गुरुवार, १० जुलै, २००८

डोळे हे जुलमी गडे...

नमस्कार मंडळी,

शिर्षकावरून असं वाटेल की, मी डोळे या विषयावर काही लिहिणार आहे. तसं पाहिलं तर ते थोडं फार खरंही आहे. तिच्या / त्याच्या प्रेमळ डोळ्यांवर आजपर्यंत अनेक कवींनी कवनं रचली, गझला लिहिल्या, शेर लिहिले. निसर्गानं प्रत्येक माणसाला डोळे देताना रंगनिर्मिती कोठून केली असेल हा प्रश्न मला नेहमीच पडतो. काळे भोर डोळे, भुरे डोळे, पिंगट डोळे, निळसर डोळे, हिरवट डोळे, राखडी छटा असलेले डोळे.. असे कितीतरी प्रकारचे डोळे आपण पाहतो. डोळ्यावरून मनातील भावना लगेच कळतात असं म्हणतात. काही डोळे शांत वाटतात, काही पाणिदार, काही प्रेमळ , काही उथळ, काही खट्याळ, काही भोचक.. काही गंभिर.... तिरळे असतील डोळे तर त्यांना कर्जत कसारा, पन्हाळा-ज्योतीबा किंवा जम्मू-कन्याकुमारी.. अशा प्रकारची लेबल्स सुद्धा लावली गेली. पण हे नक्की की माणसाच्या व्यक्तिमत्वातला एक असामान्य आणि अविभाज्य घटक म्हणजे डोळे. हे झालं माणसांच्या डोळ्यांबद्दल.

