सोमवार, १४ जुलै, २००८

पांडेकर आजी..

"वयनी..... " अशी किनर्‍या आवाजात म्हणजे अगदि स्पष्ट सांगायचं तर जुन्या मराठी तमाशापटातून मावशीचं काम करणारे कै. गणपत पाटील यांच्यासारख्या आवाजात हाक ऐकू आली की आई म्हणते पांडेकर आजी आल्या. अशिक्षित, अडाणी बाई. अतिशय प्रेमळ. तिचं तिच्या बागेवर पोटच्या मुलासारखं प्रेम. नवरा म्हणजे मुलखाचा चिकट होता असं आजीच स्वतः सांगते. तिला मुलगाही होता.. बिचारा आजारी पडला पण त्या विक्षिप्त नवर्‍याने उपचारासाठी खर्च नाही केला म्हणून दगावला. तेव्हापासून नवर्‍याबद्दल मन कलूषित झालेलं , पण जुने संस्कार .. त्यामुळे नवर्‍यासोबतच उरलेलं आयुष्य घालवीत होती. नवरा पोलिस खात्यात जमादार होता. त्यामुळे कोल्हापूरतील राजारामपुरी पोलिस स्टेशन मध्ये ओळख आहे बाईची. काळा सावळा रंग , डोळ्यावर जाड भिंगाचा चष्मा तो ही मामांचा म्हणजे तिच्या नवर्‍याचा होता, ती तो आता वापरते., आणि डोक्याची चांदी झालेली. अशी ही आजी. त्या मामांनी संपूर्ण आयुष्यात एक चांगलं काम केलं ते म्हणजे ४ लहान लहान खोल्यांचं का होईना पण साधारण ३००० स्क्वे. फूटच्या प्लॉटवर स्वतःचं घर बांधलं. घराच्या आवारात आजीनी लावलेली झाडं म्हणजे पायरी आंबा, लिंबू, शेवगा, पेरू, चिकू, जाई, जुई, मोगरा, गुलाब, २ प्रकारच्या जास्वंदी. झाडांवर अतिशय माया. तिच्या सोबतीला म्हणजे ती बॉबी कुत्री आणि माय-लेकरं असलेली वेगवेगळ्या डोळ्यांची मांजरं..
हे प्राणीही जणू आजी एकटी आहे तिला आपल्याशिवाय कोणी नाही हे जाणूनच असल्यासारखे...
आंब्याच्या सिझन मध्ये मोठाले येणारे पायरी आंबे राखायला बाई, दिवसरात्र बागेत बसून असते. २ खोल्यांमध्ये बिर्‍हाड ठेवल्याने सोबतही होते आणि मामांच्या तुटपुंज्या पेन्शन शिवाय मिळकतही होते थोडिफार.
गॅस ला नंबर नोंदवायचा असेल किंवा काही बँकेची कागदपत्र समजावून घ्यायची असतील तर हळू हळू धिम्या गतीने चालत चालत आजी येते आणि आईकडून किंवा घरी जे कोणी असेल त्याच्याकडून वाचून किंवा फोन लावून घेते. एक मात्र, तिची ही जी काहि कामं आम्ही करतो त्याच्या बदल्यात ती झाडाचे आंबे, लिंबं, शेवग्याच्या शेंगा आणून देते. सगळ्या जगाला ती तिच्या बागेत येणारी फळ विकते पण आमच्याकडून एक पैसाही नाही घेत. मी कधी गेले कोल्हापूरला तर मला आवडते म्हणून शेवग्याच्या शेंगांची तिखट, खमंग भाजीही करून आणून देते. यामध्ये कोणताही दिखाऊपणा नाही . पण झाडांबद्दलचं प्रेम आणि अभिमान अपार.
"आजी, शेवग्याच्या शेंगाची भाजी मस्तच झाली आहे .."
" मग! हुनारचं की, माझ्या झाडाच्या शेंगा हैत.. लई दळदार.. त्या बाजारच्या नव्हत, चवळीवानी!!" असं चिरक्या आवाजत पण ठसक्यात उत्तर मिळेल .
या बाईचं उत्पन्नाचं साधन म्हणजे, मामांची पेन्शन, येणारं घरभाडं आणि आंबे, लिंबं, शेंगा, पेरू... श्रावणात जाई-जुई, मोगर्‍याची फुलं विकून मिळणारि रक्कम. कॉलनीतली लोकं सुद्धा त्या बाईला जपतात.. बाजरातून शेवगा, पेरू आणून खाण्यापेक्षा आजीकडूनच घेतात. भलेही स्वत:च्या बंगल्यातल्या बागेतून टोपलीभर फुले निघू देत पण सत्यनारायण, मंगळागौरी, आणि गणपतीच्या पूजेला घरोघरि फुलं येतात ती आजीच्या बागेतली. त्यामुळे तिचा तिच्या झाडांबद्दलचा अभिमानही द्विगुणीत होतो आणि मग म्हणते..
"माझ्या मोगर्‍या वानी मोगरा कुट्टं मिळायचा न्हाई. परवा, शेजारची सुजा आल्ती.. ५० रूप्पयची फुलं घ्यून गेली बगा.." त्यावेळी तिच्या चेहर्‍यावरून आनंद ओसंडून वहात असतो.
मध्येच एकदा आजी अशीच आली घरी.. " वयनी...... हैसा काय??"
"या आजी.. आई नाहिये.. या ना बसा जरा" .. मी
