गुरुवार, २७ मार्च, २००८

मन आंब्याचा मोहोर...!

मन बगळ्यांची माळ,निळ्या नभाच्या प्रांगणी..
मन प्रतिबिंब वेडे, वेड्या तळ्याच्या दर्पणी..

मन इवलेसे फूल,नटे प्राजक्ताची फांदी..
मन मातीचा तो गंध, चढे नभालाही धुंदी..

मन आंब्याचा मोहोर, सुवर्णाचे जणू दान..
मन बसंत बहार,मधुर कोकीळ गान..

मन मोत्याचा तो थेंब, उठे पाण्यात तरंग..
मन पावसाची धार, भिजवील अंग अंग..

मन भूपाळीचा सूर, पहाटेच्या समयीचा..
मन तेवता प्रकाश, गाभार्‍यातल्या समईचा...

मन विद्युल्ल्ता पात,धरेवर कोपणारा..
मन बरसता मेघ,जलांमृत सांडणारा..

मन कुंकवाची रेघ, भांगामध्ये रेखलेली..
मन मायेची ती काठी, कमरेत वाकलेली..

मन सवाष्ण शृंगार, सुवासिनिचं ते लेणं...
मन चांदणं ठिपूर, जणू नक्षत्रांचं देणं...

- प्राजु

3 प्रतिसाद:

HAREKRISHNAJI म्हणाले...

कविता आवडल्या.

Meenal म्हणाले...

`मन`चे रसग्रहण
प्रेषक मीनल
ओळीचा पुर्वार्ध आणि उत्तरार्ध यांचा उत्तम मेळ आहे.
तसेच आधीची ओळ आणि त्या नंतरची ओळ यात ही संबंध आहे.
ते संबंध मग मनाशी जोडलेले आहे.
तेच आपल्या मनाला भिडतात.

वाचकाला विचार करायला लावतात या ओळी.
म्हणजे मन हे आकाशातल्या अंगणातली बगळ्यांची माळ कशी?
मन हे प्रतिबिंब कसे?
मग फूल कसे ,थेंब कसे ,पात कसे ? वगैरे वगैरे.
वाचक आपला अर्थ लावतो.तो `मना`ला जोडतो .
अर्थ उलगडत जातात.कविता अधिकाधिक अर्थपूर्ण,खरी,वास्तव होत जाते.

कवयित्रीने सरळ सरळ काहीच सांगितले नाही मनाबद्दल.
मन `हे` `ते`च आहे असे म्हणते.
दोन गोष्टींचे साम्य दाखवते आहे.पण `सारखे ,जसे ,तसे ,या प्रमाणे``या शब्दांचा वापर केलेला नाही.
Simile नाही .तर Metaphor आहे.
यामुळे ते विचार करायला लावते.
दोहोंमधले साम्य शोधायला लावते.
कधी सोपे आहे .कधी आडवळणाचे!

यमक ही ओढून ताणून जुळवलेले नाही.
बहिणा बाईंच्या `मन वढाय वढाय ` या अष्टाक्षरी सारखे आसल्यामुळे मी ही कविता त्या चालीवर गायली.
अधिक गोड वाटते.

भूपाळी ,समयी ,समई,कुंकू ,सुहासिनी याशब्दांअधून सोज्ज्वळता दिसते आहे.`परंपरे`चा पुसटसा स्पर्श आहे.
तळ ,कोकिळा ,मोती ,चांदण यातून वातावरणात साधेपणा उभा केला आहे .मनाला भावतो तो.

खरी कवयित्री जाणून बूजून काही करत नाही.फक्त छान छान ओळी लिहित जाते.
प्राजूचे ही `साम्याचा शोध घ्यायला लावणे` ,`Metaphor मुद्दाम वापरणे` असे हेतूपूर्वक केलेले नाही हे स्पष्ट आहे.
मीच विचार केला कवितेचा ,ती का आवडली ?याचा.ही उत्तर मिळाली मला.
ती लिहून काढली इथे मिपावर.

म॑ला वाटायला लागले आहे की प्राजूने ही इतका विचार केला नसेल `मन` लिहिताना.
म्हणजे मनाचा केला असेल (कारण त्या शिवाय इतके सुंदर कसं लिहायला जमेल?)
पण कवितेचा नाही.

अजून खूप आहे लिहिण्यासारख.नाही का?
ते तुम्ही लिहा.

Kranti म्हणाले...

kavita aani rasgrahan donhihi apratim sundar! praju, tujhya saglya kavita aaj punha vachlya. yaa aadhi pratisad kasa dyaycha te lakshat aal naahi. atahi devnagri script jamal nahi, pan pratisad dilyashivay rahavat nahi! khoop great lihites. gadya aani padya donhihi tevdhyach takdeene lihites! khaas!

Page copy protected against web site content infringement by Copyscape