म्हाळसाक्का २
म्हाळसाक्का.. भाग १
"मावशे, कोन गं तू?" त्याने तिच्याकडे कृतज्ञतेने पहात विचारले..
"मावशी म्हनालास नव्हं.. मंग मावशीच म्यां." बेफिकीरीने ती म्हणाली.
तिचं वागणं बुचकळ्यात टाकणारं आहे असं त्याला वाटून गेलं.
तो तिच्याकडं बघतच राहिला. म्हाळसाक्कानं त्याच्या पुढतला वाडगा उचलला आणि मागे निंबोर्या जवळ असलेल्या मोरीपाशी नेऊन धुऊन आणला आणि पुन्हा कोंडाळात ठेऊन दिला. तो तिच्या भराभर होणार्या हलचालींकडे बघतच राहिला. "म्हातारी जाड असली तरी वीजेसारखी लवतीय.." त्याच्या मनात विचार आला.
"कुठनं आलास म्हनायचा बा तू?" त्याच्या समोर परत बसत तिनं विचारलं.
" भिलवण्याचा मी." सारवलेल्या जमिनीवर एका काडिने टोकरत तो म्हणाला.
" बरं.. हितं कसा काय? आनि ह्ये लागलं कसं तुला.. कुनी मारलं का काय?" कपाळाला किचिंत अठी घालत म्हातारी म्हणाली.
तो काहीच बोलला नाही. म्हातारीनेही पुढे काही विचारलं नाही. "बरं आता काय करनार हाईस? कुटं जानार?"
" कुटं तरी काम करेन म्हन्तो. दोन वेळचा पोटाला झालं तरी लै झालं.." थोड्या उदास चेहर्यानंच तो म्हणाला.
"आसं कर.. आजचा दिस हितं र्हा. आणि उद्या वडणग्याला जा.. तितं दामू सुतार हाय. माझ्या पोरावानीच हाय त्यो. त्याच्याकडं जा. लाकडची खेळनी तयार करतो बघ त्यो. त्याच्याकड लाग कामाला.. कसं??" म्हातारीने त्याच्या डोळ्यांत बघत विचारलं.
" चालल.. काय बी काम करन म्या." काम मिळतंय हे पाहून त्याच्या डोळ्यांत चमक आली. तशी म्हातारी हसली आणि एका मोडक्या कपाटातून तिनं एक वाकळ अर्धवट शिवलेली वाकळ काढली. कोपर्यात ठेवलेलं जाजम तिनं खाली अंथरलं आणि त्यावर बसून ती वाकळ पूर्ण करू लागली. तो तिनं शिवलेल्या त्या वाकळेकडे बघतच बसला. जुन्या कापड्यांच्या ठीगळांना चौकोनी, त्रिकोणी आकारात एका सुंदर नक्षी मध्ये ती गुंफून ती वाकळ पूर्ण करत होती. इतकी सुंदर वाकळ किंवा गोधडी त्यानं आज पर्यंत पाहिली नव्हती. नाजूक आणि एकसारखी शिवण म्हातारी इतक्या लिलया घालत होती .. कुठलाही टाका लहान नाही वा मोठा नाही. अगदी मोजून पहावा इतका एकसारखा. इतकी स्वच्छ शिवण घालणार्या या म्हातारीचं मनही तितकंच स्वच्छ असणार असं त्याला वाटून गेलं. किती वेळ गेला कोणास ठाऊक.. त्याला आता डोळ्यांवर झोपेची झापड येते आहे असं वाटू लागलं आणि तो तिथंच सारवलेल्या जमिनीवर आडवा झाला.
