून बाहेर पडलो.. पण टॅक्सी मिळेना. समोरून जमाव आमच्या दिशेने येताना दिसला.. कुठे पळावं समजेना.. तिथेच एका गल्लीत शिरलो.. तिथेही लोकं मारामारी करत होती. काठ्या, चाकू... मिळेल त्याने मारत होती. आम्मी बुढी आहे.. तिला पळायला येईना. तीने मला आणि सकीनाला कसम देऊन तिथून पळून जायला सांगितलं.. आम्ही कसं बसं तिथून निघालो. वाट दिसेल तिथे पळत होतो.. एका गल्लीच्या तोंडावर तलवार घेऊन लोकं एकमेकाची जान घेत होते.. आम्हा दोघिंना पाहताच.. आमच्याकडेही धाऊन आले. सकीनाला मी एका दिशेने जायला सांगितले.. ती लहान आहे हो अजून. ती पळून जाताच जमाव माझ्या रोखाने आला... मी .. काय करणार होते एकटी? जसं जमेल तसं स्वत:ला वाचवत होते.. पळत होते. कुठे पळते आहे... कुठे जाते आहे.. काही ...काही कळलं नाही. ५ मिनिटांपूर्वी ज्या रस्त्यावर शांतता होती.. तिथे जमावाने तोडफोड केली...."
ती सांगत असतानाच पोलिस व्हॅन चा सायरन ऐकायला आला. तशी ती पुन्हा घाबरली. सायरन लांब गेला..."तुमच्या बिल्डींग मध्ये आले.... आणि..." ती पुन्हा रडू लागली. "आम्मी कुठे असेल?? सकीना सलामत असेल ना? काय झालं हे??आमची काय चूक होती?...... " असं म्हणून ती हमसून हमसून रडू लागली. चेहर्‍यावर भयंकर थकवा जाणवत होता. ती तशीच सोफ्यावर मागे टेकून डोळे मिटून बसून राहिली.
वैभवची अवस्था फार विचित्र झाली. मगाशी अजिंक्य आणि प्रसाद चे तणतणणारे संवाद त्याला आठवले. त्यांचे मुस्लिम समाजाबद्दल असलेले भयंकर विचार त्याला आठवले.."त्यांनी आपल्या आया बहिणींची अब्रू काढली.. आपणही तेच करायला हवं...तरच यांना अकला येतील" हे प्रसादचं वाक्य आठवलं आणि तो विलक्षण चरकला. "परमेश्वरा ... आज तू नक्की काय पहायला लावणार आहेस मला...?" त्याने मनांत त्या इश्वराला साद घातली. आणि इतक्यात.. दारावरची वेल वाजली..त्याच्या लक्षात आलं दुसरं तिसरं कोणी नसून... हीच दोन भूतं आलेली आहेत. काय करावं दार उघडावं का नाही?? त्यातच बेल वाजताच जकिया एकदम उठून उभी राहिली. तिच्या डोळ्यांत पुन्हा तीच भिती आणि दरवाजा न उघडण्याची विनवणी होती. .. द्विधा मन:स्थितीत तो तसाच उभा राहिला. मागून आवाज आला.. 'ए.. वैभव.. काय झोपलास काय? अरे दार उघड ना." अजिंक्य ओरडत होता. त्याने तिच्याकडे बघत बघत पुढे होऊन दार उघडले.
"अरे दंगा इथेही सुरू झाला आहे. मगाशीच पोलिस गाडी आली होती.. १०-१२ लोकांना पकडून नेलं त्यांनी. अरे पेटलीये रे मुंबई.. जनूची मेस पण फोडली लोकांनी. " बूट काढता काढता प्रसाद म्हणाला. वैभवचे त्याच्याकडे लक्ष नव्हते. भिजलेल्या मांजरासारखी त्याची अवस्था झाली होती.
"ही अंडी आणि हा ब्रेड.. आज ब्रेड ऑम्लेट खायेंगे" असे म्हणून अजिंक्य मागे वळला. ................ तिला बघून असंख्य प्रश्नांच जाळं त्याच्या चेहर्‍यावर पसरलं. एकदा वैभवकडे.. एकदा जकियाकडे.. बघत तो अंदाज घेण्याचा प्रयत्न करू लागला. प्रसादचं लक्ष गेलं तिच्याकडे... त्याचीही अवस्था तशीच झाली. जकियाला उगाचच अपराधीपणा आल्यासारखं झालं.
"काय रे ही कोण?" प्रसाद.. आवाजात जरब होती. कपाळावर आठ्यांच जाळंच होतं.
"ही.... अं.. ही..... जकिया..."वैभव अगदी खालच्या आवाजात म्हणाला.
तिचं नाव ऐकताच... प्रसाद आणि अजिंक्य च्या डोळ्यात द्वेषाने परिसीमा गाठली. चेहरे त्यांचे इतके बदलले आणि डोळ्यात इतकी आग उतरली की, शक्य असतं तर त्या आगीत त्यांनी जकियाला जाळून टाकली असती. वैभवने काहीतरी निश्चय केला आणि बाकी काही बोलायच्या आधीच तो त्या दोघांना ओढत आतल्या खोलीत घेऊन गेला.
