शनिवार, ७ फेब्रुवारी, २००९

वादळ..१

( काही वर्षापूर्वी, सांगलीला आमच्या सोसायटीच्या गणेशोत्सवातील कार्यक्रमात सादर करण्याकरिता एक एकांकिका मी लिहिली होती. ती कथा रूपाने इथे लिहित आहे.मुंबईमध्ये १९९३ साली बॉम्ब स्फ़ोट झाले आणि त्यानंतर उसळलेल्या हिंदुमुस्लिम दंगली..याची पार्श्वभूमी कथेला आहे.)

"अरे अजिंक्य, सगळीकडे हेच चालू आहे. न्यूज वर, पेपरात, रेडीओवर.. बाहेर तर हिंदुमुस्लिम दंगल उसळली आहे... देव जाणे काय होणार आहे..? आपण आपल्या गावापासून इतक्या लांब. आई-बाबांचं काय झालं असेल? त्यांना किती काळजी लागून राहिली असेल. टेलिफोन बूथ सुद्धा बंद आहेत." वैभव अजिंक्यशी बोलत होता. वैभव हा तसा संयमी मुलगा. कधी ओव्हर रिऍक्ट होत नसे. पण एकूणच मुंबईतली परिस्थिती बघून बिथरला होता. वैभव ,अजिंक्य आणि प्रसाद तिघे एकमेकाचे अतिशय चांगले मित्र. अजिंक्यच्या मामाच्या मुंबईतल्या वेल फर्निश्ड ब्लॉक मध्ये रहात होते. ब्लॉकही अगदी सुंदर सजवला होता. एका भिंतीवर मोठ्ठ पेंटिंग, कोपर्‍यात एक सुबक लॅम्पशेड, जमिअनीवर कारपेट, उंची सोफा. एका भिंतीच्या मधोमध स्वयंपाक घराचा दरवाजा, भिंतीवर दवरवाज्याच्या एका बाजूला दगडूशेठ हलवाई गणपतीचा फोटो आणि दुसर्‍या बाजूला शिवाजी महाराजांचा फोटो. अशा या सुंदर घरात हे तिघे रहात होते.
अजिंक्य आणि प्रसाद हे दोघे तसे भडकू डोक्याचे होते. दोघांच्याही मनात मुस्लिमांबद्दल द्वेष निर्माण झाला होता. त्यात रेडिओवर सांगितल्या जाणार्‍या बातम्या, टीव्हीवर दाखवली स्फोटानंतरची दृष्य यामुळे दोघेही संतापले होते. बाहेर नुकताच कर्फ़्यु पुकारल्याचे रेडिओवर समजले. सगळीकडे केवळ बॉम्बस्फ़ोट आणि त्याची चर्चा. कुठे किती माणसे मेली, किती जखमी झाली... किती नुकसान झाले.. हेच वातावरण. आणि त्यातून येणारे अफ़वांचे पिक.. मनामध्ये वेगवेगळे विचार झुंझत होते.
"या सगळ्या मुस्लिमांना एकदाच काय ते बाहेर हाकलून द्यायला पाहिजे भारताच्या".. प्रसाद संतापात बोलला.
"अरे असं संतापून कसं चालेल? आणि सगळ्या मुस्लिमांना बाहेर काढून हा प्रश्न सुटेल असं वाटतं का तुला? हा दहशत वाद आहे. दाऊद सारख्या लोकांनी देशाबाहेरून चालवलेला." वैभव त्याला शांत करण्यासाठी म्हणला.
"च्या*** हे बघा..... काय अरे काय लोकं आहेत ही?" अजिंक्य हातातल्या पेपर मध्ये बघत बोलला.
"काय झालं आता?" वैभव.
"जुहू मध्ये, तेजल नावाच्या एका मुलीवर...दहिसर मधल्या काही गुंडांनी बलात्क...... ते ही सगळीकडे दंगल चालू असताना. अरे ती घाबरून घरी जात होती रे... तर तीला खेचून एका गल्लीत नेलं आणि..... छे!!! काय हे.. !!! कशाला माणूस म्हणायचं यांना?" अजिंक्य.