उठला तेव्हा सांज कललेली होती. म्हातारी शेळ्यांच्यापाशी होती.. तो हळूच उठून बाहेर गेला. ती शेळ्यांच्या जवळ बसून त्यांना गोंजारत होती. त्यांच्याशी बोलत होती. तो गालातच हसला. आणि पुन्हा निंबोर्याजवळ जाऊन थोड्या पाण्याने तोंड धुऊन परत आला. तो आत येईपर्यंत म्हाळसाक्काने चुलवणात लाकडं घालून मोठ्ठा जाळ केला होता. एक कंदील बाजूल मिणमिणत होता. म्हातारीने भराभर तांदळाच्या पिठाच्या एकसारख्या भाकरी थापल्या. तव्यावर भाकरी भाजून, चुलीतला निखारा अलगद बाहेर ओढून त्या निखार्यावर भाकरी पालथी घातली. बघता बघता भाकरीचा चेंडू झाला. सगळ्या भाकरी अशाप्रकारे शेकून तीने त्याच तव्यात परसातल्या तांदळीच्या भाजीचं कालवण केलं. तवा उतरवून त्यावर एका तपेलीत भात रटरटायला घातला. बघता बघता सगळा स्वयंपाक झाला. चुलवणाजवळच पालथ्या घातलेल्या अल्युमिनीअमच्या थाळ्यात तीने दोघांना वाढून घेतलं. इतका वेळ शांतपणे हे सगळं बघत बसलेला भालबा, आताही काहीही न बोलता जेवायला बसला. पहिला घास तोंडात घेतानाच त्याचा हात थांबला.. 'आई..!!! आई??? कशी असेल आई?? जेवली असेल का? काय जेवली असेल? कुठं असेल??" त्याने घास खाली ठेवला. म्हातारीकडं पाहिलं.. तिच्या काहीतरी लक्षात आलं असावं.
" कोनाच्या बिगर कोनाचं काय बी आडत न्हाय... तू उपाशी र्हाऊन काय हुनार? जेव!!" निर्विकारपणे ती म्हणाली. आणि ती भराभर जेवू लागली.
तोही जेवला. मागचं सगळं आवरून तिने तिथेच एक जाजम अंथरलं. आणि त्याला घोंगडं देऊन त्याला एका बाजूला पथारी पसरायला सांगितली. पडल्या पडल्या त्यालाही झोप लागली.
सकाळी शेळ्यांच्या ओरडण्याने त्याला जाग आली. उठून बाहेर आला तो. म्हातारी शेळीचं दूध काढत होती. आत येऊन तीने चहा केला. गवती चहा असला तरी चव छान होती.
" तू आज वडण्ग्याला जा. तित्तं दामू कडं कामाल लाग. माज्याकडून आला म्हनून सांगा.. त्या बरूबर करील संम्दं. ही बघ ही पाय्वाट हाय नव्हं.. सरळ रानतनं जा.. मोट्ट रस्ता लागंल.. त्या रस्त्यानं जरासं चालत गेलास की लागंल्च वडनगं.." मान हलवून त्याने हो म्हंटले. आणि तो जायला निघणार इतक्यात म्हातारीने आत जाऊन कालची ती वाकळ आणि काही पैसे त्याच्या हातावर ठेवले. त्याला हीचा स्वभावाचा अंदाजच येईना. 'कालपर्यंत विशेष माया न दाखवता "कोणीतरी आलाय" इतकाच मतलब ठेऊन वागणारी, आपण जेवायचे थांबलो तर 'कोणाचं काही अडत नाही 'असं म्हणत भराभर जेवणारी.. ही म्हातारी आज जाताना मला वाकळ आणि पैसे देते आहे!!!! '
"ही वाकळ र्हाऊदे तुला.. कदीमंदी माजी आटवन तर हुईल. नायतर माजी कोन आटवन काडतंय.. आणि ह्ये चार पैसं ठेव.. वडनग्यात येकांदा शरूट घे आधी तुला घालाया. चल निघ आता.. " तडकाफडकी 'निघ आता' करत.. म्हातारीनं शेळ्या सोडल्या आणि तो जातोय का नाही हे ही न पहाता त्यांना घेऊन ती रानात निघूनही गेली. तो ती गेलेल्या रस्त्याकडे नुस्ताच पहात राहिला.
तो ही चालू लागला. कुठेतरी या म्हातारीबद्दल माया वाटू लागली होती. "काम मिळाले की या म्हातारीला भेटायला यायचं पुन्हा" असा निश्चय त्याने केला.. पण इतक्यात.. काम??? दामू कडं... !! काय सांगायचं ??म्हातारीनं पाठवलं म्हणून?? कोण म्हातारी?? कुठली?? नाव काय?? दामूला कुठल्या म्हातारीनं पाठवलं म्हणून सांगायचं?? त्याला काहीच सुधरेना.. हिचं नाव आपण परत विचारलंच नाही. काय करायचं?? बघू!! काहीतरी करूच.. दामूने नाही दिलं काम तर दुसरीकडे कुठेतरी करू.. त्यात काय!! असा विचार करत तो हमरस्त्याला आला आणि तसाच चालत वडणग्यात शिरला.
क्रमशः
0 प्रतिसाद:
टिप्पणी पोस्ट करा