प्राण्यांत म्हणजे जनावरांत, एका म्हशीचे डोळे घारे होते ... मला ती त्यांच्यातली ऐश्वर्या रायच वाटली. मनांत म्हंटले हिच्या मागे किती अभिषेक, सलमान आणि विवेक (ओबेरॉय) लागले असतील कोण जाणे?? पण म्हशी या जमाती बद्दल माझं एक सर्वसाधारण मत असं आहे की, डोळ्यांवरून त्या निर्बुद्ध दिसतात. म्हणजे असं की, कुत्रा त्याच्या डोळ्यांवरून चिडका आहे की, प्रेमळ आहे हे कळू शकते. त्यावरून आपण त्याच्या किती जवळ अथवा लांब जायचे हे ठरवू शकतो. बैलाचे डोळे जवळून बघण्याचा संबंध कधी नाही आला. गाय सुद्धा बर्‍याच वेळेला प्रेमळ भेटली. डुक्कर या प्राण्याला डोळे असतात यावर मी विश्वास ठेवू शकत नाही. कारण ते डुक्कर कितीही मोठं असलं तरी ते घाणीत लोळत असताना त्याचे डोळे कधी दिसतच नाहीत आणि घाणीत न लोळणारं डुक्कर मी कधी पाहिलं नाही. बकरी, शेळ्या यांचे डोळे काळे, पिवळट असतात. त्यांच्या डोळ्यात विलक्षण कारूण्य दिसतं मला. शेळीचं पिल्लू असलं तर अत्यंत गोजिरवाण्या त्याच्या डोळ्यांत थोडि भिती थोडासा अवखळपणा दिसतो. ... पण म्हैस.. छे!! तिच्या डोळ्यांवर विश्वास ठेवणे म्हणजे नक्की गोत्यात(की गोठ्यात??)येणे. मी एकदा कॉलेजला स्कूटीवरून जात असताना, रस्त्याच्या उजव्या बाजूकडून ६-७ म्हशी येताना दिसल्या. मी जरा जपूनच चालवू लागले.. पण उजव्या बाजूने जात होत्या त्या म्हशी त्यामुळे भिती नव्हती. आणि अचानक त्यांच्यापैकी एकीच्या मनांत काय आलं कोण जाणे.. संपूर्ण रस्ता ओलांडून ती एका ट्रकला आडवी आली आणि माझ्या पुढच्या एका सायकलस्वाराला धडकली.. तो पडला.. तशीच सरळ मलाही येऊन धडकणार हे उमजून मी पटकन स्कूटीवरून उतरण्याच्या बेतात असतानाच तिने मलाही खाली पाडलं आणि तशीच ती पुढे जाऊन एका रिक्शाला धडकली. पाठीमागून तिचा मालक पळत आला आणि तिने बाकी कोणाला आडवं करायच्या आत त्याने तिला धरून नेलं. हे असं असतं.. म्हशीचा मूड काय आहे हे तिच्या डोळ्यांत अजिबात दिसत नाही. म्हणून म्हशी डोळ्यांवरून तरी निर्बुद्धच दिसतात.
गोंडस दिसणारा ससा, त्याचे लाल चुटुक डोळे.. त्याच्या डोळ्यांमध्ये भिती आणि कुतुहल दिसतं. आपल्या जवळ आलेली माणसं नक्की आपल्याला का हात लावताहेत याचं कुतुहल आणि आपल्याला मारणार तर नाहीत ना.. ही भिती. कुत्र्याच्या डोळ्यांमधे इतक्या प्रकारचे भाव उमटत असतात की मीही कधी कधी हवालदिल होते. आपलं आवडतं माणूस जवळ आलं की, अतिशय प्रेमळ भाव दिसतात त्याच्या डोळ्यांत. कोणी अनोळखी असेल तर राग असतो.. माझ्या कुत्र्याच्या डोळ्यांमध्ये मी राग पाहीला तो डॉक्टर लोकांसाठी. मग तो जनावरांचा डॉक्टर असो वा माणसांचा. घरातील कोणी आजारी असेल आणि डॉक्टर आले की, आमचं कुत्र ते डॉक्टर जाईपर्यंत त्यांच्या कडे रागाने बघत समोर बसून रहायचं. आणि इंजेक्शन देताना चुकुन "आईगं!!" किंवा तत्सम वेदनादायक आवाज झाला तर डॉक्टरचं काही खरं नाही मग. हरणाच्या डोळ्यांबद्दल काय बोलावं. अत्यंत रेखीव, निर्मळ, निरागस आणि नाजूक डोळे ते. एखाद्या सुंदर डोळ्यांच्या मुलीला मृगनयनी म्हणतात ते बहुतेक याच साठी.
आता हा लेख लिहिण्याचा खरा खटाटोप होता .... ते मांजर या प्राण्याच्या डोळ्यांबद्दल. मांजराचे डोळे. ....काय नसतं हो त्या डोळ्यांमध्ये??? सर्वात देखणेपणा लाभलेला प्राणी आहे हा. ३-४ दिवसांचं पिलू सुद्धा डोळे मोठे करून टुकुटुकु पहात असतं तेव्हा त्याच्या डोळ्यांमध्ये किती कुतुहल असतं! मांजर या प्राण्याचा लहानपणापासून खूप जास्ती संबंध आला त्यामुळे असेल कदाचित, पण मांजराच्या डोळ्यांतले भाव मी नीट ओळखू शकते. लडिकपणे कागदच्या बोळ्याशी, रिबिनशी, शू-लेसशी खेळणारं मांजर पाहिलं तर त्याचे डोळे नेहमीच अवखळ, अल्लड, खट्याळ वाटतात मला. चिडलेलं मांजर, त्याच्या डोळ्यांतली बाहुली एकदम बरिक होते आणि डोळे रागीट होतात.. . शांत बसलेलं मांजर डोळ्यांमध्ये गरीब भाव घेऊन बसतं.. .. बागमध्ये हिंडणारं मांजर, इकडे तिकडे वास घेत.. अलगद चालत असतं .. तेव्हाचे त्याचे डोळे म्हणजे सतत काहीतरी शोध घेणार्‍या शास्त्रज्ञासारखे वाटतात. मांजराच्या डोळ्यांचे रंग तरी किती... पिवळ्या रंगाचे .. हिरवट रंगाचे, निळे.. काळे, लाल... दगडी रंगाचे... कितीतरी रंगाच्या डोळ्यांची मांजरं मी आतापर्यंत पाहीली. पण त्या सगळ्या मांजरांमध्ये एक गोष्ट होती ती म्हणजे त्यांचे सगळ्यांचे दोन्ही डोळे.... एक सराखे होते... म्हणजे.. एक डोळा दुसर्‍या सारखा होता. पण नुकत्यात पाहिलेली मांजरी आणि तिचं पिलू दोघांचेही डोळे वेगवेगळे होते. म्हणजे आईचा एक डोळा निळा आणि एक डोळा हिरवा ... आणि पिलाचाही एक डोळा हिरवा आणि दुसरा निळा.... पण तरिही दोघं अतिशय देखणी आहेत... विश्वास नाही बसत.. हे फोटोच पहा त्या माय लेकरांचे... खूप खटाटोप करावा लागला त्या दोघांचे त्यांच्या त्या डोळ्यांसकट फोटो मिळवण्यासाठी. पहा.. आहे ना निसर्गाची किमया!!!!

- प्राजु.

माय्-लेकरं दोघं....पिलू : काय नजर आहे.. !शांत डोळ्यांची आई..आईची एक मुद्रापिल्लाची भावमुद्राआईची नजर...रोखलेली..पिल्लू..2 प्रतिसाद:

xetropulsar म्हणाले...

मनाचा आरसा म्हणजे डोळे. . .सुंदर. . .आधी विश्वास बसत नव्हता वाचताना पण फोटो पाहिल्यावर ठेवावाच लागला. . .अजून वेगळे डोळे म्हणजे घुबडाचे, कायम वटारलेले. . कावळ्याला एकाक्ष म्हणतात, तर मधमाशांच्या प्रत्येक डोळ्यात टेक्निकली हजारो डोळे असतात. . .

अमित

zelam म्हणाले...

मस्त आहे तुझा ब्लॊग प्राजू.
बघितलस का त्या मांजरीचे आणि तिच्या पिल्लाचे डोळे निळे आणि हिरवे आहेत हे खरं पण वेगळे वेगळे, म्हणजे पिल्लाचा उजवा डोळा निळा आणि आईचा डावा आणि vice versa.

Page copy protected against web site content infringement by Copyscape