सोमवार, ४ ऑगस्ट, २००८

कोल्हापूरी मिसळ..

वाढणी : ४ जण

साहीत्य : १. मोड आलेली मटकी (मूग मिसळले तरी उत्तम)२ बाऊल,
२. २ मध्यम आकारचे उकडलेले बटाटे,
३. दोन मोठे कांदे (१ मोठा चिरून आणि दुसरा बारिक चिरलेला)
२. २ मोठे टोमॅटो (१ मोठा चिरून आणि दुसरा बारिक चिरलेला)
३. सुके खोबरे किसलेले १/२ वाटी
४. ओले खोवलेले खोबरे १/२ वाटी
५. गरम मसाला : ४-५ मिरी, ३-४ लवंगा, दालचिनी
६. २ चहाचे चमचे भरून तीळ, तितकेच अख्खे धणे
७. ३-४ लाल मिरच्या (तिखट पणावर कमी -जाती)
८. उत्तम प्रतीचा कांदा लसूण मसाला...
९. आलं लसूण.. अंदाजे
१०. मीठ अंदाजे

कृती :
मसाल्यासाठी :
प्रथम सुके खोबरे आणि तीळ वेगवेगळे कोरडेच (तेल न घालता) भाजून घ्यावे . ते वेगळ्या थाळीत काढून ठेवावे. त्या कढईत अगदी थोडे तेल घालून त्यात मोठा चिरलेला एक कांदा, आलं - लसूण घालून कांदा ब्राऊन होई पर्यंत परतावे. ते भाजलेल्या खोबर्‍याच्या थाळीत एकत्र ठेवले तरी चालेल. त्यानंतर पुन्हा थोडं तेल घालून त्यात अख्खे धणे, आणि सगळा अख्खा गरम मसाला परतावा आणि त्यातच लाल मिरच्या आणि नंतर ओला नारळ घालून आणखी थोडा वेळ परतून घ्यावे.गरम मसाला आणि मिरच्यासाठी तेल कमी लागते.. त्यामुळे त्यातच ओला नारळ परतावा म्हणजे खूप तेलकट नाही होणार. आता भाजलेला हा सगळा मसाला आणि एका टोमॅटोचे मोठे तुकडे करून मिक्सर मधून एकदम बारिक वाटून घ्यावे. हा झाला मसाला.

भाजी :
उकडलेल्या बटाट्यांची नेहमी सारखी भाजी करून घ्यावी. फक्त हिरवी मिरची न घालता लाल मिरची पावडर घालावी .मोड आलेल्या मटकीची कोरडी उसळ करून घ्यावी. नेहमी सारखी फोडणी करून तिखट मिठ.. घालून उसळ कोरडी करावी . पाणी अजिबात राहू देऊ नये.(१-२ जणांसाठीच करायची असेल तर मी, फार त्रास न घेता मटकीच्या उसळीतच उकडलेले बटाटे घालते आणि एकत्रच भाजी/उसळ करते.)

आता मिसळीचा प्राण असलेला कट:
मिसळ ही पूर्णपणे त्याच्या कटावर अवलंबून असते. कट किंवा रस्सा.. काहीही म्हणा.
पातेल्यामध्ये साधारण दोन भाज्यांच्या फोडणीला लागेल इतके तेल घालावे. ( हे तेल आधी तळणी करता वापरलेले नसावे.. नाहीतर याचा वास कटाला लागतो). तेल तापले की, त्यात थोडा बारीक चिरलेला कांदा, कढीपत्ता, हळ्द, हिंग, जिरे हे घालावे. कांदा गुलाबी झाला की, त्यात २-४ चमचे कांदा लसूण मसाला घालावा. आणि लगेच २ चमचे साखर घालावी. कांदा लसूण मसाल्याचे प्रमाण आवडीनुसार बदलावे. साखर मात्र विसरू नये. तेलातच साखर घातल्याने कमी तेलात तर्री नवाचा प्रकार मिळतो. यात आता वाटलेला सगळा मसाला घालावा आणि थोडा वेळ परतावा. आधीच शिजवून घेतल्याने केवळ टोमॅटो शिजेल इतपतच तो परतावा. मग त्यात गरम पाणी घालावे. अंदाजे ४ कप पाणी घालावे. खूप दाट वाटल्यास आणखी थोडे घालावे. पण खूप पातळ करू नये. आता यात मिठ घालावे आणि चवीनुसार कांदा लसूण मसाला हवा असेल तर घालावा पुन्हा. उकळी आली की गॅस बंद करावा.(फोडणीत साखर घातल्याने तर्री सुंदर येते. आणी निम्मेच तेल लागते. साखरेचा पाक होऊन तो लाल रंग जबरद्स्त दिसतो..

प्रथम बाऊल मध्ये मटकीची उसळ १ चमचा, बटाट्याची भाजी, मग फरसाण, मग कट किंवा रस्सा, बारिक चिरलेला कांदा, टोमॅटो, कोथिंबीर घालावी आणि शेजारी पाव आणि लिंबाची फोड थेवून सर्व्ह करावे.काही जणांना लिंबा ऐवजी दही घालूनही आवडते. ते ही ट्राय करून बघा.करून पहा.. छान झाली तर नक्कि कळवा.

आपली,
प्राजु (कोल्हापूरी मिरची)

2 प्रतिसाद:

s म्हणाले...

Kolhapuri Misal Jabaraaaaaach zali aahe..
Yamule blog la rangat aali.:)

Abhijit Dharmadhikari म्हणाले...

चमचमित पोस्ट! :-)
फडतरे, चोरगे यांची मिसळ मी खूप मिस करतोय! मध्यंतरी मुंबईला शिवाजीपार्कात कोल्हापूर महोत्सव होता. फडत-यांच्या मिसळीसाठी अर्धा फर्लांग रांग होती. त्या रांगेत मी पण होतो:-)

रेडीमेड ’कांदा लसूण मसाल” मुंबईत कुठे मिळेल काही अंदाज?

Page copy protected against web site content infringement by Copyscape