म्हाळसाक्का!! 1
म्हाळसाक्का!!
(डिस्क्लेमर : ही कथा पूर्णपणे काल्पनिक आहे. यातल्या पात्रांचा घटनांचा कोण्याही जिवंत अथवा मृत व्यक्तीशी संबंध नाही. असा संबंध आढळल्यास योगायोग समजावा.)
रखरखीत सूर्य किरणांनी चेहर्याची त्वचा तापवून काढली तशी भालबा ला शुद्ध आली. डोळे हलके हकले उघडत त्याने मान वर उचलायचा प्रयत्न केला.. पण त्याला तेही शक्य झालं नाही. पुन्हा तसाच तो काही वेळ पडून राहिला. मग पुन्हा थोडासा जोर देऊन, ठणकणार्या अंगाकडे दुर्लक्ष करून तो उठून बसला. सभोवार एक नजर टाकली. रखरखीत उन, आणि उजाड परिसर!! लांब डोंगरावर काही शेळ्या चरताना दिसत होत्या.. "काय खात असतील त्या? गवत तर कध्धीचच सुकून गेलंय.." तशाही अवस्थेत त्याच्या मनात विचार आला. आणि अचानक आपल्यालाही भूक लागल्याची जाणिव त्याला झाली. जवळ काहीच नव्हतं. आणि त्याला आपल्या घराची आठवण झाली.. आईची आठवण झाली. आपल्या आईचं काय झालं असेल?? गावकर्यांनी तिचं काय केलं असेल? जादू टोणा- करणी करणारा .. सगळ्या गावावर त्याने करणी केली म्हणून पाऊस नाही पडला.. आणि पिक नाही आलं, गुरं ढोरं यानंच मारून खाल्ली... असे अनंत आरोप करून भालबाच्या घराची मोड्तोड करून .. त्यांनी भालबाला गावाबाहेर हकलला होता. गाककर्यांनी त्याला उचलून गावाबाहेर फेकून दिला होता. गावकर्यांच्या घोळक्यात सापडण्या आधी एकदाच त्याने केविलवाण्या नजरेनं आईकडे पाहिलं होतं.. आणि तिच्या डोळ्यांत थोडा त्याच्याबद्दल अविश्वास, थोडी माया, थोडं दु:ख.. हे पाहून त्याच्या पोटात कालवाकालव झाली होती. संध्याकाळी त्याला गावाबाहेर काढल्यानंतर रात्रभर तो कसाबसा उपाशी पोटी चालत चालत या इथे येऊन पोचला होता. भालबा!!! १० पर्यंत तालुक्याच्या गावी लांबच्या मामाकडे राहून शिकलेला आणि नंतर थोड्याशा या शिक्षणावर गावकर्यांना शिकवण्यासाठी गावी येऊन धडपड करणारा. त्यांच्या अंध:श्रद्धा दूर करण्यासाठी झटणारा..पण आज तोच करणी करणारा ठरला होता. भालबा.. आणि करणी करणारा!!! छे छे!!! त्याचं मन व्याकुळ झालं होतं.
दूरवर चरणार्या शेळ्यांना पाहून तो उठून उभा राहिला. तिथे कोणी भेटलं तर काहीतरी मदत घेता येईल या विचाराने तो ठणकणार्या पायांनी तसाच खुरडत टेकडीकडे चालू लागला. तो तिथे पोचे पर्यंत शेळ्या खाली येऊ लागल्या होत्या. इतक्या चालण्यानेही त्याला दम लागला. तिथेच तो खडकावर बसला. हातापायावर मारल्याच्या खुणा होत्या.. पाठ ठणकत होती. डोक्याला जखम झाली होती. डोकं दोन्ही हातांच्या ओंजळीत घेऊन नुसताच बसून राहिला. शेळ्यांचे ओरडणारे आवाज त्याच्या कानावर पडत होते.. इतक्यात खांद्यावर कोणीतरी हात टाकला आणि त्याची समाधी भंग पावली. त्याने मागे वळून पाहिलं तर केस पांढरे झालेली, मधले दोन दात पडलेली, कपाळावर काळं गंध लावलेली , डोक्यावरचा पदर कमरेशी घट्ट खोचलेली, बर्यापैकी जाड म्हणावी अशी अंगकाठी असलेली, भेदक डोळ्यांची एक बाई त्याच्याजवळ उभी होती. क्षणभर तिला पाहून त्याच्या काळजात चर्रर्र झालं. पण लागलीच तो सावरला. तिच्या हातात मोठा दांडुका होता.. "मारलं तर क्षणात प्राण जाईल.." त्याच्या मनात एकदम विचार आला.
