शुक्रवार, १८ जुलै, २००८

गंध ओला..

रानातल्या पाखरांची रूणझुण किलबील
वारा ओल्या गंधासवे घुमवीतो गूढशीळ

वळवाचा नादधुंद, मोतियांची गारपीट
धरा जणू मुग्धावते, वैशाखाचा आला वीट

दिप्तीमान वीजधार , मेघांचीही धडपड
दडे पाऊस भिजुनी, तुझ्या पदराच्या आड

निथळते रूप तुझे, रोमांचित देहसारा
केसातूनी वाहताती वितळल्या शुभ्र गारा

थेंब वेडा ओघळतो गालावरूनीया ओठी
ओठ माझे अधिर हे , तया टिपण्यासाठी

आसमंती वाहीला गं, सूरसाज पावसाचा
ओली तू अन ओला मी, क्षण हा संयमाचा

(छातिवरी विसावूनी ऐक श्वास माझे राणी
विश्व माझे तुझ्या ठायी, बोलले ना तुला कोणी??)

भीजवतो क्षणभर, वळवाचा गं पाऊस
फिरूनिया बरसेल, सखे नको गं जाऊस...

- प्राजु

Page copy protected against web site content infringement by Copyscape