सोमवार, २ जून, २००८

औट घटकेचा पाहुणा...

मंडळी,
परवाच्या शुक्रवारी आमच्याकडे एक भन्नाट घटना घडली... सांगू?? सांगतेच.
तर झालं असं....
आमच्या कडे सकाळी सकाळी ७.०० वाजता पाणी येतं कार्पोरेशनचं. ते आलेलं होतं आणि आई अंगणात पाणी मारत होती. ते झाल्यावर तिने काही झाडांनाही पाणी घातलं. हे सगळं काम आई अंगणात आमच्या २ कुत्र्यांना सोबत घेऊन करते. म्हणजे ती कुत्री सकाळी अंगणात तिच्यासोबत हिंडत असतात. तर त्यादिवशी पाणी मारत असताना एकदम धप्प असा आवाज आला. आईने जाऊन पाहिले तर एक पिलू असलेला पोपट अंगणातल्या फरशीवर पडला होता. तो पडला, तसाच उठला आणि उडायचे सोडून चालू लागला. आमची कुत्री ताबडतोब शिकार मिळाल्याच्या आनंदात त्या पोपटावर धावून गेली. त्यात भर म्हणून की काय, सुगावा लागल्याप्रमाणे आमचं मांजरही तिथे दैत्य म्हणून हजर. झालं.... ! आईची तारांबळ उडाली. त्या पोपटाला वाचवायचं कसं? आईने मला जोरदार हाक मारली. साखर झोपेतून जागी होत मी अंगणात पळाले. झालेला प्रकार आईने गडबडीने कुत्र्यांवर ओरडत, मांजराला हुस्कावत मला सांगितला... मला पु.लं.च्या चितळे मास्तरांची आठवण झाली.
मी मोठ्या कुत्र्याला घराच्या मागच्या अंगणात पिटाळलं, लहान आहे त्याला त्याच्या घरात बंद केलं आणि मांजराला घरात हाकललं. मी हे सर्व करे पर्यंत आई त्या पोपटाच्या मागे त्याला पकडायला चालत (पळत नव्हे) होती. पण चाल हळूहळू असली तरी आईला(कोंबडी मागे पळण्याची सवय नसल्याने) तो पोपट काही पकडता येईना. शेवटी मी पुढे सरसावले (है शाब्बास... झाशीची राणी!!). आणि (कोंबडीमागे पळण्याची नाही, तरी मुलामागे पळण्याची सवय असल्याने) अलगद तो पोपट हातात उचलून घेतला. हुश्श! मात्र..... त्या पोपटाने जमेल तसे वळून, वेडेवाकडे होत... माझ्या हाताला चावायला सुरूवात केली. (इश्य! माझा हात त्याला पेरूप्रमाणे गोड वाटला की काय??) डाव्या हातचे एक बोट, उजव्या हाताची २ बोटं अगदी अनेक वेळा चावून जखमी केली. तरीही मी त्याला खाली सोडत नाही म्हंटल्यावर त्याने माझ्या बोट चावून रक्तबंबाळ केलं. मग मात्र मी त्याला खाली सोडून दिला. इतक्यात मला आमचं मांजर खिडकीतून उडी टाकून खाली आलेलं दिसलं. झालं! हा पोपट आता बहुतेक या मांजराचे भक्ष्य होणार. आईने मला पटकन टॉवेल आणून दिला. तो टॉवेल त्या पोपटावर टाकून मी त्याला अलगद उचलला. आता मात्र त्याला माझा हात खाता म्हणजे चावता येईना. आईने कांदे-बटाटे ठेव्ण्याची जाळिची झाकण असलेली बास्केट रिकामी केली आणि मला आणून दिली. मी पोपट त्यात ठेवला. टॉवेल काढण्याआधी त्यात त्याला थोडा खाऊ ठेवला. आणि मग टॉवेल काढून, पटकन झाकण लावले. आणि त्यावर जाडजूड ऑक्सफर्डची डिक्शनरी ठेवली. शुकाचर्यांचा अभ्यास होईल आणि दुसरे महत्वाचे मांजराला बास्केट खाली ढकलून पाडता येणार नाही. पोपटाचे संरक्षण...! वाह वाह... हुश्शार!
