शुक्रवार, १८ जुलै, २००८

विठू सांगे...

आषाढाचा मास । दर्शनाची आस ।
होती तुझे भास । पांडुरंगा । ।

साठवावे नेत्री । भक्तीचिया गात्री ।
दिवसा नि रात्री । रूप तुझे । ।

खोवलेला शिरी । तुरा हा मंजिरी ।
वसतो पंढरी । विठू राया । ।

भिवरेच्या तिरी । उभा विटेवरी ।
कर कटेवरी । ठेवोनिया । ।

काळा नि सावळा । प्रेमाचा पुतळा ।
मनाचा निर्मळा । पांडुरंग । ।

नामयाचा घास । घेऊनिया खास ।
जागवली आस । भक्तीयोगे । ।

घेऊनी वळण । दळितो दळण ।
करितो राखण । जनाईचे । ।

तुकोबाचा भार । घेई शिरावर ।
परि गुन्हेगार । आवलीचा । ।

काय त्या म्हणावं ? देव की मानव ।
कोणाला कळाव ? गारूड ते । ।

श्रद्धा अंधश्रद्धा । फरक तो करा ।
परी कास धरा । प्रयत्नांची । ।

प्रयत्नाच्या अंती । ध्येयाची ती पूर्ती ।
करा श्रम भक्ती । विठू सांगे । ।

जाणा एक सर्व । विश्व हाच देव । ।
सांगे ज्ञानदेव । सकलांना । ।

प्राजू म्हणे ऐसे । विश्वाला जपावे ।
प्रयत्न करावे । ध्येयासाठी । ।

- प्राजु.

Page copy protected against web site content infringement by Copyscape