"त्या गुंडांची नाव वाच बरं.." प्रसाद.
"तौफ़िक अली, इजाज मुल्ल्ला... आणि.." अजिंक्यला मध्येच तोडत प्रसाद चिडून म्हणाला,"वाटलंच मला...ते सुद्धा बॉम्बस्फ़ोट करण्यार्‍यांपैकीच असतील... यांनी गाठली ती ही एक हिंदू मुलगी..." प्रसाद रागाने लालबुंद होत होता.
"थांबा.. काय हे? त्यांनी केलं ते माणुसकीला काळिमा फ़ासणारंच होतं.. पण इथे तुम्ही हिंदुमुस्लिम वाद आणू नका." वैभव समजावत होता.
पण अजिंक्य आणि प्रसाद ऐकण्याच्या मनःस्थितीत नव्हते. शेजार्‍यापाजार्‍यांकडून, रेडिओवर.. अखंड बातम्या मिळत होत्या. हाहा:कार उडाला होता. काय करावे, कुठे जावे काही समजत नव्हते.तिघेही.. तावातावाने.. हिंदुमुस्लिम दंगलींवर चर्चा करत होते. तणतणत होते. कोणाचे बरोबर, कोणाचे नाही.. इथं पासून, ते राजकारण्यांपर्यंत सर्वांचे पूर्वज काढून झाले होते. त्यामध्ये गांधी-नेहरूही वर्णी लावून गेले होते.
त्यातच प्रसाद ने टिव्ही लावला. टिव्ही वर बॉम्ब स्फोटानंतरची दृष्ये काळीज विदिर्ण करीत होती... किळस येत होती हाडामासांचा चिखल बघून..वैभवने उठून टिव्ही बंद केला. वातावरणातला ताण सैल करण्यासाठी म्हणाला," मित्रांनो.. अरे दुपार झालीये.. जेवायचं नाहिये का तुम्हाला? मेस वर जाऊन जेवून या.."
".......... हम्म! याचं आपलं डोकं कायम थंडच!!".. प्रसाद म्हणाला.."आणि जेऊन या म्हणजे .. चल ना तूही.."
"नको.. माझ्या पोटात गडबड आहे सकाळ पासून आज नुसती कॉफिच पितो..." वैभव थोडा आणखी मोकळा होत म्हणाला.
" मुंबईमध्ये आणि तुझ्या पोटामध्ये एकदम स्फोट झाले वाटतं..??" अजिंक्य प्रसादकडे पाहून हलकेच हसला. "चल आम्ही जातो.. तू कर आराम. आणि कॉफी घे" असं म्हणत अजिंक्य आणि प्रसाद बाहेर पडले."मेस तरी चालू असेल की नाही काय माहिती?? " जाताजाता प्रसाद म्हणाला.

-----------------------------------------------------------
वैभवने थर्मासमधली कॉफी ओतून मगात घेतली आणि त्याच्या नेहमीच्या खुर्चित बसून पुस्तक वाचू लागला. कितिवेळ गेला कोणास ठाऊक...अचानक..दारावर थाड थाड आवाज आला...."दरवाजा खोलो... प्लिज दरवाजा खोलो.... वो मुझे मार देंगे..ओपन द डोर आय से...." थाड थाड.. थाड्ड्ड्ड...वैभव घाबरला... चरकला... आणि... घाबरत घाबरत.. पुढे झाला..दरवाजा उघडावा की नको... कोण असेल.... आपण एकटेच आहोत. जवळ शस्त्र नाही.. काय करावे..पण मनाचा हिय्या करून दरवाजा त्याने उघडला...

- प्राजु

(डिस्क्लेमर : ही कथा पूर्णपणे काल्पनिक आहे. त्यातल्या नावांशी, पात्रांशी कोणाला साधर्म्य वाटले तर योगायोग समजावा. )

क्रमशः..

Page copy protected against web site content infringement by Copyscape