"कोन रं तू?" भारदस्त आवाजात ती म्हणाली. कपाळावर आठ्याचं प्रचंड जाळं होतं.
"मी.. मी भालबा..!" तो चाचरतच म्हणाला.
"कुठनं आलास? ह्ये काय आनि समंद?? कुनी मारलं काय तुला?" एकावर एक प्रश्न ! आवाजातली जरब थोडी कमी झाली होती.
"हम्म!.... " भालबा काहीच बोलला नाही. बोलणार तरी काय? सांगणार तरी काय?
"चल.. तिकडं माझं खोपटं हाय. चल!!" आवाजात पुन्हा एकदा जरब जाणवली त्याला. तसा तो उठून, पुन्हा खुरडत खुरडत तिच्या मागोमाग जाऊ लागला.
सगळ्या शेळ्यांना बांधून म्हातारीनं खोपटाचं दार उघडलं.. भालबा आत आला. भिंतीला एका कोपर्यात टेकून दोन्ही हात गुडघ्यावर ठेवून बसला. म्हातारीनं लोटाभर पाणी दिल प्यायला त्याला. ते प्यायलावरही त्याला खूप बरं वाटलं. या मातीप्रमाणं आपलं शरीरही सुकून गेलं होतं... असं त्याला वाटून गेलं. घटाघट पाणी पिऊन तो पुन्हा शांत बसून राहिला.
"मागल्या निंबोर्याजवळ, एका पिंपात जरासं पानी हाय... लई नाय घ्याचं. जरासंच घ्यून त्वोंड -हात्-पाय धुवून घे जा.." आवाजातली जरब तश्शीच होती.. पण त्याला थोडी मायेची किनार लागली होती. भालबा उठला आणि मागच्या दाराला जाऊन त्याने गार पाण्याने हात्-पाय धुवायला सुरूवात केली. तोंडावर पाणी मारणार इतक्यात आवाज आला..
"बास बास!!!! लई नगं घ्यू पानी..."
किंचित हसून भालबाने थोडंसं पाणी तोंडावर मारलं आणि फाटलेल्या सदर्याला तोंड पुसत तो पुन्हा आत आला.
म्हातारीने चुलवणावर ज्वारीच्या कण्या शिजवायला ठेवल्या होत्या. त्याचा मस्त वास सुटला होता आणि पुन्हा एकदा त्याची भूक चाळवली गेली होती. शिजलेल्या कण्यात खडेमीठ घालून, थोडंसं ताक घालून तिनं ते एका वाडग्यात त्याच्या समोर ठेवलं. एक शब्दही न बोलता त्याने ते वाडगं उचललं आणि खायला सुरूवात केली. खाऊन झाल्यावर त्याला खूप हुशारी वाटली. आता त्याचं लक्ष जरा आजूबाजूला गेलं. म्हातारीचं खोपटं छोटं असलं तरी म्हातारी थोडासा पैसा हाती राखून आहे हे सांगणारं होतं. श्रीमंत नाही... पण घरात १-२ मोठी पातेली होती. एका बाजूला पाण्याने भरलेलं पिंप होतं. चुलवणाला लागणारा लाकूडफाटा एका बाजूला होता. एका दोरीवर म्हातारीची २ भारी लुगडी आणि २ साधी लुगडी घडी करून टाकलेली होती. त्याचं लक्ष म्हातारीकडं गेलं.. ती त्याच्याकडेच पहात आहे हे त्याच्या लक्षात आलं. आपण तिचं घर निरखत होतो आणि पकडले गेलो... असं त्याला एकदम वाटून गेलं. तो ओशाळला. तशी म्हातारी खळखळून हसली. कपाळावरचं आठ्यांचं जाळं निघून गेलं आणि प्रथमच त्याला तिचे पुढचे दोन दात नसल्याची जाणीव झाली.. भेसूर वाटत असली तरी त्याला आता तिची भिती नाही वाटली.
"मावशे, कोन गं तू?" त्याने तिच्याकडे कृतज्ञतेने पहात विचारले..
"मावशी म्हनालास नव्हं.. मंग मावशीच म्यां." बेफिकीरीने ती म्हणाली.
तिचं वागणं बुचकळ्यात टाकणारं आहे असं त्याला वाटून गेलं.
क्रमशः
0 प्रतिसाद:
टिप्पणी पोस्ट करा