मंगळवार, ३० सप्टेंबर, २००८

सार्थक्..(एक मुक्त प्रवाह)

आज सकाळी अलवार जाग आली.. उठून बाहेर आले. सहज पॅटीओचं दार उघडलं..समोर पसरलेली हिरवळ डोळ्यात साठवत तशीच बसून राहिले त्या खुर्चीवर..४ दिवसापूर्वीच तो येऊन गवत छाटून गेला होता आणि आज परत.. एकेक पातं जणू तलवार.. !!!!पहाटेनं जाताना बहाणा केला धुक्याचा आणि दवाचं वाण देऊन ती परत निघाली होती..प्रत्येक पातं चांदीच्या कोंदणामध्ये मोती ल्यायला होतं..आणि एकमेकाला विचारत होतं "कोण जास्ती सुंदर आहे रे??"अचानक एखादी वार्‍याची कोवळी झुळूक हळूच येऊन एका गवताच्या टोकदार पात्याच्या कानात फुंकर घालून गेली.. ते पातं आळस देत उठलं आणि तो चांदी मोत्याचा साज उतरवत... त्या वार्‍याशी खट्याळपणे हसत सहस्त्र रश्मीच्या आगमनासाठी तयार होऊ लागलं... हळूहळू सगळीच पाती जागी झाली. इतक्यात एक कोवळं सोनेरी किरण त्या हिरवळी गालिच्यावर पहुडलं आणि त्या चांदीच्या लखलखाटात सोन्याची भर पडली. संपूर्ण गालिच्यावर सुवर्णालंकार पसरले .
किती वेळ गेला कोणास ठाऊक्...तो रविकर आता संपूर्ण दर्शन देण्यासाठी तयार होता..एक मोती अचानक त्या अलंकारातून खाली ठिबकला... एक गरम घोट माझ्याही घशातून खाली सरकला..
अरे!! थांब... मला हे तुमचं रूप टिपून घेऊदे..मी उठले हातातला मग बाजूला केला..
कॅमेरा?? कुठे ठेवला... छ्या!! शोधा आता शोधा आता....
इतक्यात... घर्रर्रर्रर्र.. खड्ड्ड्ड्ड्ड्ड... घर्रर्रर्रर्र...नको नको!!!!!!!
पळत पळत पुन्हा पॅटीओ मधे आले.
तो सुवर्णालंकार तसाच होता मात्र तो आता छिन्नविछिन्न झालेल्या त्या हिरव्या अवयवांवर होता..आणि ती हिरवळ.. मोत्यांचे अशृ ढाळत त्या अवयवांकडे हताश पणे पहात होती..नक्की माती ओली होती की त्या हिरव्या रक्तामुळे झाली होती??'त्या' च्या एका फेरीने काम तमाम केलं होतं. पण 'तो' ही केवळ कामचं करत होता..त्या शेंडे छाटलेल्या तृणांवर पसरलेली सूर्यकिरणं आता भकास दिसत होती.. त्यामध्ये एकप्रकारचा रखरखीतपणा आला होता.
कोण म्हणालं ,"चला, ८.३० वाजले.. निघायला हवं"...तर कुणी म्हणालं.."शाळेत जायची वेळ झाली"..पण त्या हिरवळीकडे पहायला कोणालाच वेळ नव्हता..आज सगळं विखरून गेलं.. तो चांदी मोत्याचा लखलखाट.. वार्‍याची फुंकर.. आणि ओघळणारा मोती..
पण उद्या..
उद्या.. पुन्हा... त्या अपंग झालेल्या शरीरांवर पुन्हा नविन तेज घेऊन..नवे दागिने लेऊन.. पुन्हा त्या कोवळ्या किरणाला अंगावर मिरवत ही हिरवळ उभी असेल.. माझ्या स्वागताला!!
उद्या 'तो'नक्कि नाही येणार... किमान आता चार्-पाच दिवसतरी 'तो' फिरकणार नाही..आणि मग तो सगळा शृंगार केवळ त्या भास्कराच्या आगमनासाठी राखून ठेवलेला असेल.. आणि त्याचे आगमन होताच..केलेल्या शृंगाराचं सार्थक होईल..

- प्राजु
* 'तो' = ग्रास मोवर.. ४-५ दिवसातून एकदा गवत छाटून जाणारा..

3 प्रतिसाद:

Abhijit Dharmadhikari म्हणाले...

ह्म्म...छानय तुमचा ब्लॉग! आवडला!!

sachin paranjpe म्हणाले...

प्राजु,

छान लिहितेस...खुप छान पण अंतस्थ गुढ आणि तितकंच भावणारं, तुझं अनुभवविश्व खुप तरल आहे हे लक्षात येतय..

-मिसळपाव मधला येडा खवीस
http://sachinparanjpe.wordpress.com

Innocent Warrior म्हणाले...

Katil lihile aahes. pahila paregraph tar nusate chitalyanche pedhe aahe. :)

Page copy protected against web site content infringement by Copyscape