सकाळची सगळी कामे उरकून मी भर दुपारी १२.०० वाजता, जराही उन वाया न घालवता, पोपटासाठी पिंजरा आणायला बाहेर पडले. पण पिंजरा मिळतो कुठे कोणाला माहिती?? गावभागांत चौकशी केल्यावर समजले की महानगरपालिकेपाशी मिळतो पिंजरा. तिथे गेले. त्या दुकानदाराशी हुज्जत घालून २३० रू.चा पिंजरा १७५ रू. ला घेतला. स्कूटरवरून सर्कस करत तो पिंजरा ट्रॅफिकमधून घरी घेऊन आले. त्यामध्ये असणार्‍या वाट्यांच्या जागी, घरातली कोणतीही वाटी बसेना. म्हणून मग, एका १२च्या सेट मधले २ कप त्यांचे कान अगदी नीट फोडून त्या पिंजर्‍यात ठेवले. एकात पाणी आणि एकात पोळीची तुकडे घातले. माळ्यावर चढून एक तार शोधून ती त्या पिंजर्‍याला बांधली. आणि मग शुकाचर्यांना अलगद त्या पिंजर्‍यात ठेवले (पुन्हा एकदा टॉवेल). आणि पिंजरा पोर्चमध्ये वरती खुंटीला टांगला. पोपटरावांनाची ते घर आवडलं असावं कारण "ट्रॅक ट्रॅक.. किर्रर्र्..."असा आवाज काढून त्यांनी तो आनंद साजरा केला.
आम्हीही निवांतपणे जेवलो आणि पोपट पाळण्याची स्वप्नं रंगवत, त्याला बोलायला कसं शिकवायचं... वगैरे विचार करत बसलो. अधून मधून पोपटराव आपला ठेवणीतला आवाज काढून ओरडत होतेच. आम्हालाही गम्मत वाटत होती. असेच ३-४ तास निघून गेले.
आणि संध्याकाळी ६ च्या दरम्यान फाटकाबाहेर दंगा ऐकू आला. बाहेर जाऊन पाहिले तर..आमच्या घरासमोर असणार्‍या कारवानांच्या वस्ती वरची माणसं होती ती. त्यांनी सांगितले की, तो पोपट त्यांचा होता. सकाळी निघून गेला होता. त्याचे पंख कापले होते म्हणून त्याला उडता येत नव्हते. (अच्छा!! आम्हाला वाटले की, ते पिलू आहे म्हणून त्याला उडता येत नाही.) आणि गेली ९ वर्षे तो त्यांच्याकडे आहे. सकाळपासून त्या मुलाच्या वडिलांनी पोपट हरवला म्हणून जेवणही नाही केले. आणि सकाळपासून ती लोकं त्या पोपटाला शोधत आहेत. आणि त्याचा आवज ऐकून माग काढत ते आमच्या घरी आले........................ अरे परमेश्वरा!!!
आता काय???? ह्या पोपटासाठी मी / आम्ही काय काय नाही केलं??? मी त्याला पकडण्यासाठी स्वतःची बोटं जखमी करून घेतली.... श्वान, मार्जार या सारख्या हिंस्त्र प्राण्यांपासून त्याचं रक्षण केलं.... त्याला ऑक्सफर्ड डिक्शनरी दिली वाचायला.... भर तळपत्या उन्हांत जाऊन त्याच्यासाठी ... त्या दुकानदारशी हुज्जत घालून स्कूटरवरून कसरत करत पिंजरा आणला... त्याला खायला घालण्यासाठी चांगल्या कपांचे कान फोडले.. मी आईच्या शिव्या खाल्ल्या.... आणि इतके करून... तो शुक्रवारी आलेला शुकाचार्य त्याचदिवशी निघून गेला. ...जाताना मात्र माझ्या मनाला उगाचच उदास करून गेला..

3 प्रतिसाद:

abhijit म्हणाले...

Zakkas story ahe...Mandani uttam ,vachakacha interest shevat paryanta rahto !!

कोहम म्हणाले...

chaan..avadali goshta

MUSICISAMAGIC म्हणाले...

शेवट चटका लावून गेला. एवढे चावून घेऊनहि सोडले नाही म्हणजे आश्चर्यच आहे. अभिजितशी सहमत आहे. वाचकांची उत्कंठा शेवटपर्यंत कायम राहाते.

Page copy protected against web site content infringement by Copyscape