मुक्तछंद लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
मुक्तछंद लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

बुधवार, ३० मे, २०१८

अगदी नकळत!

वयाच्या तिसऱ्या वर्षी .. 
झोपेत असताना मायेने तळपाया वरून हात फिरवत..
“कित्ती नाचत असतं ग माझं पिलू..” म्हणत..
आजीने कौतुकाने पायात चाळवाळे घातलेले..
अगदी नकळत!
सातव्या वर्षी.. सायकल शिकवताना..
बाबांनी अलगदपणे सायकलचा सोडलेला हात..
अगदी नकळत!
लुटुपुटू च्या भांडणात.. दादाने नाकाला काढलेला चिमटा..
आणि मग रुसल्यावर घेतलेला गालगुच्चा..
अगदी नकळत ..!
घट्ट पेडांची वेणी घालत आईने
टोकाशी रीबिनीचे फुलपाखरू करून.. चेहऱ्यावरून हात ओवाळून
घेतलेली आलाबला... आणि कानामागे मोडलेली बोटे..
तीही अगदी नकळत!
आणि मग
कुठल्याश्या नकळतश्या पण भेकड अशा क्षणी..
नशिबाने बदलेला रस्ता.. घेतलेलं भयाण वळण..
आणि मग नुसती ओढाताण.. फरफट.. घुसमट
... कळत नकळतची  !

नेमक काय कळत आणि काय नकळत..!
चाळवाळ्याच्या जागी खुळखुळणारा पैसा
पायावरून.. मांड्यांपर्यंत फिरणारे ओंगळ हात..
सायकल च्या जागी वस्त्रे विलग करणारे हात..
गालगुच्च्या च्या जागी.. चावे घेणारी मद्यधुंद तोंडे
वेणी ला रिबिनीच्या फुलपाखरा ऐवजी... लागणारा मादक गजरा..
सगळंच कस अगदी नकळत..!

आणि आता तर.. मेलेल्या शरीराला, जाणीवांना,
सरावलेल्या शहाऱ्यानाही.. काहीच कळत नाही..!
कोणी आलं काय,  गेलं काय.. झोपलं काय..
कि शरीराशी खेळलं काय!
सगळेच सोपस्कार कसे व्यवस्थित पूर्ण होतात..
अगदी सगळ्यांच्याच नकळत.. !

राजमार्गाने चालणाऱ्या समाजाला सुद्धा
एका कोपऱ्यात लागतात असली यंत्रे..
चालू अवस्थेतली... अगदी नकळत!

-    प्राजू 

मंगळवार, १९ सप्टेंबर, २०१७

माझी कविता

मध्यरात्री अचानक जाग आली...
तर आरशात स्वत:ला न्याहाळत असलेली ती!
गोड गोजिरी... नाजूक... लडिवाळ!
रेशमाचे बोल...... मोत्यांची लड उलगडावी तसे हसू
मी कौतुकाने पहात असतानाच
माझ्याकडे वळली...
"काय, विचार काय आहे आज?"
डोळ्यांनीच तिला विचारलं मी!
तशी हसू लागली ....
गालातल्या गालात...
गोड...
खूप गोड..
अगदी खळखळून...
जोरजोरात.......
मग...
उपहासाने...
विकृत...
बिभत्सपणे...
अचानक ओढणी फेकून देऊन..
अंगावरचे कपडे अर्धवट फाडून..
कमनिय शरीर उघडे टाकत म्हणाली...
"काय? दिसत्येय किनई मी शिला, मुन्नी सारखी?"
मी पटकन् उठून तिचे कपडे नीट करू लागले
तशी बेभान उत्तान झालेली ती..
सैरावैरा धावत सुटली...बेबंदपणे...
मी हताश.. काय झालं हिला??
अशी का वागतेय ही?
तशी माझ्या समोर आली
म्हणाली... "मी तरूण झालेय..
तुझ्या अलंकार रुपकांत का अडकवतेस?
मी नुसता पदर ढाळला तर वेडी होतात लोकं!
माझ्या नाजूक बांध्याला बघत नाचत राहतात..
कशाला हवीत वृत्तं, रूपकं आणि अलंकार?
कशाला हवाय हळुवारपणा?
थेट मामला... हा असा! "
म्हणत तिने पाठ उघडी केली
तिच्या नाजूक पाठीवर उठलेले...
बिभत्स सूरांचे चावे....
आसक्त शब्दांचे ओरखडे ..
आणि त्यातून भळभळणारे रक्त...
"हेच हवंय पब्लिकला!" कशीनुशी हसली...
मी तिला जवळ घेतलं तशी
हात झटकून पुन्हा विकृत हसत
निघून गेली ती आलीच नाही अजून..
.
.
तुम्ही पाहिलीत का हो माझी कविता?
कुठल्या आयटम सॅांग मध्ये
कुठल्या डान्सबार मध्ये दिसलीच..
तर तिला सांगा
आजही तिच्यासाठी माझे शब्द, कल्पना, अलंकार
मी जपून ठेवलेत!
येईल ना ती?
- प्राजू

