बुधवार, ३० जुलै, २००८

सुरेखा

"वयनी, स्वयंपाक काय काय करायची सांगा लवकर?"
साधारण सकाळी ९.३० च्या दरम्यान अशी विचारणा झाली की ओळखावं सुरेखा बाई आलेल्या आहेत. ही आमची सुरेखा म्हणजे कर्नाटक आणि कोल्हापूर(कोल्लापूर) याचं एक अजब मिश्रण आहे. आडनावने म्हणजे जातीने ही ९६ कुळी बरं का. पण आवाजाचा हेल सगळा कर्नाटकी आणि त्यातही विशेष म्हणजे लिंग, वचन हे सगळं धाब्यावर बसवून मराठी बोलणार. अशिक्षित, अडाणी. मध्ये मध्ये इंग्रजीचा खून पाडणारी.
मी कॉलेजात असताना आमच्या बंगल्याच्या बांधकामाच्या कामावर वॉचमन म्हणून ही आणि तिचा नवरा रहात होते. घर बांधून झालं .पण वॉचमनची टपरी तशीच होती. आम्ही फेब्रुवारी मध्ये त्या घरात रहायला गेलो. तेव्हा तिचा मुलगा शाळेत होता. त्यामुळे तिने आईला विनंती केली की, याची वार्षिक परिक्षा होईपर्यंत मी इथे रहाते .. तो पर्यंत तुमच्या घरचं काम करते. काम म्हणजे धुणं-भांडी, केर्-फरशी, बाकी आवरा आवर आणि स्वयंपाक .. आईनेही मान्य केलं. आणि २ महिने राहते म्हणून राहिलेली ही सुरेखा आमच्या कुटुंबाचा घटक झाली. तिच्यासाठी बंगल्याच्या बाहेर एक छोटीशी खोली वजा आउट हाऊस बांधून घेतलं. सकाळी अंगण झाडून घेण्यापासून हीचं काम सुरू होई. घरातल्या प्राणीमात्रांना सुद्धा तिची पट्कन सवय झाली. कर्नाटकची असल्याने भाकरी अशा काही सुंदर करते की, वरचा आणि खालचा पापुद्रा यांची जाडी एकच असते. तिला ब्राह्मणी पद्धतीने पोळ्या आणि भाज्या करयाला आईने शिकवल्या. खूप लवकर शिकली. आमच्या घरी स्वयंपाक करता करता आणखी १-२ ठिकाणची स्वयंपाकाचि तिनम कामं धरली. काळासावला रंग, शिडशिडीत बांधा आणि डोक्यावर पदर घेऊन तो कमरेशी खोचलेला अशा अवतारात बाई साहेब निघतात.
हिचे किस्से धमाल असतात. एकदा सगळीकडचे दिवे गेले होते. घरात अंधार होता. पण आमच्या घराच्या मागे चालेल्या बांधकामावर लाईट दिसत होते. आजीने विचारलं, "अगं सुरेखा, लाईट फक्त आपल्या घरीच गेलेत का? फ्युज वगैर नाही ना उडाला? कारण मागे लाईट आहे..." " न्हाई वं... जन्ड्रटल हाय तिथं.." सुरेखा म्हणाली. आजी म्हणाली, "काय आहे तिथं?".."जन्ड्रटल वं.. ते लावत्यात की लाई गेल्यावर"... सुरेखा समजावून देऊ लागली. " अच्छा.. जनरेटर होय..! बर बरं.." आजी म्हणाली. "हां बघा ते जन्ड्रटल हाय" सुरेखाने पुस्ती जोडली. हा प्रसंग आम्ही आठवून आठवून हसत होतो.
त्यानंतर एकदा, तिचा मोठा मुलगा जो कर्नाटकात कुठेतरी नुकताच ओफिसबॉय म्हणून नोकरीला लागला. तो हिला आणि धाकट्या भावाला भेटायला म्हणून आला. पहिला पगार झाला होता. तेव्हा भावाला घेऊन सिनेमाला गेला , त्याला कपडे आणले नवे, हिला साडी घेतली. त्यावेळि हिचा आनंद गगनात मावत नव्हता. मलाही खूप बरं वाटलं. तिच्या त्या मुलाने एका संध्याकाळी येताना कोण्या गाड्यावरून चिकन ६५ आणले घरी. ही संध्याकाळच्या स्वयंपाकाला घरी आली. आईने विचारलं, " तुझा झाला का स्वयंपाक?" तर म्हणाली, " पक्या (प्रकाश .. तो मोठा मुलगा), आज येताना चिट्टीफाय घ्यून आला हाय नव्हं. ते खाल्लो आताच.. आता पक्त्(फक्त) बाकरी(भाकरी) करनार २ आणि सकाळचा बात (भात) बी हाय तसाच. काय जास्त न्हाइ करायच आज" . आईने विचारलं," काय आणलं प्रकाशनं??" तर पुन्हा म्हणाली," चिट्टीफाय".. "काय??" आईने विचारलं. "अवं चिट्टीफाय वं.. ते चिकनचं असतयं नव्हं का..." सुरेखा समजावू लागली. "अच्छा.. चिकन ६५.. बर बर" आईला समजलं.
एकदा घरातले केर काढत होती. पलंगाच्या खालून केरसूणी फिरवल्यानंतर कसलं तरी छोटं कागदी पाकिट बाहेर आलं. आई म्हणाली," ते काय आलं बघ गं जरा बाहेर.." तिने ते उघडलं. म्हणाली ," निगूटी हाय त्यात". अईचं लक्ष नव्हतं. तिनं विचारलं ," कसली गूटी?".. "आवं.. निगूटी.. निगूटी" सुरेखाने सांगितलं. आईला काही समजेना. ती च्या जवळ गेली आणि पाहिलं. "अगं... निगेटिव्ह होय.. काय सुरेखा काय बोलतिस तू?" "त्येच सांगत व्हुतो न्हवं का निगूटी हाय म्हनून" सुरेखाचं उत्तर. "हम्म .. चुकलं बाई.. निगूटीच आहे ती." आईने नाद सोडून दिला.
