शुक्रवार, २ मे, २००८

माझा ताटवा...

मंडळी,

बुधवारी पहाटेच आमचे आगमन आमच्या माहेरी म्हणजे करवीर नगरीत झाले. पहाटे ३.३० ला आम्ही आमच्या मुक्कामी दाखल झालो. घरी पोहोचताच आईने आमच्यावरून्(मी आणि माझा छोटा) भाकर तुकडा ओवाळून टाकला आणि आम्हाला घरांत घेतलं. आल्या आल्या घरातल्या लोकांबरोबरच कुत्री, मांजरी यांच्याशीही गाठीभेटी झाल्या आणि त्यांच्या मूक मायेनं मन खरंच भरून आलं. सगळ्यांसाठी आणलेल्या वस्तू बॅगेतून काढून दिल्या.. ..माझी झोप तर उडालीच होती त्यामुळे घरच्यांना (खरंतर आईलाच) झोपू देणार नाही असं सांगून टाकलं. आणि मग इथे येण्याच्या आधी काय काय धमाल चालू होती माझी.. रेडीओवर काय काय घोळ घालते आहे.. आजारी कशी पडले.. यथोचित वर्णन करून सांगून झालं. हे सगळं होईपर्यंत ५.०० वाजले होते आणि उजाडायला लागलं होतं. थोडी फ्रेश होऊन अंगणात आले.खूप दिवसांनी माझं अंगण पहात होते तेही भल्या पहाटे. खूप बरं वाटत होतं.. एकेक प्रसंग आठवत होते. सहजच पाठिमागे बागेत गेले. पहाते तर काय.. मी लावलेल्या झाडांना सुंदर फुलं आली होती. कणेरी, जास्वंदी, स्वस्तिकाची फुलं... आणि पहाटेच्या त्या रम्य वेळी ती इतकी सुंदर दिसत होती.. वातावरण मायेनं भरून गेलं होतं. असं वाटत होतं, की हि सगळी फुलं मला म्हणताहेत," कशी आहेस गं? बघ, किती दिवसांनी भेटलीस. त्या तुझ्या दुनियेत अनेक रंगिबेरंगी फुलं पहात असशिल.. पण आमची आठवण येते का गं तुला? " मी लावलेल्या, जोपासलेल्या, त्या झाडांना इतक्या देखण्या रूपात पाहून काय करावं आणि काय नको असं झालं होतं. मनामध्ये दाटून आलेली ही हूरहूर मोकळी व्हावी म्हणून कॅमेरा घेऊन आले आणि त्या फुलांचे हसू टिपू लागले. फोटो काढता काढता एका छोट्याशा ३-४ फूट उंच अशा नारळाच्या झाडाजवळ आले. मंडळी, हे रोपाची गंमत अशी.. की एकदा आईने नारळ फोडून दे असं सांगितलं मला. तेव्हा कोठीच्या खोलीतून एक नारळ घेऊन आले. तो सोलला.. पहाते तर त्याला एक कोंब आलेला दिसला. मी तो नारळ तसाच एका मोठ्या पातेल्यात पाणी घेऊन ठेवून दिला. आणि नंतर मी माझ्याच नादात ते विसरूनही गेले. साधारण १५ दिवसांनी मला त्याची आठवण झाली आणि मी खाली जाऊन पाहिलं. चक्क त्या कोंबातून दोन इवली इवली ,नाजूकशी, नितळ हिरव्या रंगाची, निमूळती.. अंगावर रेषा असलेली पानं .. माझ्याकडे पहात होती. ती थोडी मोठी झाल्यावर मी तो नारळ बागेत लावला. पण महिन्याभराने ती पानं मरून गेली. मी निराश झाले होते. त्यानंतर काही दिवस असेच गेले. आणि पुन्हा त्यातून दोन पानं आली... आणि पुढे कित्येक दिवस ती दोनच पानं होती. आणखी पानं येण्याचं नावचं नाही. माझं लग्न झालं तेव्हा जेमतेम ३ पानं होती त्या रोपाला.. जरा मोठी होती इतकंच. त्यानंतर जेव्हा जेव्हा माहेरी आले तेव्हा तेव्हा त्या झाडामध्ये मला फारसा बदल जाणवलाच नाही. आणी आज मात्र ते चांगलं ३-४ फूट उंच जाणवलं... हे माझं झाड. मला ते जणू सांगत होतं ,"बघ, मी किती मोठा झालो... !"दुसरं झाड म्हणजे कदंबाचं. बागेत जेव्हा मी रोपं लावत होते तेव्हा हे असं आपोआप आलेलं. त्याची पानं सिमेट्रीकल होती आणि चांगली मोठी होती. झाड मोठं झाल्यावर सावली चांगली येईल या विचारने ते तोडून नाही टाकलं. पण ते इतकं भराभर वाढलं की, त्याचा कधी वृक्ष झाला हे समजलंच नाही. आणि एकदा एक स्नेही आमच्याकडे आले होते त्यांच्याकडून समजलं की हा कदंब आहे.हा वर्षातून एकदाच फुलतो. याचं फुलही गमतीदार असतं बरं का..! म्हणजे दिसताना ते फळासारखं दिसतं आणि त्यावर छोटे छोटे तुरे असतात. आणि एखाद्या चेंडूवर सुवर्णाने भरतकाम करावं तसं ते देखणं फुल मन मोहवून टाकतं. श्रीकृष्ण त्याखाली उभा राहून बासरी वाजवत होता अशी कथा पुराणात सांगतात. खरंतर सुवर्णाच्या त्या विलक्षण शृंगाराने नटलेल्या वृक्षाचा मोह त्याला पडला नसता तरच नवल! पहा ना, नेमका मी येण्याच्या वेळीच हा कदंब नटून, सजून उभा रहावा!! माझ्या या सख्यांनी माझ्यावर किती माया करावी??? त्यांच्या मूक प्रेमानं मी गुदम्रून गेले. मन कुठे मोकळं करावं? आपल्या लोकांजवळचं मन मोकळं करावं या विचारानं हे फोटो इथे देण्याचा माझा खटाटोप. मी कोणी निष्णात फोटोग्राफर नाही पण तरिही या माझ्या चिमुकल्यांना मी कॅमेर्यात बंद केलं. पहा बरं माझे जीवलग मित्र आणि मैत्रिणी कशा वाटतात तुम्हाला??
कणेरी


स्वस्तिकाची फुले
जास्वंदीकदंबाचं फुल

बहरलेला कदंबबहरलेला कदंब २

माझा ताटवा माझ्या मनात नेहमीच असा बहरत आणि दरवळत राहिल.

3 प्रतिसाद:

Kedar म्हणाले...

Bahralelya Kadambacha photo khoopach masta aahe.. mee pahilandach pahila haa vruksha...ataaparyant navach eikun hoto.. thanks for th photo :)

Jaswandi म्हणाले...

स्वतः लावलेल्या झाडांना फुलं आलेली पाहुन, झाडं मोठी झालेली पाहुन होणारया आनंदाची कशाचीच तूलना होऊ शकत नाही...
खूप मस्त वाटतं... कदंब सही आलाय, मला त्याचा थोडा गोडसर वासही आवडतो!

Arun म्हणाले...

व्वा! मन एकदम प्रसन्न झाले ताटवा पाहून.
अरूण मनोहर

Page copy protected against web site content infringement by Copyscape