लौंजरी शॉप

रोज येणाऱ्या किमान शंभर एक मुली- बायका.. 
प्रत्येकीची आवड वेगळी.. निवड वेगळी.. स्टाईल वेगळी..
बाहेर बोर्ड “फक्त स्त्रियांना प्रवेश” 
हे पाहूनच तर तिने नोकरी स्वीकारली होती..
किमान इथे तर “तसे” पुरुष येणार नाहीत...
वखवखलेल्या नजरा.. कामुक भाव
आणि ओंगळवाणे स्पर्श !
स्त्री काय भोग्य वस्तू आहे?
यातून खूप लांब असू आपण.. हुश्श!
इथली मालकीण खूप चांगली.. सालस.. सुस्वभावी..
काळजी घेणारी.. तशी मध्यम वयीन!
एकटीच राहते बिचारी!
अधून मधून विचारायची.. बघ हि ब्रा आवडते का तुला?
आणि अशा बऱ्याच branded ब्राज आणि pantis
तिच्याकडे गिफ्ट म्हणून आल्या होत्या..
तिच्या गरीब देहावर त्या मलमली कपड्यांचा स्पर्श
तिला सुखावून जायचा!
ती त्यातच खूष होती...
कुणी दुकानात नसताना ट्रायल रूम मध्ये
त्या घालून ती मालकिणीला दाखवायची..
मालकीण तिला हूक्स लावायला मदत करायची..
प्रेमाने पाठीवरून हात फिरवायची!
त्या ब्रा कप्स मध्ये आपले स्तन कसे intact ठेवायचे
हे स्वत: तिला दाखवायची.
“अगदी प्रिन्सेस दिसत्येस!” मालकीण म्हणायची!
ती खुलून जायची..
कारण...
तिला माहितीच नव्हतं..
की,
मालकीण लेस्बियन आहे..! 

"मी की पंडितजींची बंदिश??"

"मी की पंडितजींची बंदिश??"
रागाने विचारलंच मी.
म्हणाला, "डोळे मिटून आपोआप लागणारा सा..
अरोहात स्वर चढवत...
स्वरसमुहांची एक एक 
निरगाठ उकलत..
पुन्हा अवरोहात तेच स्वर टिपत ..
एका ठेक्यासह मुखडा उचलून ...
खर्जापासून तार सप्तकापर्यंत
मनसोक्त विहरत...
मध्येच वळणावरती आलाप घेऊन..
समेवर येऊन पुन्हा स्वतः ला झोकून देत
आणि स्वरांना झोके देत
अगदी सहज अंत-याला हात घालत.... अनाकलनीय उलथापालथी घडवत ....
ताना छेडत पुन्हा पुन्हा मुखड्यावर येत...
अखेरची तिहाई आणि....
एका मैफिलीचं पूर्णत्व... अपूर्णत्वाच्या सुस्काऱ्यामधून अनुभवण्याचं
निखळ समाधान!
माझं , त्या बंदिशीचं आणि
त्या माहोलाचं सुद्धा!"
एवढं सांगूनही
.गोंधळलेल्या माझ्या डोळ्यांत....
अजिबात न डोकावत म्हणाला...
.
.
.
"तू आणि बंदिश ... फरक कुठेय??"
- प्राजू

ती.... मळवटवाली!