आमच्या घरी तेव्हा एक मांजराचं लहान पिलू आणलं होतं. अजून नविन होतं ते आमच्या घराला. त्यामुळे कधी कधी ते पलंगाखाली त्याचे सगळे कार्यक्रम आटोपायचं. अशीच सुरेखा एकदा केर काढत होती. आणि तिला पलंगाच्या खाली काहीतरी पडलेलं दिसलं. ती नीरखून बघत असतानाच तिथे बाबा आले. म्हणाले, "काय गं अशी काय बघती आहेस?" "त्ये बघा तिथं कोपर्‍यात काय हाय?" सुरेखा म्हणाली. बाबा म्हणाले ,'खाली जाऊन बघ पलंगाच्या काय आहे ते.. मांजराने घाण केली असेल तर कागदावर घेऊन काढून टाक.""बर" म्हणत ती पलंगाखाली गेली. बाबांनी विचारलं," काय आहे गं?" तर म्हणाली," बू हाय बू"..बाबांना ऐकायला आलं "गू".. "काय??? काढून टाक मग. कगद देऊ का तुला?" बाबा म्हणाले. "अवं.. ते नव्हं.. बू हाय बू" सुरेखा. "अगं.. मग काढून टाक ना.. बघत काय बसली आहेस?".. इति बाबा. "आवं दादा, बू हाय ह्यो बू" असं म्हणत ती पलंगाच्या बाहेर आली. तिच्या हातात.. एका भेटवस्तूला सजावटीसाठी लावलेला सॅटीनच्या रिबिनचा बो(बू) होता. तो खाली पडला होता. तो बो बघून बाबांना हसावं की रडावं हे कळेना.. आमची मात्र हसून हसून पार वाट लागली.
हिचे किस्से फार मजेदार आहेत. आईने एकदा गाजर हलवा केला होता. तो दूधात आटवत ठेवला होता. आईला स्पॉन्डीलाटिस असल्याने तिला फार वेळ हलवता येईना. तिने सुरेखाला सांगितलं "सुरेखा, हलवा हलव जरा आणि दूध आटलं की गॅस बंद कर" ती मन लावून ते करू लागली. दूध आटलं, हलवा झाला. तिने गॅस बंद केला आणि आईला म्हणाली,"ह्ये हलवं जालं बगा... आता काय करायचं??" हिला लिंग, वचन कधी समजणार देव जाणे. अतिशय प्रेमळ, माया लवणारी ही सुरेखा पूर्ण दिवस राबत असते. मोठा मुलगा आता बेंगलोरला कोणत्यातरी मोठ्या कंपनीत शिपाइ म्हणून काम करतो. धाकटा मुलगा रिक्षा चालवतो. त्याने हिला मोबाईल घेऊन दिला आहे. पण फक्त फोन घ्यायचं बटण कुठलं आणि बंद करायचं बटण कुठलं याशिवाय त्या मोबाईल बद्दल काही माहीती नाही हिला. माझ्या बाळंतपणाच्या वेळी, बाळंतीणीला चिकनचं सूप चांगलं असतं म्हणून रोज करून द्यायची. लेकाला माझ्याही खूप माया लावली तिने. तिच्या घरी थालिपिठ केलं की आवर्जून माझ्यासाठी घेऊन येते किंवा, मला तिच्या खोलीत बोलावून खायला लावते. कोल्हापूरि चिकन करावं तर ते सुरेखाने. पांढरा - तांबडा रस्सा तिच्या हातचा खाल्ला की बस्स! कोणत्याही हॉटेलमध्ये मिळणार नाही इतका सुंदर करते.
आईकडून, पुरणपोळ्या, गूळाच्या पोळ्या, रव्याचे लाडू, उकडीचे मोदक शिकली. मी मात्र आईकडे गेले की, "सुरेखा, मस्तपैकी चिकन , तांबडा-पांढरा रस्सा आणि भाकरी कर गं उद्या." अशी फर्माइश करते आणि माझी ही फर्माइश ऐकली की तिच्या चेहर्‍यावरून आनंद ओसंडून वहात असतो. आणि मग दुसरे दिवशी सकाळी ९.३० च्या दरम्यान आवाज येतो ,"वयनी, आज चिकन करायची व्हवं का.. मग आनायला पैसं देता का?".. सुरेखा तयारीला लागलेली असते.
- प्राजु

3 प्रतिसाद:

shrikrishna म्हणाले...

छान लेख आहे.वाचून बरं वाटलं

Unknown म्हणाले...

seen your video on perfect misal! Its unfair Prajaktaa! you should post a complete recipy on the blog. Its a humble request! amhi kay fakt manaant mande khayache?
pl. post the full recipy with taree. so that everyone can use that.
Annadaataa sukhee bhav!
bhukheki suno, wo tumharee sunega/
tum ek misal doge
wo das laakh dega!
sorry!Pl. delet when read,as I know, this is irrelevant topic.
pl. excuse me!

Mahendra Kulkarni म्हणाले...

काल रात्री ब्लॉग वाचला . हे पोस्ट खुप आवडलं. असे विचित्र उच्चार असले की खुप गोंधळ होतो बरेचदा.
बाकी पोस्ट पण छान आहेतच, त्यातल्या त्यात बापु पण खुप आवडला.

Page copy protected against web site content infringement by Copyscape