"वैभव, ही इथं का आली आहे.... जीव वाचवायला आली असेल तर तिला जायला सांग.. नाहीतर आज इथे जे होईल ते हीने कधी स्वप्नात सुद्धा पाहीले नसेल..." अजिंक्य संतापला होता. वैभव.. दोघांना समजावण्याचा प्रयत्न करू लागला.. दोघेही ऐकण्याच्या मन:स्थितीत नव्हते.बाहेर जकियाला काय करावं सुचेना.. अंग चोरून तशीच ती खोलिच्या कोपर्‍यात उभी राहीली.... आता आपल्यापुढे काय वाढून ठेवले आहे.. याचा अंदाज बांधू लागली.तिघांची पुन्हा बाचाबाची सुरू झाली... पुन्हा मगाचेच सगळे संदर्भ... पेपरमधली तेजलची बातमी... टिवी वर पाहिलेला हाडामासांचा सडा...
बाहेर जावं तर जमाव आहे.. आणि ...इथे ..तिघांपैकी किमान एक जण आहे ज्याच्याबद्दल थोडी आशा वाटते आहे... अशी जकियाची स्थिती झाली.
घरामध्ये सुद्धा गोंधळ चालू झाला. वैभव दोघांना समजावण्याचा निष्फळ प्रयत्न करत होता...."वैभव... आज इथे तेच घडणार.. जे तेजलच्या बाबतीत झालं...." अजिंक्य सरसावून म्हणाला." हिलाही कळेल अब्रू म्हणजे काय ते.. .."
"नाही.... नाही.. अजिंक्य.............. मी तुम्हाला असं काही नाही करू देणार.. नका जाऊ.. प्लिज..." वैभवने खूप प्रयत्न केला दोघांना थांबवण्याचा.. पण त्यांनी त्याला त्याच खोलीत कोंडून घातला आणि ते तावातावाने बाहेर आले...ती बाहेर... चोरट्यासारखी उभी होती. ते येताच तिने दोघांकडे... आळीपाळीने पाहिले.. आता हे काय करणार... ? वैभव दार ठोठावत होता. नक्की काय चाललं आहे... तिला कळेना.
"तू का आलिस इथं?" प्रसादने तिच्यावर नजर रोखून विचारलं. नजरेत इतका संताप असू शकतो हे तेव्हा तिला जाणवलं..ती थरथरू लागली..
"बाहेर जमाव माझ्या मागे लागला होता... खूप घाबरले होते... आणि..." ती सांगत असतानाच.. अजिंक्य म्हणाला.." घाबरली होतीस... हो?? मग.. इथे नाही का भिती वाटली तुला....? बिनधास्त घुसलीस ते??"............
"नाही... इथे आल्यावर भिती नाही वाटली..." ती शांतपणे सांगत होती..." दार ठोठावत असताना... भिती वाटली होती.. पण हे दार उघडलं गेलं.. आणि त्या भिंतीवर असलेला शिवाजी महाराजांचा फोटो पाहिला...ज्या घरात या महापुरूषाची पूजा होते तिथे माझ्या अब्रूला काहीही धक्का नाही लागणार याची मला खात्री पटली.. आणि मी घरात पाऊल ठेवलं..................."
दोघांची बुद्धी खुंटली. आपण संतापाच्या भरात काय करत होतो याची जाणिव झाली.......... सगळं घर डोक्याभोवती फिरतं आहे असं वाटू लागलं."तुम्ही काळजी करू नका... मी जाईन थोड्या वेळात इथून निघून..." ती सांगत होती.. पण तिचे शब्द त्या दोघांच्या कानांपर्यंत पोचतच नव्हते. कोणीतरी उंच कड्यावरून ढकलून देते आहे असं वाटू लागलं. कोणीतरी श्वास कोंडून ठेवला आहे... हुंदका बाहेर येत नाहीये.. घशाला कोरड पडली आहे.. असं वाटू लागलं दोघांना. ट्रान्स मध्ये गेल्या सारखा अजिंक्य अलगद भिंतीला टेकला... आणि डोकं धरून खाली बसला. काय हे... काय वेडेपणा केला असता आज?
दारावरची बेल वाजली. दोघे तंद्रीतून जागे झाले. प्रसादने जाऊन वैभवला बाहेर खोलीबाहेर आणले. अजिंक्यने बाहेरचे दार उघडले. सुशांत होता. त्यांचा आणखी एक मित्र.
"अरे मला कल्याणला जायचं आहे.. पण जाताच येत नाहीये..प्रचंड वाद्ळ चालू आहे बाहेर. किती लोकं मेली... काय काय झालं.. किती नुकसान झालं... बापरे!" सुशांत म्हणाला.
प्रसाद त्यावर शांतपणे म्हणाला, " इथेही एक खूप मोठं वादळ आलं होतं................. पण.. कुणाचही नुकसान न करता... ते जसं आलं तसंच निघून गेलं"

**********************************************************************
(डिस्क्लेमर : ही कथा पूर्णपणे काल्पनिक आहे. त्यातल्या नावांशी, पात्रांशी कोणाला साधर्म्य वाटले तर योगायोग समजावा. )

1 प्रतिसाद:

akhildeep म्हणाले...

अप्रतिम.. शेवट उत्तम जमून आला आहे.. छत्रपतिंचा कारभार असाच नेटाचा होता.

Page copy protected against web site content infringement by Copyscape