देवळाच्या दाराशी.. एका कोपऱ्यात .. 
किंचित बांगड्यांची किणकिण,
मळवट भरलेला, आणि कपाळावर मोठ्ठ कुंकू.. 
तीच मळवट वाली... !
हातभार हिरव्या बांगड्या, पायात जोडवी आणि गळ्यात.. ??
गळ्यात मोठ्ठ ठसठशीत मंगळसूत्र ..
काळ्या मण्यांच्या २-३ लडी एकत्र बांधून केलेलं!
भिरभिरी नजर.. येणाऱ्या जाणाऱ्याना न्याहाळणारी
काय माहिती काय शोधत होती...
कदाचित ओळख, कदाचित सहानुभूती.. कदाचित दया..
हातातल्या खापरीने देवळातली फारशी कुरतडणारी ..
माझ्या नजरेशी नजर भिडली.. थंड..
कोणतेही भाव नसलेली.. निर्जीव..
देवाला नमस्कार करून मागे पहिले..
ती उठून उभी राहिलेली... कोणाकडे तरी बघत..
नजरेत काहीसे भाव उमटलेले.. कसले??
माहित नाही.. कदाचित ओळखीचे,
कदाचित उत्साहाचे, कदाचित प्रेमाचे...
बांगड्यांची किणकिण थोडी जोरात झाली..
सोबत पायातले पैंजण सुद्धा वाजले..
आवाजासोबत निऱ्यांचा घोळ सांभाळत ..
पदर नीट करत...
केसांवरून हात फिरवत.. मंदिराच्या पायऱ्यांवरून ती
लगबगीने खाली गेली सुद्धा..
आणि सवयीने एका स्कूटर वर मागे बसली..
वडील असावेत बहुधा!
मागे कुजबुज झाली .. देवाला सोडलीये ती.. देवदासी!
त्या स्कूटर वर मागे बसलेली ती...
त्या माणसाच्या पाठीला चिकटून.. मिठी घालून..
आपल्या कोवळ्या अंगप्रत्यांगाचे अस्तित्व त्याला जाणवून देत..
वडील?? .. मागे फक्त छद्मी हास्याचे हुंकार ..
तोपर्यंत ती... निघून गेलेली.. माझी नजर तिच्या पाठोपाठ..
तिची साडी सुटेल.. निऱ्या निसटतील.. पदर अडकेल स्कूटर च्या चाकात ..
कारण मी १३ वर्षांचीच असताना...
शाळेच्या नाचात माझी साडी निसटली होती..!
- प्राजू

माझ्यानंतर...

माझ्यानंतर कोणाला मी आठवेन... 
अशी शक्यता नाहीच
क्वचित कधीतरी 
त्या कोप-यातल्या फाटक्या जागी,
त्या फाटक्या वहीकडे
नजर गेलीच ... तर
सापडतील...बरेच सुटे मिसरे ,
काही अर्ध्या ओळी
काही वृत्तात न बसलेले शब्द ..
काही बेभान झालेल्या कल्पना ..
कदाचित सांगतील त्यांच्या जन्माची कहाणी
म्हणतीलही की आमच्याकडे थोडं दुर्लक्षच झालं तिचं.... पण ती चांगली होती !
त्यांना थोडं चुचकारलंत तर येतीलही तुमच्यासोबत
पण बेभान होतील.... गदारोळ करतील..
कारण माझ्यानंतर
त्यांना काबुत ठेवणं कठीण होईल..
वीतभर जागेत नाचायची सवय असलेल्या लेकरांना
मोकळं मैदान मिळालं तर दुसरं काय होणार?
पण त्यांच्यावर रागावू नका..
माझ्या नंतर त्यांना इतर लोकांच्यात मिसळावंच लागेल ... त्यांचं त्यांना जगावंच लागेल.. जगतीलही!
फक्त ...
त्या कोप-यातली ती फाटकी वही मात्र जाळू नका!
जाळल्यावर शंभर टक्के राख होते म्हणे!
-प्राजू

Page copy protected against web site content infringement by Copyscape