"ताई, कुटं गेली आई, येनार हायका लवकर??" .. आजी
"येईल १० मिनीटात. बसा तरी." .. मी
हा संवाद होईपर्यंत आजी जेमतेम बंगल्याचं गेट उघडून आत आलेलि असते. तिला चालायला खूप वेळ लागतो.. वयोमाना प्रमाणे येते तिच्या गतीने. मग ती आत येईपर्यंत मी स्वयंपाकघरातून पाणी पिऊन येते. आजी आत येते, नेहमीच्या ठरलेल्या दाराजवळच असणार्‍या खुर्चीजवळ बसते. याचं कारण, दाराजवळच्या खुर्चीतून तिला तिच्या घराकडे लक्ष ठेवता येतं खास करून आंब्याच्या किंवा पेरूच्या सिझनमध्ये. कारण घराच्या मागे असणार्‍या झोपडपट्टितली मुलं ताबडतोब येतात दगडं मारायला. आणि एखादा दिसलाच आंब्यावर किंव पेरूवर दगड मारणारा.. तर.. टिपेच्या चिरक्या स्वरातून ती त्याला शिवी हाणते.. बिचार्‍याला आजी कुठून ओरडते आहे ते दिसतही नाही, आवाज मात्र ऐकू येत असतो. बिचारा इकडं तिकडं बघत निघून जातो.
आजी बसते, काठी ठवते.. मग एकदम म्हणते.."इवडी इवडी झालित आता.. ३-४ दिवसांत पिकली की, आनून देतो हां"
"काय इवडी इवडी झालित आजी? काय आणून देताय??" मी.
"अगं बाई माजे, पिरू गं... इवडी झाल्येत.. आता पिकतील छान.. देतो आनून".. 'इवडी' असं अंगठा आणि इंडेक्स (मराठी??) बोट दाखवत आजी म्हणते.
"हो, पण आजी मी विकत घेणार पेरू.. असेच नकोत मला" मी..
" न्हाइ गं बाई.. माजी प्वोर हायस.. म्हायेरी आलियास.. विकत नक गं बाई.." आवाजात जास्तीत जास्त मार्दव आणून आणि व्याकुळ होत आजी म्हणते.
मला तिचं मन मोडवत नाही. मी 'बर' म्हणते.
तिला कधीतरी औषधं, बिस्किट आणून हवी असली तर येऊन सांगते "ताई, तू भाइर गेलिस तर माजी इवडी औषदं आनि ती मारिची मिळत्यात तसली बिस्किटं बी आनशील ??" पैसे पुढे करते. मी घेत नाही. "आजी, अहो आहेत पैसे.."
"नगं.. हे घ्यून जा. " हातात कोंबते पैसे. मिही फारशी खसखस न करता ते घेते कारण त्यातून तिचा मला स्वाभिमान दिसतो. माझ्या पैशानी औषधं आणायची.. बस्स! इतरांचं काही देणं नको.. हीच भावना.
या बाईचं मला आश्चर्य वाटतं.. काहीही होऊदे... पण तिचं कुत्र, तिची मांजरं.. आणि तिची बाग... या बद्दलचा तिचा अभिमान हा सतत असतो बोलण्यातून. दुसरा विषय म्हणून नाही.
या आजीची एक लकब आहे. ती खुर्चित बसली ना तरी डाविकडे उजवीकडे अशी डुलत असते. बहुदा तिच्या उतरत्या वयामुळे होत असावं.. जशी डॉ. श्रीराम लागूंची मान हलते तशी आजी खांद्याच्या रेषेत डुलत असते.
"बरं.. मी यू का आता?" आजी
" का हो बसा ना.." मी
" नगं.. राधा आणि सखी ( मांजरी आणि तिचं ते पिलू) येतील हितं हुडकत.. जातो आता" आजी. खरंच बरं का मंडळी, एकदा हि राधा आणि सखी आल्या होत्या आजीच्या मागोमग आणि आजी उठेपर्यंत कंपाऊंड वॉलवर बसून होत्या.
आजी उठते तिच्या त्या विटक्या, तळ झिजलेल्या स्लिपर्स चढवते, काठी घेते आणि निघते. मी उठून आत येते आणि जवळ जवळ १० मिनिटांनी फाटकाचा आवाज होतो.. आजी आता कुठे गेटच्या बाहेर पडलेली असते हळूहळू तिच्या चालीने..
दुसरे दिवशी पुन्हा चिरक्या आवाजात हाक ऐकू येते.. "वयनी.. हैसा काय??"

- प्राजु

5 प्रतिसाद:

कोहम म्हणाले...

masta...avadala vyaktichitra

Mints! म्हणाले...

khup chan :) avadali ajji.

ani ho index fingure = tarjani :D

coepcomp म्हणाले...

I like your blog...well maintained..and written..Awesome :)

Innocent Warrior म्हणाले...

nice article, btw index finger is known as "Targani" in marathi. :D

rkul म्हणाले...

ekdum mast lihile aahes. vachun ase vatate ki are aapan pan olakhato ya aaji na.

Page copy protected against web site content infringement by Copyscape